मन चंगा तो सब चंगा!

    दिनांक  03-Feb-2019   

 


 
 
 
नैराश्यग्रस्त विद्यार्थ्यांना मैत्रीचा हात पुढे देऊन त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम हे ‘सायको बडीज’ करतात. डॉ. के. पी. सुंदरी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरु झाला...
 

अपयश मनाला लावून, क्षुल्लक कारणांसाठी आजची तरुण मुले आत्महत्या करतात. हे चित्र आज-काल सगळीकडे सर्रास पाहायला मिळते. आत्महत्येसाठी प्रवृत्त होण्याचे कारण हे त्यांचे खचलेले मनोधैर्य असते. म्हणूनच ‘मन चंगा तो सब चंगा!’ हा संदेश डॉ. के. पी. सुंदरी देतात. डॉ. के. पी. सुंदरी या मानसशास्त्रज्ञ आहेत. गेली २० वर्षे या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयात कला विभागाच्या उपप्राचार्या म्हणून त्यांनी काम केले. डॉ. के. पी. सुंदरी यांच्या कारकिर्दीत त्यांनी महाविद्यालयात अनेक आमूलाग्र बदल घडवून आणले. ‘सायको बडीज’ हादेखील असाच एक महत्त्वपूर्ण बदल! नैराश्यग्रस्त विद्यार्थ्यांना मैत्रीचा हात पुढे देऊन त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम हे ‘सायको बडीज’ करतात. ‘सायको बडीज’ हा याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक गट. हा गट आपल्यासोबत शिकणाऱ्या आपल्यासारख्याच इतर विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्याचे कार्य करतो. या गटामध्ये मानसशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतात. उदा. आपल्यासारख्याच एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेची भीती वाटत असेल, तर त्याला धीर देऊन त्याचे मनोबल वाढविण्याचे काम हे विद्यार्थी करतात. दरवर्षी जसजसे अनेक विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयाचा निरोप घेतात, तसे ‘सायको बडीज’ गटातील विद्यार्थीही दरवर्षी बदलतात. नवे ‘बडीज’ गटामध्ये सामील होतात. पण पदवी संपादन केलेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांची नाळ या गटाशी अजून जोडलेली आहे. डॉ. के. पी. सुंदरी यांच्या कल्पनेतून सत्यात उतरलेली ही संकल्पना.

 
मानसशास्त्र हा चार भिंतीच्या आत शिकवण्यासारखा विषय नाही, हे डॉ.के. पी. सुंदरी यांना चांगले ठाऊक होते. विश्वात व्यक्ती तितक्या प्रकृती हे मानसशास्त्राचे सूत्र असल्याने विद्यार्थ्यांना जर मानसशास्त्र खरोखर समजवायचे असेल, त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यायचा असेल, तर त्यांचे ज्ञान हे केवळ पुस्तकीज्ञान न राहता, त्यांना वर्गाबाहेर न्यायला हवे, हा निर्धार डॉ. के. पी. सुंदरी यांनी केला. मानसशास्त्राच्या शिक्षिका म्हणून त्यांनी ही जबाबदारी उचलली. १९९२ पासून त्यांनी महाविद्यालयात अनेक सुत्य उपक्रम राबवले. ‘सायको बडीज’ प्रमाणेच ‘मोटिवेशनल बडीज,’ ‘न्युट्रिशियन बडीज,’ ‘सँता बडीज’ हे विद्यार्थ्यांचे गटही त्यांनी निर्माण केले. विद्यार्थ्यांना अभ्यासात, क्रीडा क्षेत्रात, इतर सांस्कृतिक उपक्रमांमध्ये आगेकूच करण्यास प्रोत्साहन देण्याचे काम ‘मोटिवेशनल बडीज’ करतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासात चांगली प्रगती केली, तर त्यांना ‘सँता बडीज’कडून भेटवस्तू दिल्या जातात. सकाळी महाविद्यालयात लवकर यायचे म्हणून अनेक विद्यार्थी सकाळचा नाश्ता न करता उपाशीपोटीच घरातून निघायचे. विद्यार्थ्यांना आहारातील योग्य पोषकद्रव्ये मिळण्यासाठी ‘न्युट्रिशियन बडीज’द्वारे नाचणीपासून बनलेल्या पदार्थांचा नाश्ता त्यांना दिला जायचा. डॉ. के. पी. सुंदरी यांनी आजवर राबवलेल्या या उपक्रमांसाठी त्यांना युनियन बँकेकडून वेळोवेळी आर्थिक मदत मिळाली.
 
 
महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाकडून दरवर्षी ‘साइकफेस्ट’चे आयोजन केले जाते. दरवर्षी ‘साइकफेस्ट’च्या वेगवेगळ्या संकल्पना असतात. २०१६ साली ‘वंडरलँड’ ही संकल्पना ठेवण्यात आली होती. ‘माणसाला पडणारी स्वप्ने आणि त्यामागील मानसशास्त्र’ हा विषय या संकल्पनेमधून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला. २०१७ साली ‘जन्म आणि मृत्यू’ अशी संकल्पना ठेवण्यात आली होती. ‘माणसाचा जन्म कशासाठी? आणि मृत्यू का होतो? तसेच जीवन कसे जगावे? यासारख्या विविध प्रश्नांवर यावर्षी ‘साइकफेस्ट’मध्ये चर्चा करण्यात आली. मानसशास्त्रातील अशाच काही विविध रंजक विषयांचे अभ्यासक ‘साइकफेस्ट’ला वक्ते म्हणून बोलावले जातात. विद्यार्थ्यांनी पुस्तकातील अभ्यासक्रमापलीकडे काहीतरी वेगळे नवीन शिकावे, असा प्रयत्न नेहमीच डॉ. के. पी. सुंदरी यांनी केला. अर्थातच, दरवर्षी ‘साइकफेस्ट’चे आयोजन, संकल्पनेची निवड डॉ. के. पी. सुंदरी करतात. डॉ. के. पी. सुंदरी यांचे व्यक्तिमत्त्वच इतके मनोहर आहे की, त्यांच्या सान्निध्यात प्रत्येक विद्यार्थ्याला यावेसे वाटते. विद्यार्थ्यांना त्या आपल्या जवळच्या वाटतात.
 
 
वयाने मोठ्या असल्या तरी, त्यांचा उत्साह तरुणांप्रमाणेच असलेला पाहायला मिळतो. आजही या महाविद्यालयातून पदवीधर झालेले अनेक विद्यार्थी आयुष्यात कोणतीही अडचण आली की, पहिला फोन डॉ. के. पी. सुंदरी यांना करतात. त्यांचा सल्ला विद्यार्थ्यांसाठी नेहमीच मोलाचा ठरतो. त्यांच्याशी संवाद साधल्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न तर सुटतातच, पण त्यांच्या तोंडून प्रेमाचे चार शब्द ऐकल्याने विद्यार्थ्यांना समाधान वाटते. डॉ. के. पी. सुंदरी सांगतात की, तुम्ही घेतलेले शिक्षण तुमच्या आयुष्यात तुम्हाला उपयोगी पडले पाहिजे, त्याचा उपयोग केवळ नोकरी मिळविण्याकरिता न करता, जीवन जगण्याची कला त्यातून तुम्हाला अवगत व्हायला हवी. कारण, जीवन कसे जगावे? याचे शास्त्र तुम्हाला जगातील कोणत्याही पुस्तकात शोधून सापडणार नाही. “वेळोवेळी अनुभवातून आपल्याकडे आलेल्या चार गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवाव्यात,” असा सल्लाही त्या देतात. “मनाचे आरोग्य राखाल, तर शरीराचे आरोग्यदेखील उत्तम राखता येईल. आपले मनोधैर्य कधीच खचू देऊ नका. जीवन सुंदर आहे. ते आनंदाने जगता आले पाहिजे,”असा संदेश डॉ. के.पी सुंदरी देतात.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/