चार वर्षाच्या चिमुकलीने २ तासात सर केला हरिश्चंद्रगड!

    दिनांक  03-Feb-2019

 

 
 
 
 
औरंगाबाद : चार वर्षाच्या लहान मुलीने अवघ्या दोन तासांमध्ये हरिश्चंद्रगड सर केल्याची कौतुकास्पद कामगिरी केली. मन्नत मिन्हास असे या लहान मुलीचे नाव असून मन्नतने २७ जानेवारी रोजी हरिश्चंद्र गड अवघ्या दोन तासात सर केला. गड सर करताना मन्नतने तिच्यासोबत चिप्स, जेम्सच्या गोळ्या असे हलकेफुलके खाद्यपदार्थ जवळ ठेवले होते. एव्हरेस्टवीर मनिषा वाघमारे यांनी ही माहिती दिली.
 

२२ सप्टेंबर २०१४ रोजी मन्नतचा जन्म झाला. मन्नतची आई माधवी मिन्हास या वुडरिच शाळेत क्रीडा प्रशिक्षक आहेत. मन्नतचे वडिल अवतार मिन्हस हे लघुउद्योजक आहेत. मिन्हास कुटुंब मूळचे हरियाणाचे आहे. गेल्या ३६ वर्षांपासून ते औरंगाबादमध्ये स्थायिक आहेत. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मन्नतने कलावंतीण हा दुर्गही आईबरोबर सर केला होता. गेल्या काही महिन्यांपासून मन्नत आणि तिची आई माधवी मिन्हास या दोघीजणी विद्यापीठ परिसरातील गोगा टेकडीवर ट्रेकिंगसाठी जात होत्या.

 

यावेळी मनिषा वाघमारे यांच्यासोबत माधवी मिन्हास यांची गिर्यारोहण मोहिमेसंदर्भात चर्चा झाली होती. या चर्चेनंतर मन्नतने गिर्यारोहणासाठी सोबत येण्याचा हट्ट आपल्या आईकडे केला. मन्नतने केलेला हा बालहटट् माधवी मिन्हास यांनी पुरवला. त्यातून एक लहान गिर्यारोहक तयार झाली. २०२४ मध्ये माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी औरंगाबादमध्ये मनिषा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली टीम तयार केली जात आहे. या टीममद्ये मन्नतची निवड होण्याची वर्तविण्यात येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/