शांतीच्या कबुतरांची व्यंगचित्रे

    दिनांक  28-Feb-2019   

 

 
 
 
 
युद्ध नको पाकसोबत चर्चा करा, युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती हे प्रश्नाचे उत्तर नाही,’ हे शांतीप्रवचन कुणी द्यावे तर राज ठाकरेंनी! अर्थात, शांती कुणाला नको, स्थिरता कुणाला नको? पण, स्वतःच्या रक्ताच्या बंधूला हरवल्यावर सॉलिड मारामारीची भाषा करणाऱ्यांच्या तोंडी शांतीची भाषा अजिबात शोभत नाही. अर्थात, त्यांचे वैयक्तिक हेवेदावे असतीलही. ‘तेलकट वडे की चिकनसूप’ या गोष्टी कौटुंबिक वाद म्हणून सोडूनही देऊ. पण, देशाच्या इतर राज्यांतून मुंबईमध्ये आलेल्यांना ‘परप्रांतीय’ म्हणत झुंडीने त्यांना मारहाण करणे, हातावर पोट असलेल्यांना लाथाबुक्क्यांनी मारणे, त्यांची रोजीरोटीची साधने तोडून मोडून टाकणे, या तोडमोडीतून त्या गरीबाचे कुटुंब उद्ध्वस्त करणे, या अशा गोष्टी करणाऱ्यांच्या तोंडी वरवरही शांतीची भाषा शोभत नाही. अर्थात, आपल्याकडे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे हिंसेची भाषा करणारे शांतीसूक्त जपू लागले तरी ते त्यांचे स्वातंत्र्य आहे. पण, मुद्दा असा आहे की, देशाच्याच समानधर्मी, समानभूमी आणि समानसंस्कृती असलेल्या माणसाला परके समजून मारताना हिणवताना तुमची माणुसकी नीतिमत्ता कुठे गेली होती किंवा जाते? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नसेलच. कारण, पुलवामाच्या भ्याड हल्ल्याबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विद्यमान सरकारची चौकशी नेमावी, असे ज्यांना वाटते, ती व्यक्ती प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातूनच पाहते, हे नक्की. जवानांच्या मृत्यूने देश दुःखात बुडाला, संतापाने पेटून उठला. पण, इथे तोंडावरची माशी हलली नाही की, डोळ्यावरचे झापड उतरले नाही. चोराच्या मनात चांदणे तसे हे या हल्ल्याबाबतही त्यांच्या मनात राजकारण होते. माणूस जसा स्वतः असतो तसा दुसऱ्यांना समजतो. त्यामुळे आपण निवडणुका आल्यावर काय करू शकतो, हा विचार करत त्यांनी स्वतः ते जे करतील, ते पंतप्रधानांच्या नावे खपविण्याचा प्रयत्न केला. असो. आता त्यांना शांती हवी आहे, पाकिस्तानशी चर्चा हवी आहे. तुम्ही काहीही म्हणालात तरी देश आणि सरकार सुज्ञ आहे, काय ते निर्णय घ्यायला. तुम्ही तूर्तास शांतीच्या कबुतरांची व्यंगचित्र काढा, तेवढेच तुमच्या हातात आहे.
 

तर राजाचे असे झाले...

 

सो चुहें खा के बिल्ली.. किंवा लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, कोल्ह्याला द्राक्षे आंबट या अशा नकारात्मक म्हणींना प्रत्यक्षात जगणे सोपे नाही. पण, सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत लष्कराच्या भाकऱ्या भाजत जगणे महाराष्ट्रातले एक व्यंगचित्रकार करत असतात. नाक खाजवून खर्जातल्या आवाजात ‘आयला-मायला’ शब्द उच्चारत नकला करणे, हासुद्धा त्यांचा जुना छंद. फारच छंदिष्ट. या कुंचलाधारी राजला कधी काय दिसेल, वाटेल याचा नेम नाही. राजाचा बेभरवशाचा नेम लोकांना माहिती झाल्यामुळे जेव्हा ‘राजाला साथ द्या,’ असा राजा म्हणाला, तेव्हा नेमके लोकांनी राजाला साथ न देता ‘सात’च दिले. पण, राजा बधला नाही की थांबला नाही. तोंडाची वायफळ टकळी चालवायचा वसा त्याने टाकला नाही. आता काही नादान लोक म्हणतील की, काय झालं न वसा टाकायला? राजा कितीतरी मुद्दे उचलून अर्धवट टाकतोच ना? लोक काहीही म्हणाले तरी ‘ब्लू प्रिंट’, ‘तोडपाणी’, ‘खळ्ळ्खट्याक्’ वगैरे शब्द संकल्पना मांडणी तसेच केलेली, न केलेली कार्यवाही याचे श्रेय राजाचेच! असते एकेकाचे नशीब. पण, नशीब असतानाही कमनशिबी बनण्याचे ग्रेट क्रेडिट कुणाला द्यायचे झाले तर राजालाच द्यावे लागेल. मराठीचा मुद्दा उपस्थित करत राजाने दुकानाच्या पाट्या बदलल्या. रातोरात राजा मशहूर झाला. पण नंतर कळले की तोडपाणी, कमिशनच्या चक्रामध्ये खळ्ळ्खट्याक् होऊन शहरातल्या मराठी टक्क्यांची पाटी कोरीच राहिली. (हे खळ्ळ्खट्याक् बहुधा प्रत्युत्तर न देऊ शकणाऱ्या निर्बलांसोबतच होत राहिले.) तरीही पहिल्याच निवडणुकीमध्ये राज विजयी झाला. त्यावेळी लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला, यापेक्षा आपण आपल्याच रक्ताच्या नात्याला कसे नमवले, याचा राक्षसी आनंद राजा लपवू शकला नाही. ‘अपून ने एकीच मारा लेकीन सॉलिड मारा’ची दर्पोक्ती राजाने केली. मात्र, त्यानंतर जनतेनेच मतपेटीतून राजाला सॉलिड नकार दिला. मग भाऊबंदकीचा विशेष प्रयोग रंगविण्यात आणि टाळ्या-बिळ्या मारण्यात राजा वेळ काढू लागला. गती नाही त्यामुळे राजाची मती खुंटली. याच मतीने राजाचे वाट्टोळे झाले. राजाचे दैव देते आणि कर्म नेते नाही तर दैव देते, पण अर्थहीन केलेली फुकटची वटवट सर्वच नेते असे झाले. राजाचे कसे झाले, तर राजाचे असे झाले!

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat