अंगापेक्षा बोंगा जास्त...

    दिनांक  28-Feb-2019   

 

 
 
 
जगापासून सर्वच दृष्टीने बराचसा दूर, अलिप्त असलेला देश म्हणजे उत्तर कोरिया आणि त्याउलट सदैव चर्चेच्या केंद्रस्थानी असणारा अमेरिका. खरं तर हे दोघे एकमेकांचे कट्टर दुश्मन; म्हणजे एवढे की, उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये काही वर्षांपूर्वी बॅनर आणि पोस्टर लावण्यात आले होते की, अमेरिका हा एक साम्राज्यवादी, आक्रमणकारी देश आहे, तर दुसरीकडे अण्वस्त्राच्या बेछूट चाचण्या करणाऱ्या उत्तर कोरियावर आजवर जवळजवळ सर्वच देशांनी निर्बंध लादले. व्यापारिक आणि व्यावहारिक असे सगळे संबंध तोडल्यानंतरही आपल्या कुरघोड्या त्यांनी सुरूच ठेवल्या. कारण, उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांच्या मते, सत्ताधाऱ्यांनी नेहमी आपली सगळी ताकद वापरावी आणि किमच्या मते, अण्वस्त्रे ही त्यांची सर्वात मोठी ताकद. या सगळ्यातच काही वर्षांपूर्वी उत्तर कोरियाने आपले अण्वस्त्रांच्या चाचणीचे एक केंद्र नष्ट केले, ज्यामुळे जगभरातील देशांनी किमच्या या निर्णयाचे स्वागतही केले. किम बदलला आहे की काय, असं वाटत असतानाच, त्या केंद्राची उत्तर कोरियाला काही आवश्यकता उरली नव्हती, अशी स्पष्टता किमनेच दिली. त्यापुढे जाऊन उत्तर कोरियाने आपला आण्विक विकास कार्यक्रम थांबविण्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही.
 

आणि दि. १२ जून, २०१८ रोजी ६८ वर्षांनंतर सिंगापूर येथे एक ऐतिहासिक घटना घडली. ‘दुश्मन बने दोस्त’ अशी काहीतरी मोहीम घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिंगापूर येथे झालेल्या शिखर बैठकीत किम यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली. मात्र, खरी चर्चा रंगली ती किम आणि ट्रम्प यांच्या हस्तांदोलनाचीबुधवारी याच ‘दुश्मन बने दोस्त’चा दुसरा अध्याय पाहायला मिळाला. व्हिएतनाम येथे झालेल्या शिखर बैठकीत ट्रम्प आणि किम पुन्हा भेटले. यावेळी मात्र, औचित्य होते (किंवा वाटत होते) ते कोरियाच्या आण्विक निःशस्त्रीकरणावर निर्णय घेण्याचे. अण्वस्त्रमुक्तीचा करार होण्याच्या उद्देशाने झालेली ही दोन दिवसीय बैठक निष्फळ ठरली. कारण, या बैठकीत अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात कोणताही करार झाला नाही, तर किम यांनी उत्तर कोरियावर असलेले निर्बंध उचलण्यात यावे, या मागणीवरही विशेष चर्चा झाली नाही, त्यामुळे सिंगापूरप्रमाणे व्हिएतनामही फळास आले नाही.

 

मात्र, पत्रकारांशी बोलताना किम आणि ट्रम्प यांची वेगळीच मैत्री दिसली. यावेळी किम यांनी थेट आपण आण्विक निःशस्त्रीकरण लागू करू किंवा आण्विक विकास कार्यक्रम थांबवू, अशा घोषणा केल्या नसल्या तरी, त्यासाठी तयारी मात्र दाखविली. यावर ट्रम्प यांनी कोणत्याही गोष्टीकरिता एक विशिष्ट काळ असतो, वेळ असते, असे बौद्धिक पाजळले. या चर्चेअंती व्हाईट हाऊसच्या सचिवांनी, भविष्यात अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात आणखी चर्चा होतील, असे संकेत दिले. त्यामुळे उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय कायद्यांचा तसेच करारांचा भंग करत सुरू केलेला आण्विक विकास कार्यक्रम रद्द करतील, अशी आशा बाळगली जाऊ शकते. कारण, आतापर्यंत उत्तर कोरियाने सहा आण्विक चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेला भीती होती की, उत्तर कोरियाकडून ही अण्वस्त्रे बनविण्याचे तंत्रज्ञान अन्य देशांना विकू शकतो, अणुचाचणी केंद्रातील चुकांमुळे होणारे अपघात किंवा जर उत्तर कोरियातील सरकार कोसळल्यास ही अण्वस्त्रे चुकीच्या हातात पडू शकतात, त्यामुळे अमेरिकेने अण्वस्त्रमुक्तीचा करार उत्तर कोरियासोबत करण्यासाठी पुढाकार घेण्यात सुरुवात केली. मात्र, गुरुवारी झालेल्या बैठकीत अमेरिकेच्या शिष्टमंडळाने, “या चर्चेमध्ये नक्कीच सकारात्मक तोडगा निघेल अशी आम्हाला आशा होती, तसे झालेही मात्र कोणताही करार झाला नाही. पण, या चर्चेमुळे आम्ही भविष्याबाबत आशावादी आहोत,” असे सांगितले. अण्वस्त्रमुक्तीचा अर्थ दोन्ही देश कसा घेतात, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात फक्त अनौपचारिकच चर्चा रंगणार की काही फळालाही येणार, हे येत्या ट्रम्प आणि किम यांच्या बैठकांमध्येच कळेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat