पाकविरोधी जग एकवटले...

    दिनांक  27-Feb-2019   

 


पुलवामा हल्ला, त्यानंतर भारतभरात उसळलेली संतापाची लाट, मंगळवारी भारतीय वायुदलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरात केलेले हवाई हल्ले, त्यानंतर जखमी आणि खजील झालेला पाकिस्तान यामुळे दक्षिण आशियातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भारताचं वाढतं सामरिक आणि आर्थिक सामर्थ्य लक्षात घेता, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील तणावाचे पडसाद हे संपूर्ण आशिया खंडावर उमटताना दिसत असून जागतिक पातळीवरही या तणावांची दखल घेतली जात आहे. या सर्व परिस्थितीत आंतरराष्ट्रीय समुदायाकडून गेल्या दहा-बारा दिवसांत घेण्यात आलेली समंजस भूमिका लक्षवेधी असून जागतिक पटलावर भारताचं मजबूत होत चाललेलं स्थान अधोरेखित करणारी आहे.

 

अमेरिका, रशियासह अनेक प्रमुख देशांनी भारताला दहशतवादविरोधी लढाईत आपला पाठिंबा दर्शवला असून अनेकांनी भारताच्या सर्जिकल स्ट्राईक-२ चं समर्थनदेखील केलं आहे. चीनने नेहमीप्रमाणे चालढकल केली खरी, मात्र जागतिक दबावापुढे चीनचं काही चाललं नाही. विशेषतः, अमेरिकेने भारताच्या बाजूने उभं राहण्याची घेतलेली भूमिका नक्कीच स्वागतार्ह आहे. गेल्या साठ-सत्तर वर्षांत, शीतयुद्ध काळापासून ते अलीकडच्या काही घटनांपर्यंत अमेरिकेने भारत-पाकिस्तान वादात घेतलेल्या भूमिका पाहता, सध्या घडत असलेल्या गोष्टींचं वेगळेपण स्पष्ट होतं. गेली अनेक वर्षं भारत दहशतवादी कारवायांत होरपळून निघाला. दरवेळी भारताने दहशतवादाचा आणि पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना खतपाणी घातल्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय समुदायापुढे उपस्थित केला. परंतु, अपवादात्मक प्रसंग वगळता अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रांनी पाकिस्तान विरोधात थेट भूमिका घेण्यास नेहमीच चालढकल केली. सर्जिकल-२ नंतर अमेरिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पाकिस्तानला दहशतवाद रोखण्याबाबत स्पष्ट शब्दांत कानपिचक्या दिल्या आहेत. पाकिस्तानने आपल्याच भूमीवरील दहशतवाद्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, असा इशारा देत अमेरिकेने पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी पोसले जात असल्याच्या मुद्द्याला मान्यता दिली आहे. शिवाय, अमेरिकेने दिलेली शस्त्रास्त्रे पाकिस्तानला अमेरिकेच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही, अशीही तंबी अमेरिकेने पाकला दिल्याचं वृत्त आहे. स्वतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच काही दिवसांपूर्वी ‘भारत मोठी कारवाई करेल’ असा अंदाज व्यक्त केला होता. या सर्व घटना अमेरिकेचे बदललेले प्राधान्यक्रम स्पष्ट करतात.

 

अर्थात, अमेरिकेने असं काही केलं म्हणून हुरळून जाण्याची मुळीच गरज नाही. आज पाकिस्तानसह संपूर्ण पश्चिम आशियात जो काही सावळागोंधळ सुरू आहे, त्या पापात अमेरिकेचाच तर मोठा वाटा आहे. शिवाय, पाकिस्तानबाबत अमेरिकेचं आजचं कडक धोरण उद्या राहील, याचीही शाश्वती नाही. आज चीनला शह देण्यासाठी अमेरिकेला आशियामध्ये भारतासारखा साथीदार हवा आहे. भारताचं रोज वाढत चाललेलं सामर्थ्य पाहता, चीनला रोखण्यासाठी भारत अमेरिकेला जवळ हवा आहे. ही एक संधी मानून भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला उघडं पाडण्यासाठी आणि कोंडी करण्यासाठी या संधीचा फायदा करून घ्यायला हवा. चीनसारखा बेभरवशाचा आणि आतल्या गाठीचा शत्रू शेजारी असणं आणि तो जागतिक पातळीवर महत्त्वाच्या भूमिकेतही असणं, ही झाली भारताची दुसरी अडचण. चीनला सध्या जागतिक दबावापुढे झुकत पाकिस्तानविरोधी भूमिका घ्यावी लागली असली, तरी ती कायम राहील असं नाही. जैश-ए-मोहम्मदवर बंदी घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रांत आणलेला ठराव चीनमुळे बारगळला, हे आपण पाहिलंच आहे. त्यामुळे पाकिस्तान विषयात काहीही करत असताना शेजारी चीनच्या हालचालींकडेही बारीक लक्ष ठेवायला हवं. दुसरीकडे, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, जपान इ. देशांचा पाठिंबादेखील स्पष्टपणे भारताच्या पारड्यात पडल्याने भारताची बाजू अधिक मजबूत झाली आहे. जैशवर बंदी घालण्यासाठी फ्रान्सने पुढाकार घेतला असून भारताच्या परराष्ट्रनीतीचा हा मोठा विजय मानला जात आहे. फ्रान्स हा सुरक्षा परिषदेतील महत्त्वाचा देश असल्याने त्याच्या या कृतीला मोठं महत्त्व आहे. आता यासोबत भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटं आणि उघडं पडण्याची मोहीमदेखील यशस्वी ठरताना दिसते आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat