वणंद गावाचे नंदनवन

    दिनांक  26-Feb-2019   

 

 
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे तेज आज जग व्यापून राहिले आहे. या तेजाला आंतरिक साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी रमाबाईंचा त्याग आणि कष्ट विसरून चालणारच नाहीत. रमाबाई आंबेडकरांचे दापोली येथील जन्मगाव वणंद हे आ. विजय(भाई) गिरकर यांनी ‘आमदार आदर्श गाव योजनें’तर्गत दत्तक घेतले. त्या वणंद गावाचे नंदनवन होण्याचा हा प्रवास...
 

हा परिसर क्रांतीचा परिसर आहे. इथूनच जवळ क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गाव अंबावडे आहे. आज आपण जिथे जमलोय ते वणंद म्हणजे, माता रमाईचे जन्मगाव आहे आणि पुढे क्रांतीची साक्ष देणारे महाडचे चवदार तळे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना आणि विचारांना मानणाऱ्या आणि जाणणाऱ्यांसाठी ही त्रिस्थळे क्रांतीची तीर्थक्षेत्रे आहेत,” अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष दादा इदाते असे म्हणाले आणि उपस्थितांनी या तीर्थक्षेत्राच्या समर्थनार्थ टाळ्यांचा कडकडाट केला. २२ फेब्रुवारी रोजी वणंद गावी ‘आमदार आदर्श गाव योजने’मधील विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यातील प्रमुख अतिथी म्हणून ते मार्गदर्शन करत होते. रणरणत्या उन्हामध्येही वणंद ग्रामस्थ या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाई गिरकर तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष भीमराव आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या सदस्य योजना ठोकळेही उपस्थित होत्या. २०१४ साली सत्तांतर झाले आणि प्रत्येक गावाचा विकास व्हावा यासाठी पंतप्रधानांनी जशी ‘खासदार आदर्श गाव योजना’ आणली, तशी मुख्यमंत्र्यांनी ‘आमदार आदर्श गाव योजना’ आणली. त्या अंतर्गत भाई गिरकरांनी माता रमाईचे गाव आमदार म्हणून दत्तक घेतले. वणंद गावच्या परिप्रेक्षात येणाऱ्या आजूबाजूच्याही काही वास्तू आहेत, त्या बाबासाहेबांच्या स्पर्शांनी पावन झाल्या आहेत, त्यांचाही विकास करण्याचे महत्त्वाचे काम भाई गिरकरांनी केले आहे. अर्थात, या योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या गावांना कोणतेही थेट सरकारी अनुदान मिळत नाही. पण, गाव दत्तक घेतल्यापासून सरकारच्या विविध योजनांतर्गत तसेच स्वत:च्या फंडातून रुपये ५ कोटी, ८८ लाखांचा भरीव निधी भाईंनी वणंदच्या विकासासाठी मिळवला. त्यासाठी राज्य सरकारच्या संबंधित सर्वच खात्यांनी मदत केली. यावर बोलताना भाई म्हणतात की, “आज मी आमदार आहे ते केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आई-बाबांचे ऋण कोणीही फेडू शकत नाही. या पार्श्वभूमीवर माता रमाईचे गाव दत्तक घ्यावे असे ठरवले. कारण, त्या माऊलीच्या अपार सहनशीलतेला अंत नव्हता. तिच्या त्यागाचे बळ मोठे आहे. बाबासाहेबांचे मोठेपण आहेच, पण रमाईच्या त्यागाचे उतराई होण्यासाठी मी खारीचा वाटा उचलायचे ठरवले. अर्थात, यासाठी मला मार्गदर्शन केले ते कर्मवीर दादा इदाते यांनी.”

 

 
 

वणंदचा विकास करताना सरकारी अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण केले गेले. त्यानुसार १५ विकास कामे निश्चित केली गेली. त्यापैकी १० विकास कामे पूर्ण झाली आणि पाच कामे थोड्याच काळात पूर्ण होणार आहेत. या विकास कामांमध्ये रस्त्यावरचे दिवे, रस्ते, पाणी, शौचालये वगैरे पायाभूत सुविधा आहेतच. पण सगळ्यात मोठ्या दोन घटकांचा समावेश आहे आणि ते म्हणजे,माता रमाई स्मारकाचे सुशोभिकरण आणि दुसरे या स्मारकाला लागूनच असलेल्या टुमदार दुमजली निवासस्थानाची आणि विश्रामगृहाची निर्मिती त्यानुसार १० शौचालयांची बांधणी.

 

आता कोणाला वाटेल त्यात काय आहे? विकास म्हटला की, असे कुठेतरी काहीतरी बांधावे लागते. पण, वणंदचा विकास या पलीकडचा आहे. कारण, कोरेगाव-भीमाच्या त्या काळीमा फासणाऱ्या वास्तवानंतर नाही म्हटले तरी, असे दृश्य दिसत होते की समाज दुभंगला आहे की काय? याचा उल्लेखच करायचे कारण की, वणंदच्या माता रमाई स्मारकाचे सर्वेसर्वा आहेत मीराताई आंबेडकर. हे स्मारक म्हणजे रमाई आंबेडकरांचे जन्मस्थान, घर. या घराला गावाने जपलेले. या ठिकाणी मीराताई आंबेडकरांनी (भारतीय बौद्ध महासभा) या स्थानी रमाईचे स्मारक बांधले. बाबासाहेब आंबेडकरांच्या अंबावडे गावाला भेट देणारे लोक वाट वळवून वणंदला या रमाईच्या स्मारकालाही भेट द्यायला येतात. पण मुळात वणंद गाव छोटे. खास रत्नागिरीच्या परिसराचा उंच सखल अरूंद वळवाटा जोपासणारे. त्यात पूर्वी गावात रस्ते नव्हते, रस्त्यावर वीज नव्हती. पाणी आणि शौचालय सुविधेचीही बोंब. त्यामुळे जगभरातून वणंद गावात रमाईच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी येणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय व्हायची. निवासाला अगदी स्नान आणि प्रात:विधीसाठीची तर गैरसोय शब्दातीतच. पुरुषमंडळी कसेबसे निभावून न्यायची, पण बायाबापड्यांना नदीवर जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यानुसार या स्मारकाचा वापर बहुआयामाने समाजासाठी कसा होईल, अशा पद्धतीने रमाई स्मारकाचे सुशोभीकरण करणे गरजेचे होते. तसेच तिथे भेट देणाऱ्यांना वणंद गावी निवासाची व्यवस्था व्हावी, यासाठी निवास व्यवस्था आणि शौचालय बांधणी गरजेचे होते. दिले अनुदान आणि केले सुशोभीकरण इतके सोपे काम नव्हते. कारण, आधीच सांगितल्याप्रमाणे रमाई स्मारकाचे अधिपत्य मीराताई आंबेडकरांकडे. स्मारकाचे सुशोभीकरण करायचे, तर त्यांची परवानगी आवश्यक. या स्मारकामध्ये कोणतेही राजकारण येणार नाही आणि सुशोभीकरण केले म्हणून हे स्मारक सरकारी खात्यात जमा होणार नाही, या अटीवर स्मारकाचे सुशोभीकरण करण्याची परवानगी मिळवली. यासाठीसमता परिषदेचे पदाधिकारी आणि या गावाच्या विकासामध्ये समन्वयकाची भूमिका निभावणारे चंद्रकात गमरे यांनी खूप मेहनत घेतली. स्मारकाचे सुशोभीकरण करताना गावातल्या लोकांचा सहभाग असणे गरजेचे होते. गावातले बहुतेक लोकं मुंबईकर झालेले. या सर्वांसोबत बैठका घेण्यात आल्या. वणंदच्या विकासाला त्यांचा होकार मिळवला. मग गावात बैठका सुरू झाल्या. अर्थात, ‘गाव तिथे राजकारण’ आलेच. त्यातही कोरेगाव-भीमाच्या पार्श्वभूमीवर गावात या विषयाबाबत मत काय असेल, याचा अंदाज बांधणे चुकीचे होते. पण भाई गिरकर आणि दादा इदाते यांचे मन त्यांना सांगत होते की, हे गाव रमाईचे आहे. रमाईची सहनशीलता आणि कल्याणासाठीचा त्याग मातीतच आहे. त्यामुळे गावातल्या सात वाड्यांवर बैठका घेताना भाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना फारसा ताण जाणवला नाही.

 
तरीही विकास कामे करताना ज्यांच्या जमिनी हव्या होत्या, त्यांचे मन वळवणे मोठे दिव्यच होते. त्यातही धुत्रे कुटुंबीयांनी मोठ्या मनाने जमिनीबाबत सहकार्य केले खरे. गावाचे अध्यक्ष दिपक गुजर, तर सरपंच आहेत सुवर्णा खळे. जातीय समीकरणात रमाईच्या स्मारक सुशोभीकरणामध्ये आणि बाजूच्या विश्रांतीगृहाच्या बांधणीमध्ये यांना रस असेल का? असे वाटू शकत होते. पण नाही. गावातल्या सात वाड्या आणि सर्वजण जातीपाती विसरून एकत्र आले. कारण, स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षात गावातील रस्ते, पाणी व्यवस्था आणि तत्सम मूलभूत सुविधेचा विचार केला जाणार होता. त्यामुळे गावातल्या सातही वाड्या एकत्र आल्या आणि एकोप्याने सहकार्याला तयार झाल्या. त्यामुळे रमाई स्मारकाचे सुशोभीकरण आणि बाजूच्या निवासगृहाच्या बांधणीला बळ मिळाले. पण म्हणतात ना, ‘घर बांधावे पाहून.’ हे घर नाही, तर लोकवास्तू होती. त्यामुळे नियोजन आणि आराखड्यानुसार यासाठी मोठा खर्च येणार होता. त्या खर्चाचे नियोजन करताना भाई गिरकरांनी शासनाच्या विविध योजनांचा उपयोग करून केला. या वास्तूंच्या उद्घटनाचा सोहळा समन्वयक चंद्रकांत गमरे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने यथोचित दिमाखात योजला होता. दादा इदाते, भाई गिरकर आणि भीमराव आंबेडकर या उद्घाटनाला आले. त्याचबरोबर या वास्तूंशी संबंधित सर्वच शासकीय अधिकारी, समाजवर्गाचे प्रतिनिधी, गावातले मान्यवर आले. यावेळी भीमराव आंबेडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. “माता रमाईच्या जन्मगावाच्या विकास कामी आपण खांद्याला खांदा लावून सोबत आहोत,” असे ते म्हणाले. रमाईच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्यासाठी इथे त्यांच्या जीवनावर स्मृतिशिल्पेही उभारणार आहेत. रमाईच्या जीवनावर शिल्पनिर्मिती करण्यासाठी भीमराव आंबेडकरांनी नाव सुचवले ते दादरच्या प्रमोद जोशी यांचे. रमाईचे जीवनचरित्र त्यांनी अभ्यासले. यापूर्वी अशा अनेक उपक्रमांमध्ये ते सहभागीही झाले आहेत. त्यामुळे ते या शिल्पांना न्याय देतीलच. पण एक समरसतेची जाणीव म्हणून मला या सर्व प्रकारांचे अप्रूप वाटले. कारण, समाजात काही नतद्रष्ट व्यक्ती इतिहासाचे विकृतीकरण करून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्या वणव्याने नकळत कित्येकांच्या मनात जातीय विष पेरले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘मी मराठा,’ ‘तू ब्राह्मण,’ ‘तू अमुक-मी तमुक’ असले जातीय विखार इथे नव्हतेच. कोरेगाव-भीमाच्या दंगलीनंतर आपली भाकरी भाजून घेणाऱ्यांनी या गावात एकदा यावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जातीपलीकडचा विकासवाद आणि राष्ट्रवाद इथे जोपासला गेला आहे. हा कार्यक्रम अत्यंत आत्मीय वातावरणात पार पडला. कोणतेही राजकारण करणार नाही, हा शब्द भाजप आ. भाई गिरकरांनी पाळला. त्यामुळे तिथे राजकीय नेते किंवा झेंड्यांची अनुपस्थिती होती. कितीही राजकारण नाही म्हटले तरी, लोकांच्या ओठावर येत होते की भाजपच्या राज्यातच वणंदचा विकास होत आहे.
 

 
 

वणंदची कथा इथे संपत नाही पण, वणंदच्या विकासासोबतच या गावापासून काही अंतरावर असलेल्या ‘कालकाईचे कोंड’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जागेचाही विकास करण्याचे काम आ. भाई गिरकर यांनी शासकीय निधीतून केले. या कामी सुधीर मुंगटीवार, राजकुमार बडोले यांचे खूप सहकार्य झाले. ‘कालकाईचे कोंड’ म्हणजे काय बरं? असा प्रश्न मनात आलाच असेल. तर हा एक ऐतिहासिक परिसरच आहे. लष्करातून निवृत्त झाल्यावर रामजी आंबेडकर हे कुटुंबाला घेऊन १८९६ साली किंवा मागे-पुढे या ‘कालकाईचे कोंड’ला आले. तिथे ते दोन वर्ष राहिले. त्यांचा आणि बाबासाहेबांचा निवास ज्या जागेवर होता ती वास्तू तिथे होती. गावातल्या लोकांना पिढ्यानपिढ्या हे माहिती होते. गावकऱ्यांनी या जागेवर बाबासाहेबांचे स्मारक करण्याचे ठरवले. पण सरकार दरबारी ती जागा काझी नावाच्या माणसाची होती. ‘बौद्धजन सेवा संघा’ च्या कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्नपूर्वक ती जागा मिळवली. तिथे बाबसाहेबांच्या नावाने समाजभवन बांधले. त्या समाजभवनाचे नूतनीकरण होणे गरजेचे होते. आ. भाई गिरकरांनी या नूतनीकरणासाठीही अनुदान उपलब्ध करून दिले. बाबासाहेबांचा निवास असलेल्या वास्तूचे मूळ रूप जपून ती टिकावी यासाठीही निधी उपलब्ध करून दिला. कारण, बाबासाहेबांच्या निवासाने पवित्र झालेल्या वास्तूंना ऐतिहासिक, सामाजिक आणि तितकेच भावनिक महत्त्व आहे. लंडनचे घर, दादरचे राजगृह सगळ्यांनाच माहीत आहे. पण ‘कालकाईचे कोंड’ अप्रसिद्धच. त्यामुळे ऐतिहासिक आब राखत या वास्तूचे नूतनीकरण होणे गरजेचे होते.

 

 
 

निळ्या डोळ्यात लाल स्वप्न’ पेरण्याची भाषा करणारे, “आज जय भीम म्हणण्या आधी आपलं रगत तपासण्याची” भाषा करतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे विकृतीकरण करतात. नव्हे त्यांच्या नावाने नेमके त्यांनी नाकरलेलेच ते करतात. या पार्श्वभूमीवर भाजप राज्यसरकारचेआ. भाई गिरकर आणि सहकाऱ्यांचे, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यध्यक्ष भीमराव आंबेडकर आणि वणंदवासीयांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेकारण

 

माझ्या भीमाच्या नावाचं

कुंकू लाविलं रमानं...

 

त्या रमाईच्या स्मृतींना खऱ्या अर्थाने समाजपटलावर आणण्याचे काम होत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat