पाकिस्तानची उडाली घाबरगुंडी; मागितली एक संधी

25 Feb 2019 13:25:21


 


इस्लामाबाद : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे. याचाच परिणाम म्हणून पाकिस्तानने भारताकडे शांततेसाठी एक संधी देण्याची भीक मागितली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटवर याबाबत पाकिस्तानने आपली अधिकृत भूमिका मांडली आहे. मात्र पाकिस्तानने पुरावे देण्याचा आपला जुनाच अध्याय पुढे सुरु ठेवण्याच्या प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.

 

'पंतप्रधान इम्रान खान त्यांच्या शब्दावर कायम असून जर भारताने योग्य ते पुरावे दिले, तर आम्ही तातडीने कारवाई करू.' असे पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. पाकिस्तान दहशतवादाविरुद्ध लढण्यास तयार असून पंतप्रधान मोदींनी शांततेसाठी पाकिस्तानला एक संधी द्यावी अशी विनंती या पत्रकात केली आहे. यावरून भारताच्या आक्रमक पवित्र्याने पाकिस्तान पुरता बिथरून गेल्याचे दिसून येत आहे.

 
 
 

दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. यानंतर देशभरात संतापाची मोठी लाट दिसून आली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वतंत्र दिले होते. यासोबतच त्यांनी पाकिस्तानच्या चोहीबाजूने नाड्या आवळण्यास सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदींच्या या आक्रमक पावित्र्यापुढे भारताशी दोन हात करू अशा बड्या बाता मारणाऱ्या पाकिस्तानने आठवड्याभरात गुढगे टेकत मोदींकडे शांततेची भीक मागितली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0