ये दिल मांगे मोर...

    दिनांक  25-Feb-2019   

 

 
 
 
 
शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मनोज मोरे यांनी आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीयस्तरावरील वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये असंख्य सुवर्णपदके मिळवली आहेत. त्यांची प्रेरणा, यशाचे गमक याचा आढावा घेणारा हा लेख..
 

या वर्षी पुरस्कारप्राप्तीसाठीची प्रक्रिया संगणकीय होत असल्यामुळे ती अत्यंत पारदर्शक होती. कोणत्या खेळाडूने किती निकष कधी पूर्ण केले याचा तपशील सगळेच पाहू शकत होते. मी या प्रक्रियेतून पार पडलो होतो. त्यामुळे जेव्हा मला ‘छत्रपती पुरस्कार’ मिळाल्याचे जाहीर झाले, तेव्हा मला अत्यानंद झाला. कारण, मी तीन वर्षांपासून या पुरस्कारासाठी अर्ज करत होतो. पण, पुरस्कार मिळत नव्हता. आज माझे वडील हयात नाहीत. पण, त्यांचे शब्द आठवले आणि ती घटना आठवली,” असे ‘शिवछत्रपती पुरस्कारा’चे मानकरी मनोज मोरे सांगत होते. मनोज यांना प्रेरणा देणारी ‘ती’ घटना कोणती? तर ती गोष्ट आहे, मनोज यांच्या लहानपणीची. त्यांनी शाळेतील क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. पण, स्पर्धेत त्यांना कोणतेही पदक मिळाले नाही. त्यामुळे ते प्रचंड दु:खी झाले. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी म्हणजे, मनोहर मोरे यांनी समजावले होते की,”ती स्पर्धा आता संपली. ते पदकही विजेत्याला मिळाले. आता रडत बसू नको. पुन्हा स्पर्धा येईल. त्यामध्ये पदक मिळवण्यासाठी आतापासून तयारी कर. उठ चल.” मनोज म्हणतात, “माझ्या वडिलांचे शब्द आजही माझ्या मनात कोरलेले आहेत.”

 

मनोज यांनी वडिलांचे शब्द नुसते ऐकलेच नाहीत, तर त्या शब्दांवर आयुष्याचे लक्ष्य कायम केले. त्याचीच फलश्रुती म्हणजे त्यांना राष्ट्रीयस्तरावरील वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये ६० सुवर्णपदके मिळाली, तर ‘कॉमन वेल्थ’ तसेच ‘आशियान स्पर्धा’ या आंतरराष्ट्रीयस्तरांवरील स्पर्धांमध्येही सुवर्णपदके प्राप्त केलेली आहेत. तसेच त्यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘स्ट्राँग मॅन ऑफ इंडिया’ हा मानाचा किताबही मिळाला आहे. नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती पुरस्कार’ही मिळाला. सातत्याने मिळणारी सुवर्णपदकं, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकं यांनी मनोज मोरे यांचे घर आणि खेळाचे भावविश्वही समृद्ध झाले.

 

मनोज यांचे वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारामध्ये मोठे योगदान आहे. सातत्यपूर्ण सराव, त्यासाठी लक्ष्य ठरवून त्या आड येणारे सर्वच घटक नाकारणे ही सोपी गोष्ट नाही. पण, मनोज मोरे यांनी हे आवाहन सहजतेने पेलले. मुंबई गोवंडी येथे त्यांचे घर आहे. त्यांना सर्वच स्तरांतील मित्र आहेत. पण, खेळासाठी सर्वस्व अर्पण करण्याच्या जिद्दीने ते सिद्ध झाले. त्यांचे वडील शूटिंग बॉल खेळायचे. मोठा भाऊ व्यायामपटू आणि वेटलिफ्टर आहे. त्यामुळे घरी खेळाला अनुकूल वातावरण. पण, मनोज यांच्या क्रीडागुणांची उजळणी झाली ती चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत. एकदा मुंबई महानगरपालिकेची विभागस्तरावरील धावण्याची स्पर्धा होती. या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले ते शाळेतील शिक्षक विठ्ठल कांबळे यांनी. “तू खेळू शकतोस आणि तू जिंकशीलच,” असे त्यांनी मनोज यांना सांगितले. त्यांनी हे वाक्य लक्षात ठेवून सराव केला आणि ती स्पर्धा जिंकलीही. पुढे ते सर्वच प्रकारांतील मैदानी खेळ खेळू लागले. मग ते आट्यापाट्या असू देत, खो-खो असू दे वा क्रिकेट. मात्र, दहावीला असताना मोठ्या भावाने वेटलिफ्टिंगची खर्या अर्थाने त्यांना ओळख करून दिली. ते मनापासून वेटलिफ्टिंगचा सराव करू लागले. सुरुवातीला जिल्हास्तरीय स्पर्धेपर्यंत पोहोचले. पण सलग तीन वेळाही त्यांना स्पर्धेत यश आले नाही. त्यावेळी ते विचार करत की असे का होते? खूप चिंतन केल्यानंतर त्यांनी ठरवले की, अर्जुनाला जसा माशाचा डोळाच दिसत होता, तसे मला माझ्या खेळाचे लक्ष्य दिसते का? या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी फक्त आणि फक्त वेटलिफ्टिंग खेळाकडे लक्ष दिले. त्या अनुषंगाने फिटनेसचे प्रशिक्षण घेतले. पोषण आहाराचे प्रशिक्षण घेतले. त्यानुसार त्यांचा दिनक्रम ठरला. कितीही काहीही झाले तरी त्यात बदल केला नाही. जवळ जवळ १९९७ पासून त्यांचा सराव, त्यांचा दिनक्रम कायम झाला. हे सगळे करताना विजेत्या स्पर्धकांच्या क्रीडाकौशल्यांचाही त्यांनी अभ्यास केला. “ईश्वराने जे मला माणूस म्हणून दिले आहे, तेच त्या स्पर्धकांनाही दिले आहे. त्यामुळे मीसुद्धा स्पर्धा जिंकू शकतो,” हे त्यांना समजले.

 

मग त्यानंतर मनोज यांनी कधी माघारी वळून पाहिलेच नाही. प्रत्येक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत गेले. संजय भास्करन हे ‘अर्जुन पुरस्कार’प्राप्त शिक्षक त्यांचे आदर्श आहेत. तसेच पी.आय. खंदारे यांचेही त्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन आहे. मात्र, प्रत्येक खेळात दोन- दोन फेडरेशन्स तयार होतात. त्यामुळे खेळाडूंचे नुकसान होते. जर प्रत्येक खेळाडूंसाठी शासनमान्य एकच फेडरेशन असेल, तर खेळाडू उत्साहपूर्ण वातावरणात कोणतीही कटुता, विसंगती न येता खेळू शकतील, असे त्यांचे मत आहे. सध्या नायगाव-१ साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असलेले मनोज समाजामध्ये या क्रीडा प्रकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी तसेच सामान्य कुटुंबामध्येही उत्कृष्ट वेटलिफ्टर तयार व्हावेत यासाठी काम करत आहेत. ज्या मुलांना वेटलिफ्टिंगमध्ये मनापासून रस आहे, अशा काही मुलांना ते सर्वप्रकारचे विनामूल्य मार्गदर्शन व प्रशिक्षणही देतात. ते म्हणतात, “खेळ म्हटला की जय-पराजय आलाच. पण ‘ये दिल मांगे मोरची...’ जिद्द मनात कायम असायला हवी.”

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat