नव्या दमाचा ‘नोटबुक’ प्रेक्षकांच्या भेटीला!

24 Feb 2019 18:40:43

 

 
 
 
 
मुंबई : ‘नोटबुक’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्याच त्याच, टुकार प्रेमकथांना बाजूला सारून, प्रेमकथा असूनही, एक नवा ट्रेंड निर्माण करण्याचा प्रयत्न ‘नोटबुक’च्या ट्रेलरमधून केलेला पाहायला मिळतो. काश्मीरमधील लोकवस्तीपासून दूर वसलेल्या एका शाळेत शिकवणारी शिक्षिका आणि तिला कधीही न पाहता तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला त्याच शाळेतील शिक्षक यांची ही कथा आहे. शिक्षिकेने लिहिलेली नोटबुक वाचून तो तिच्या प्रेमात पडतो. दोघांमध्ये खुलत जाणारे निस्वार्थी प्रेम ‘नोटबुक’ या सिनेमातून दाखविण्यात आले आहे.
 

सलमान खानची निर्मिती असलेल्या ‘नोटबुक’या सिनेमातून नवोदित अभिनेता जहीर इक्बाल आणि नवोदित अभिनेत्री प्रनूतन बहल बॉलिवुडमध्ये पदार्पण करत आहेत. बॉलिवुडमधील ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री नूतन यांची प्रनूतन बहल ही नात आहे. अभिनेता मोहनीश बहल यांची ती मुलगी आहे. नितीन कक्कर यांनी ‘नोटबुक’या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून येत्या २९ मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 
 
 

दरम्यान, या सिनेमाचा निर्माता अभिनेता सलमान खानने, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानी गायक आतिफ असलमने गायलेले ‘नोटबुक’मधील गाणे काढून टाकले आहे. आतिफऐवजी दुसऱ्या गायकाच्या आवाजात हे गाणे पुन्हा नव्याने रेकॉर्ड करण्यात आले. सिनेमातील उत्तम संगीताची झलक ‘नोटबुक’च्या ट्रेलर मधून पाहायला मिळते. २००० साली प्रदर्शित झालेल्या, ह्रतिक रोशन आणि संजय दत्तच्या, ‘मिशन काश्मीर’ या सिनेमातील, ‘बुमरो, बुमरो’ हे गाणे एका नव्या रुपात ‘नोटबुक’ मधून सादर करण्यात आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0