प्रकाशबापूंचे प्रेम

    दिनांक  24-Feb-2019   

 

 
 
 
 
एक मात्र खरे की, प्रकाश आंबेडकरांसारख्या आणि ओवेसींसारख्या लोकांचे मनू आणि आता मनूसोबत पेशवे यांच्यावर भारी प्रेम आहे. त्यामुळेच कुठेही काहीही झाले की, हे लोक ‘मनू मनू, पेशवा पेशवा’ म्हणत उर बडवतात. कालच्या वंचित आघाडीच्या सभेमध्ये म्हणून तर प्रकाश आंबेडकर यांनी मनूची आठवण काढली तर त्यांचे सहयोगी ओवेसी यांनी पेशव्यांची आठवण काढली. अर्थात मनुवाद हा जातीय विखार असेल तर तो कुणालाही नकोच. पण पेशव्यांचा इतिहास खरे तर शौर्याचाच इतिहास. या सभेत ओवेसी म्हणाले, “समोर सगळे पेशवे आहेत आणि त्यांना विरोध करण्यासाठी वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांचे हात मजबूत करा.” हसावे की रडावे काही कळत नाही. अलुतेदार-बलुतेदार वगैरे शब्दप्रयोग वंचित आघाडीच्या सभेत ऐकले आणि प्रसिद्ध लेखक दया पवार यांचे ‘बलुतं’ आत्मचरित्र आठवले. वंशपरंपरागत व्यवसाय नाकारले आणि नव्या वाटा चोखाळल्या अशा कितीतरी व्यक्तींचे जगणे आठवले. प्रकाश आंबेडकरांनी बलुतेदारांना कलाकार मानून त्यांना कर्जवाटप करू, असे म्हटले. पण अलुतेदार समाजाचे काय हो? अलुतेदार समाजाला कोणता व्यवसाय करण्यासाठी कर्ज देणार? मुळात अलुतेदार म्हणजे ज्यांना वाणी, विद्या वश आहे, तो समाज. बुद्धीचातुर्य, वाक्पटुता यांची धार परजत जगण्याचा संघर्ष करणारा हा समाज. समाजव्यवस्थेत अलुतेदारीचा परंपरागत व्यवसाय कुठे गेला, याचे भानही प्रकाश आंबेडकरांना नाहीच. उदाहरणार्थ- देवीपुढे गोंधळ घालणारा गोंधळी आणि वंशावळी तयार करणारा भाट समाज यांचे परंपरागत जातीनिहाय व्यवसायाचे वास्तव सध्या काय आहे? हे त्या समाजातील बांधवांनाच माहिती. तसेच काँग्रेस जागावाटपाबाबत ताकास तूर लागू देत नाही म्हणून प्रकाश आंबेडकरांनी परस्पर रा.स्व.संघाला मध्ये खेचले. रा. स्व. संघाला संविधानाच्या चौकटीत बसवण्यासाठी काँग्रेस काय करणार आहे, याचे उत्तर काँग्रेसने दिले नाही म्हणून काँग्रेसशी मतभेद आहेत, असेही प्रकाश म्हणाले. आपले प्रियजन आपल्याला जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी आठवतात. प्रेमच असते ते. प्रकाशरावांनाही संघाच्या बाबतीत तशीच काही प्रेमभावना असावी. त्याशिवाय का त्यांनाही सर्वत्र संघच दिसतो!
 

नया है वह...

 

शिवाजी पार्क दादरच्या सभेत प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या लौकिकाला साजेसे खूप काही अनावश्यक, अर्थहीन आणि कशाला कशाचा संदर्भ नसलेली वक्तव्येही केली. पण या साऱ्या वक्तव्यांचे मुकुटमणी ठरावे, असे विधान म्हणजे अलुतेदार-बलुतेदार हे कारागीर व कलाकार आहेत. त्यांना आम्ही कुठचेही तारण न घेता ९० टक्के कर्ज देऊ. आता या वाक्याला मुकुटमणी का म्हणावे वाटते तर कोणतेही तारण न घेता हे महाशय ९० टक्के कर्ज देणार आहेत? तेही फक्त अलुतेदार-बलुतेदार लोकांनाच बरं का? प्रकाश आंबेडकरांचे एकंदर सामाजिक वास्तव आणि ऐतिहासिक भान पाहिले की, खरंच वाईट वाटते. वंचित समाजाच्या नावाने सभा घेणाऱ्या या स्वयंघोषित वंचितांच्या तारणहारास सध्या भारतामध्ये वंचित तसेच पारंपरिक कारागीर समाजाचे वास्तव काय आहे, याचेही भान नाही. कारागिरी किंवा कलाकारी ही कोणा एका जातीत जन्म घेतलेल्याची मक्तेदारी नाही. अलुतेदार आणि बलुतेदार पद्धती परस्परावलंबी व्यवस्था होत्या. काही प्रमाणात त्या आजही आहेत. पण जातीनिहाय परंपरागत व्यवसाय करण्याचे सक्तीचे काम आता बहुतेक सगळ्याच जातींनी सोडले आहेमात्र, वंचित आघाडीची सभा घेताना समाजाला पुन्हा अलुतेदारी आणि बलुतेदारीमध्ये गुंतवण्याचा घाट प्रकाश आंबेडकरांनी घातला आहे. किती दुर्दैव की, जातीनुसार व्यवसाय करण्याचा तेवढा पर्याय शिल्लक ठेवणाऱ्या आणि त्यानुसार जातीच्या भिंती कायम ठेवणाऱ्या परंपरागत व्यवसायाची सक्ती करणाऱ्या व्यवस्थेवर बाबासाहेबांनी प्रहार केले. मात्र, बाबासाहेबांच्या वंशात जन्मलेल्या प्रकाश आंबेडकरांनी मात्र वंचित समाजाला पुन्हा त्यांच्या जातीनिहाय कामात गुंतवून ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जन्माने कुणाचेही कर्तृत्व ठरत नाही किंवा वंशपरंपरेने कुणालाही सर्जनशिलता विद्वत्ता जन्मतःच येत नाही. त्यामुळे एका समाजात जन्म घेतला म्हणून त्या व्यक्तीला कारागीर, कलाकार समजणे हे तर खूपच हास्यास्पद आहे. कारण अलुतेदारी-बलुतेदारी कामे पूर्वी होती, ती केवळ समाजव्यवस्थेचा भाग होती म्हणून. आता ते निकष बदलले आहेत. मात्र, कोरेगाव-भिमानंतर प्रकाशझोतात आलेले प्रकाशराव हे निकष समजूच शकत नाहीत. थोडक्यात काय तर नया है वह...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat