बलात्कारी व्यवस्थेविरोधात...

    दिनांक  24-Feb-2019   

 

 
 
 
 
नायजेरियातील सिस्टर वेरोनिका ओपनिबो यांनी गेल्या आठवड्यात कलीसिया (चर्च) मधील मुलींची सुरक्षा याविषयीच्या संमेलनाला संबोधित केले. विषय इतका गंभीर आणि गेल्या काही काळात ननवरील अत्याचारांची प्रकरणे पाहता याविरोधात आवाज उठवण्यासाठी कुठेतरी सुरुवात होणे गरजेचे होतेच.
 
 
आवाज यापूर्वीही उठविण्यात आला मात्र, तो कायम बलाढ्य धार्मिक व्यवस्थेचा बुरखा घालणाऱ्यांनी दाबून टाकत बलात्कारी व्यवस्था सुरळीत सुरू ठेवली. असुरी शक्तींवर चांगल्याचा विजय जसा निश्चित तसाच चर्चमधील काळ्या जगाविरोधातही आता जगाच्या व्यासपीठावरून आवाज उठण्यास सुरुवात झाली, हे आशादायी म्हणावे लागेल. सिस्टर वेरोनिका ओपनिबो यांनी चर्चमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी बिशपसमोर केली. सोसायटी ऑफ होली चाईल्ड जिजस या संस्थेच्या अध्यक्षपदी वेरोनिका आहेत. दक्षिण आफ्रिका, युरोप, संयुक्त राष्ट्र आदी ठिकाणी त्यांनी ख्रिश्चन धर्मासाठी काम केले आहे. आपल्या नम्र आवाजात दिलेल्या या कठोर इशाऱ्याची चर्चा शनिवारपासून जगभरात झाली. ननवरील अत्याचार कदापि खपवून घेतला जाणार नाही, असा थेट इशारा जागतिक संमेलनातून त्यांनी दिला. संमेलनाच्या समारोपप्रसंगी जगभरातील दोनशे प्रमुख चर्चच्या बिशपना पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकन या ख्रिस्ती धर्मीयांच्या श्रद्धास्थानी निमंत्रित केले होते.
 

केरळमध्ये असेच एक प्रकरण गाजले होते. ख्रिस्ती धर्मीयांकडून धर्मांतराच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या महिलांवरील अत्याचाराविरोधात चर्चला मोठी किंमत मोजावी लागली. केरळच्या फ्रँको मुलक्कल याने कोट्टायम कॉन्व्हेंटच्या एका ननवर मे २०१४ ते सप्टेंबर २०१६ दरम्यान तब्बल १३ वेळा अत्याचार केला. तक्रार करून दीड महिना उलटूनही कारवाई झाली नाही. अत्याचाराविरोधात ख्रिस्ती संघटनांनी आवाज उठवला. रस्त्यावर येऊन बिशपविरोधात कारवाईची मागणी केली. मात्र, थेट राज्य पोलिसांनीही या प्रकरणी कानावर हात ठेवत प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम केले. अत्याचारपीडितेची सात वेळा चौकशी आणि ज्याने अत्याचार केला त्याची चौकशी केवळ एकदाच... अशा एक ना अनेक घटनांनी बदनाम झालेल्या व्यववस्थेविरोधात आवाज उठवण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यौनशोषणाविरोधात एकत्र आलेल्या या संमेलनातून तरी ही व्यवस्था सुधारेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. अशा अत्याचाराच्या घटनांमुळे धर्माबद्दलची विश्वासार्हता गमावण्याची वेळ आल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

 
सिस्टर वेरोनिका यांनी सहिष्णुतेचा प्रस्ताव यावेळी मांडला आहे. जगात सुरू असलेल्या अत्याचाराच्या घटनांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. आफ्रिका, युरोप आदी विविध ठिकाणी अध्ययनासाठी फिरणाऱ्या सिस्टर वेरोनिका यांनी यावेळी उपस्थितांपुढे अत्याचार पीडितांसाठी काम करताना आलेल्या हृदयद्रावक प्रसंगांचा उल्लेख केला. हा अत्याचाराचा मुद्दा गंभीर असल्याचे, तसेच त्यांनी ९० च्या दशकापासून असा प्रकार पहिल्यांदाच पाहिल्याचा उल्लेख केला. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो. त्यामुळे अत्याचाराविरोधात एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज या संमेलनात व्यक्त करण्यात आली आहे. अनेक अत्याचारपीडितांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांच्या समस्या ऐकून त्यांना सामान्य आयुष्यात पुन्हा घेऊन येण्याचे काम वेरोनिका करतात. आशिया खंडातील अनेक गरीब देशांमध्ये अजूनही अशा अत्याचारांविरोधात आवाज उठवण्यासाठी कुणी पुढे येत नसल्याने त्यांनाही सोबत घेऊन मानवता, संवेदनशीलता जपण्याच्या कार्यात समाविष्ट करण्याची गरज असल्याचे यावेळी वक्त्यांद्वारे सांगण्यात आले.
 

या सगळ्यावर पोप फ्रान्सिस यांची प्रतिक्रिया महत्त्वाची होती. ननवर अत्याचार करणारे पाद्री हे सैतानाचेच रूप आहेत. अशा अत्याचाराच्या घटना चर्च आणि धर्माचे पावित्र्य बाधित करणाऱ्या असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली असून जगभरातील वरिष्ठ ११३ बिशपना अत्याचाराच्या घटनांवर कारवाई करण्यासाठीची नियमावलीही तयार करून दिली आहे. या पार्श्वभूमीवर ननवरील अत्याचाराच्या घटनांना कितपत आळा बसेल, अशा संमेलनाची पुन्हा कितपत गरज भासेल, हा येणारा काळच ठरवणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat