‘पुन्हा सही रे सही’ च्या टीमची गैरसोय!

23 Feb 2019 17:54:12


 
 
 
 
नागपूर : सध्या नागपुरमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन सुरु आहे. या नाट्य संमेलनादरम्यान, ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाच्या टीमची गैरसोय झाली. ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा प्रयोग नाट्य संमेलनात ठेवण्यात आला होता. शुक्रवारी या नाटकाचा प्रयोग होणार होता. नाटकाची टीम आपल्या नेपथ्यासह नागपुरामध्ये आली.
 

मुंबई ते नागपूर असा तब्बल २२ तासांचा प्रवास करून नाटकाची टीम नागपूरमध्ये पोहोचली. लांबच्या प्रवासानंतर कलाकारांनी विश्रांती घेणे, साहाजिकच होते. तसेच आंघोळ आणि इतर तयारी करणेही आवश्यक होते. त्यासाठी वेगळी जागा असणे आवश्यक होते. आयोजकांनी सांगितलेल्या पत्त्यानुसार संबंधित जागा शोधण्यात वेळ गेला. परिणामी, नाटकाच्या टीमची बस नागपुरमध्ये ३ तास फिरत, पत्ता शोधत होती. आणखी वेळ वाया जाऊ नये म्हणून थिएटरवरच आंघोळी उरकण्याचा सल्ला आयोजकांनी नाटकाच्या टीमला दिला.

 

 
 

तब्बल २२ तासांच्या प्रवासानंतर आम्ही खूप थकलो होतो. थोडी विश्रांती घेणे आणि फ्रेश होणे गरजेचे होते. ‘पुन्हा सही रे सही’ हे नाटक खूप जलद असल्याने नाटकापूर्वी थोडा आराम हवाच होता. जागेचा पत्ता शोधताना, आयोजकांसोबत फोनवर झालेल्या संवादात ऐकण्यात गफलत झाली आणि नागपुरमध्ये आम्ही ३ तास फिरत राहिलो. त्यामुळे घडलेल्या प्रकाराची आम्हाला प्रचंड चीड आली होती. पुन्हा सही रे सही या नाटकातील प्रमुख अभिनेते भरत जाधव यांना आम्ही घडल्याप्रकारबाबत काहीच सांगणार नव्हतो. परंतु भरत जाधव यांच्या कानावर ही गोष्ट गेलीच आणि त्यांनी याप्रकरणी लक्ष देत आमची बाजू मांडली. त्यानंतर आमची योग्य ती व्यवस्था करण्यात आली.” अशी माहिती ‘पुन्हा सही रे सही या नाटकातील एका कलाकाराने दिली. अभिनेते भरत जाधव हे नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळात आहेत. त्यांच्याच नाटकाच्या टीमला अशाप्रकारच्या गैरसोयीचा अनुभव येणे. हे दुर्दैव्य आहे. अशी चर्चा याबाबत केल जात आहे.

 

कलाकारांच्या मदतीला भरत जाधव सदैव तत्पर...

 

अभिनेते भरत जाधव यांनी याप्रकरणी लक्ष घातल्यानंतर नाटकाच्या टीमची आयोजकांकडून योग्य ती व्यवस्था करण्यात आली. नाटकाच्या प्रयोगानंतर ‘पुन्हा सही रे सही’ ची टीम लगेच परतीच्या प्रवासाला निघणार होती. प्रयोग झाल्यानंतर नाटकाच्या टीमला योग्य जेवण मिळेल, याची दक्षता भरत जाधव यांनी घेतली. ‘पुन्हा सही रे सही’ च्या टीमला आलेल्या या अनुभवामुळे भरत जाधव नाराज झाले. भरत जाधव नागपुरला विमानाने आले होते. तसेच ते परतीचा प्रवासदेखील विमानानेच करणार होते. परंतु घडलेल्या प्रकारामुळे आपले विमानाचे तिकीट रद्द करून भरत जाधव यांनी मुंबईचा प्रवास नाटकाच्या टीमसोबत बसने करण्याची तयारी दर्शविली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0