नदी प्रदूषण रोखण्यासाठी ‘अर्बन डायलॉग’...

    दिनांक  23-Feb-2019   


 


नासर्डी नदीचा शास्त्रीय अभ्यास करून तयार झालेला अहवाल त्या नाशिक महानगरपालिकेला सादर करणार आहेत. त्यामुळे गोदाकाठी इतिहास आणि भविष्य यांची सांगड घालत नासर्डी नदीचे प्रदूषण रोखण्याच्या कामात तरुण पिढी कार्यरत असल्याने लवकरच गोदातीर समृद्ध होण्याची आस बाळगावयास हरकत नाही.


नाशिक म्हणजे गोदातीरी वसलेले शहर. याच गोदावरीच्या अनेक उपनद्या असून त्यातीलच एक उपनदी म्हणजे नासर्डी. या नासर्डी नदीचे नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे या नदीच्या आताच्या असणाऱ्या रूपामुळे तिचे गत सौंदर्य हे प्रदूषणामुळे लोप पावले आहे. नदीचे बदललेले हे रूप नदीसाठी आणि येथील नागरिकांसाठी दु:खदायक बाब बनली आहे. या दुःखाची जाणीव नाशिक शहरातील मृण्मयी चौधरी-पेंडसे आणि शिल्पा डहाके या दोन वास्तुविशारद तरुणींना झाली. आणि केवळ दुःख कवटाळून बसण्यापेक्षा या नदीला सौंदर्यवान करण्यासाठी व तिचे प्रदूषण रोखले जावे यासाठी या दोन तरुणींनी शहर संवादाची ‘अर्बन डायलॉग’ ही मोहीम हाती घेतली. मूलतः वास्तुविशारद असणाऱ्या तरुणींना सौंदर्य निर्माण करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा असल्याने त्यांनी नासार्डीला तिचे गतवैभव प्राप्त करून देण्याचा चंग बांधला आहे. कोणत्याही कामास शाश्वत स्वरूप प्राप्त होण्यासाठी आवश्यकता असते, ती सुयोग्य नियोजनाची. याच धारणेतून या तरुणींनी नासर्डी नदीची नेमकी समस्या काय आहे, तिचे स्वरूप नाशिक शहराबाहेर कसे आहे आणि शहरात कसे आहे, तिच्या किनाऱ्यावरील जनजीवन कसे आहे, अशा अनेक बाबींचा संशोधनात्मक अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून त्या नासर्डी नदीचे दस्तावेजीकरण तयार करणार आहेत. या सर्व प्रवासाबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, नासर्डी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी नासर्डी नदी जेथे नाशिक शहरात प्रवेश करते त्या सातपूर भागापासून ते जिथे तिचा आणि गोदावरीचा संगम होतो त्या टाकळीपर्यंत प्रवास करून आम्ही या नदीचे अभ्यासपूर्ण निरीक्षण केले आहे. यावेळी नदीचे पात्र कोरण्यात आले असल्याचे त्यांना दिसून आले. तसेच, या माध्यमातून नदीचा मूळ नैसर्गिक प्रवाहदेखील बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे नदीचे पात्र विस्कळीत झाले आहे. तसेच, जलप्रदूषणात महत्त्वाचा घटक असलेले सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येत असल्याचेही त्यांच्या यावेळी निदर्शनास आले. त्याचप्रमाणे उंटवाडी परिसरात तर या नदीचे पात्र घनकचऱ्यामुळे अधिकच प्रदूषित झाले असल्याचे त्या सांगतात. सातपूर ते उंटवाडी या दरम्यान नदीचे पात्र विस्तारलेले आहे. मात्र उंटवाडीजवळ नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाले असल्याचे दिसून येते.

 

नासर्डीला स्वच्छ करण्यासाठी व आपले दस्तावेजीकरण अधिक परिणामकारक व्हावे, याकरिता या नदीची सातपूर ते अंबड- सातपूर लिंक रोड, अंबड- सातपूर लिंक रोड ते मायको हॉस्पिटल, मायको हॉस्पिटल ते उंटवाडी पूल, उंटवाडी पूल ते मुंबई-आग्रा महामार्ग, मुंबई -आग्रा महामार्ग ते नाशिक-पुणे महामार्ग, नाशिक-पुणे महामार्ग ते टाकळी (जेथे गोदा-नासर्डी संगम होतो) अशा सहा विभागात नदीची विभागणी करण्यात आली आहे. आपल्या अहवालासाठी या तरुणींनी नदीकिनाऱ्याचा वापर कसा केला जातो, नदीकिनारी हिरवे आच्छादन किती आहे, तसेच, नदीत समाविष्ट असणाऱ्या नैसर्गिक जलस्त्रोतांची माहिती म्हणजे एका नदीत किती जलप्रवाह आहेत, याबाबत माहिती संकलन करणे, पूररेषेचे नकाशीकरण करणे, नदीला आलेल्या पुराचा इतिहास तपासणे, नदीकिनारी वसलेले शहर व असणारी मोकळी जागा यांबाबत माहिती संकलित करणे, नदी किनारी वसलेल्या लोकसंख्येची माहिती संकलित करणे आदी स्वरूपाचे निकष ठरविले आहेत. याचबरोबर नाशिकमध्ये या तरुणींच्या माध्यमातून गोदावरीशी नाते जोडूया, हा उपक्रमदेखील राबविण्यात येत असतो. या उपक्रमाच्या माध्यमातून गोदावरी नदीची परिक्रमा करण्यात आली. तसेच, ‘गोदावरीशी गप्पाया माध्यमातून गोदावरीसंबंधी आणि तिच्या प्रदूषणाबाबत जनजागृतीदेखील करण्यात आली. या उपक्रमाला नाशिककर नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. तसेच, ‘रिव्हर अ‍ॅक्शन वीक’च्या माध्यमातून गोदावरीच्या कथा, गोदावरीवरील कविता, गोदेशी संबंधित छायाचित्रांची प्रसिद्धी आदी स्वरूपाचे उपक्रमदेखील राबविण्यात आले. या माध्यमातून गोदेचे महत्त्व जनमानसात रुजविण्याचे मोठे कार्य झाले आहे.

 

नदीला तिचे मूळ स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी या तरुणींनी मुंबई येथील तज्ज्ञ अविनाश कुबळ यांच्याशी चर्चा करून शास्त्रीय मार्गदर्शन घेतले आहे. तसेच, यासाठी पर्यावरणतज्ज्ञ जुई पेठे यांचेदेखील मार्गदर्शन त्यांना प्राप्त होत आहे. तसेच, केवळ नाशिकच्या परिक्षेत्रात नदी प्रदूषणासंबंधी जनजागृती निर्माण व्हावी, एवढाच मर्यादित हेतू न ठेवता या तरुणींनी कोपरगाव येथेदेखील याबाबत जनजागृती केली आहे. तसेच, नासर्डी नदीचा उगम जेथे होतो ते ठिकाण म्हणजे बेळगाव ढगा परिसर येथपासून नदीचा असणारा प्रवाह आणि त्यात झालेला बदल याबाबतदेखील त्यांनी अभ्यासपूर्ण निरीक्षण नोंदविले आहे. तसेच या नदीचे उगमस्थान शोधून काढण्यातदेखील त्यांनी योगदान दिले आहे. मात्र, केवळ दोन लोक मिळून या कामात आपले योगदान देऊन नासर्डी नदीचे प्रदूषण रोखू शकणार नाही. त्यामुळे या कार्यात शहरातील नागरिकांनी विशेषत: महाविद्यालयीन तरुणांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात. स्थापत्य रचनेचे ज्यांना शास्त्रीय ज्ञान आहे, अशा वास्तुविशारद क्षेत्रातील तरुणांनी या कार्यात आपला सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा त्या व्यक्त करत आहेत. नासर्डी नदीचा शास्त्रीय अभ्यास करून तयार झालेला अहवाल त्या नाशिक महानगरपालिकेला सादर करणार आहेत. त्यामुळे गोदाकाठी इतिहास आणि भविष्य यांची सांगड घालत नासर्डी नदीचे प्रदूषण रोखण्याच्या कामात तरुण पिढी कार्यरत असल्याने लवकरच गोदातीर समृद्ध होण्याची आस बाळगावयास हरकत नाही.

 

दागिन्यांच्या माध्यमातूनदेखील रोखले जाते नदीप्रदूषण

 

दागिन्यांच्या माध्यमातूनदेखील या तरुणी नदीप्रदूषण रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. या तरुणी शहरातील विविध आईस्क्रीम पार्लर, ज्यूस सेंटर येथून विविध फळबिया संकलित करून त्या वाळवून त्यापासून आकर्षक दागिन्यांची निर्मिती करत आहेत. टाकाऊ वस्तूंमधून सौंदर्याची निर्मिती करत नदीप्रदूषण रोखणारा हा उपाय सध्या शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे. या कामी सीताफळ, चिकू, रिठा, बोर, गुंज या बियांचा वापर केला जातो व यापासून हार व कानातील डूल तयार केले जातात. फळबियांचा सुयोग्य वापर होत असल्याने व्यावसायिक त्या बिया नदीपात्रात टाकत नाही. त्यामुळे नदीप्रदूषण रोखण्यास मोठी मदत होत आहे. तसेच, बियांपासून बनवलेला दागिना तुटल्यास तो मातीमध्ये सामावून जातो. त्यामुळे पर्यावरणाची हानीदेखील टाळली जाते.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat