राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती

22 Feb 2019 15:43:40


 


मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती राज्य सरकारने केली आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने नानाविध उपक्रम राबविले आहेत. अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांसाठी 'सक्षमा' उपक्रम, कामांच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या जनजागृतीसाठी 'पुश' (पीपल युनायटेड अगेन्स्ट सेक्शुअल हरॅसमेंट) अभियान, बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी 'प्रज्ज्वला' योजना, अडचणीतील महिलांना मानसिक आधार देण्यासाठी 'सुहिता' हेल्पलाईन, सामाजिक संस्थांच्या मदतीने राज्यभर कायदेशीर मार्गदर्शन शिबिरे, महिलांच्या प्रश्नांवर संशोधन करण्यासाठी अर्थसाह्य, महिला कैद्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील तुरुंगांना भेटी अशी अनेक पावले उचलली आहेत.

 

याशिवाय महिला व मुलांच्या तस्करीविषयी आंतरराष्ट्रीय परिषद तर अनिवासी भारतीयांकडून होणारी वैवाहिक फसवणूक, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) आणि सरोगसीविषयक प्रास्ताविक कायद्याबाबत आयोगाने राष्ट्रीय परिषदा घेतलेल्या आहेत. पाळणाघरांसाठी नियमावली, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा, हतात्मा जवानांच्या वीरपत्नी यांच्यासाठीही रहाटकर यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने राज्य सरकारला वेळोवेळी महत्त्वपूर्ण शिफारशी केलेल्या आहेत. महिला अत्याचारांविरोधातील घटनांवर आयोगाने वेळोवेळी कडक पावले उचलली आहेत. औरंगाबादच्या माजी महापौर असलेल्या विजया रहाटकर या भाजप महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्षादेखील आहेत. राष्ट्रीय पातळीवरील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे.

 

"माझी फेरनियुक्ती केल्याबद्दल मी राज्य सरकारचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानते. गेल्या तीन वर्षांत आयोगाने महिलांच्या अनेक प्रश्नांना हात घातलेला आहे. खूप काही करण्याचा प्रयत्न केला आहे. तीच रेघ पुढे ओढून पुढील तीन वर्षांमध्येही आयोगाचे काम सर्वस्पर्शी, सर्वांगीण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन."

 

विजया रहाटकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0