मराठी पाऊल पडते पुढे...

    दिनांक  21-Feb-2019   


 


‘बोईंग’ या जगातील सर्वात मोठ्या विमाननिर्मिती करणाऱ्या कंपनीच्या भारतीय व्यवसायाची धुरा एका भारतीयाच्या आणि खासकरुन मराठी माणसाच्या हाती आली आहे. ‘बोईंग’च्या या नव्या ‘भारतीय बॉस’ची ओळख करुन देणारा हा लेख.


आज असं कोणतंही क्षेत्र नाही, ज्यामध्ये मराठी माणसाने कर्तृत्व गाजवून आपला ठसा उमटवला नसेल. विमाननिर्मिती कंपन्यांमधील ‘बोईंग’ ही एक अग्रगण्य कंपनी. सर्वात मोठी विमानं तयार करण्यामध्ये अग्रेसर अशी ही अमेरिकन ‘बोईंग’ कंपनी. पण, या कंपनीच्या प्रगतीत मराठी माणसाचाही मोलाचा वाटा आहे. कारण, ‘बोईंग’च्या उपाध्यक्षपदी दिनेश केसरकर विराजमान आहेत, तर आता याच कंपनीच्या भारतातील व्यवसायाच्या प्रमुखपदाची जबाबदारी आणखी एका मराठी माणसाच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. ती व्यक्ती म्हणजे सलील गुप्ते. आज केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या ‘एअर इंडिया’सारख्या विमान कंपनीकडेही ‘बोईंग’ या कंपनीने तयार केलेली मोठी विमाने आहेत. एका अमेरिकन कंपनीच्या व्यवसायप्रमुखपदी गुप्ते यांच्यासारख्या मराठी माणसाने विराजमान होणे, ही सर्व भारतीयांसाठी तर अभिमानाची बाब आहेच, पण मराठी बांधवांसाठीही गौरवाची गोष्ट म्हणावी लागेल. भविष्यात भारताला आवश्यक असलेल्या मोठ्या विमानांची गरज केसकर यांनीही अनेकदा बोलून दाखविली होतीच. परंतु, आता त्यांना भारतात सलील गुप्ते यांची साथ मिळेल, हे नक्की.

 

सलील गुप्ते यांची सध्या व्यवसाय प्रमुखपदी नियुक्ती झाली असली तरी सध्या ‘बोईंग’च्या ‘कॅपिटल कॉर्पोरेशन’ या समूहाच्या वित्त उपकंपनीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि १८ मार्चपासून ते आपल्या नव्या पदाचा कार्यभार हाती घेणार आहेत. गुप्ते हे मूळचे भारतीयच असले तरी त्यांनी आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक काळ हा अमेरिकेतच व्यतीत केला. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून ‘अर्थशास्त्र’ विषयात आपले पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर व्यवसाय व्यवस्थापनाचे पुढील शिक्षण स्टॅनफोर्ड विद्यापीठातून यशस्वीरित्या पूर्ण केले. ‘नेबरकेअर’सारख्या आरोग्य क्षेत्रातील कंपनीमध्ये सलील गुप्ते यांनी कार्यकारी समितीवरही काम केले. याचबरोबर त्यांनी वित्त समितीचेही अध्यक्षपद भूषविले आहे. सलील यांच्या पत्नी निकोल नेरोलिस या पूर्वाश्रमीच्या पत्रकार असून त्या आरोग्य, शिक्षण आणि महिलांविषयीच्या समस्यांच्या अभ्यासक म्हणून ओळखल्या जातात. कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षणादरम्यान निकोल आणि सलील हे दोघे संपर्कात आले आणि नंतर त्यांनी लगीनगाठ बांधली.

 

‘बोईंग’पूर्वी ‘गोल्डमॅन सॅक्स’ तसेच ‘सिटीग्रुप’सारख्या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांमध्ये सलील कार्यरत होते. २००६ ते २००९ या कालावधीत त्यांनी ‘गोल्डमॅन सॅक्स’मध्ये आपत्कालीन स्थितीतील गुंतवणूक विभागाची जबाबदारी अतिशय उत्तमरित्या पार पाडली. तब्बल २५ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीच्या निधीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सलील यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी ‘सिटी’ समूहामध्ये तीन वर्षे सेवा बजावली. यावेळी त्यांनी बँकांमधील गुंतवणुकीचे धोरण अनुसरताना हवाई क्षेत्रासह वित्त क्षेत्रातील अनेक व्यवहार यशस्वीरित्या पूर्णत्वास नेण्याचा बहुमान मिळवला. सध्या ‘बोईंग’मधील नव्या पदाची जबाबदारी सांभाळताना हवाई वाहतूक कंपन्यांना प्रवासी विमाने पुरविण्याबरोबरच देशातील संरक्षण, अंतराळ आणि सुरक्षाविषयक कार्य अधिक विस्तारण्यावर गुप्ते भर देणार असून यासाठी कंपनीच्या तीन हजार कर्मचाऱ्यांची मदत घेणार असल्याचे ते सांगतात. योगायोग म्हणजे, याच वर्षी सलील गुप्ते ‘बोईंग’ कंपनीत आपली दहा वर्षे पूर्ण करणार आहेत. या नव्या जबाबदारीच्या निमित्ताने त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे चीज झाले, असेच म्हणावे लागेल. यापूर्वी त्यांनी पुरवठा संचालक, वाणिज्यिक संचालक, व्यवस्थापकीय संचालक आदी विविध पदे विविध कंपन्यांमध्ये भूषविली आहेत. ‘बोईंग’च्या ‘एफ-१५’ या लढाऊ विमानांची निर्मिती असेल किंवा सैन्यदलात आवश्यक विमानांची निर्मिती असेल, ती सलील यांच्या देखरेखीखाली झाली.

 

नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर गुप्तेबाईंग इंटरनॅशनल’चे अध्यक्ष मार्क एलेन यांच्याबरोबर ‘बोईंग’च्या नवी दिल्लीतील कार्यालयातून आपले काम पाहणार आहेत. नवी दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, मुंबई आणि चेन्नई येथील उद्योग आणि तीन हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या टीमचे नेतृत्व स्वीकारण्याची जबाबदारी आता त्यांच्याकडे असेल. ‘बोईंग’चा सर्वच क्षेत्रातील व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. त्याच क्षणी आपल्याला भारतात काम करण्याची संधी मिळाली आहे. भारतातील ‘बोईंग’च्या सहकाऱ्यांबरोबर काम करण्यात आपल्याला खूप आनंद होत असल्याचे सलील म्हणतात. आता लवकरच ते नव्या पदी रूजू होतील. त्यांच्या देखरेखीखाली भारतातील व्यवसायाची धुराही उत्तमरित्या सांभाळली जाईल, यात काही शंका नाही. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat