जागतिक व्यापाराची घसरगुंडी

    दिनांक  20-Feb-2019   मार्च २०१० नंतर यंदा प्रथमच ही बिकट परिस्थिती उद्भवली असून ती हाताबाहेर जाणार नाही, यासाठी प्रत्येक राष्ट्राने आपल्या व्यापारी धोरणांचा पुनर्विचार करण्याचा सल्लाही संघटनेने दिला आहे.


एकीकडे भारतीय उपखंडात पाकिस्तानच्या दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या धोरणामुळे वातावरण चांगलेच तापले असताना, आता जागतिक व्यापार संघटनेनेही आंतरराष्ट्रीय व्यापारातील संभाव्य घसरणीचा इशारा दिला आहे. जागतिक व्यापार संघटनेतर्फे दर तिमाहीला व्यापारी स्थितीवर भाष्य केले जाते. त्यासाठी ‘वर्ल्ड ट्रेड आऊटलूक इंडिकेटर’ या निर्देशकाचा वापर केला जातो. पण, यंदाच्या तिमाहीचा इंडिकेटर हा काहीसा सर्व राष्ट्रांच्या चिंतेत भर घालणारा आहे, असेच म्हणावे लागेल. कारण, जागतिकस्तरावरील व्यापारी युद्ध, आर्थिक अस्थिरता आणि एकूणच राजकीय उलथापालथ याचे पडसाद जागतिक व्यापारावरही दिसून आल्याचे व्यापारी संघटनेची आकडेवारी सांगते. ‘वर्ल्ड ट्रेड आऊटलूक इंडिकेटर’ जाहीर करण्यापूर्वी जागतिक व्यापाराशी संबंधित एकूण सात घटकांचा सांगोपांग विचार केला जातो. त्यानंतर जर या इंडिकेटरने १००च्या वर मजल मारली, तर जागतिक व्यापारवृद्धीला पोषक वातावरण असल्याचे मानले जाते. पण, यंदाच्या तिमाहीचे इंडिकेटर हे १०० पेक्षा खालच्या स्तरावर पोहोचल्यामुळे जागतिक व्यापार संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. संघटनेच्या नोंदींनुसार, मार्च २०१० नंतर यंदा प्रथमच ही बिकट परिस्थिती उद्भवली असून ती हाताबाहेर जाणार नाही, यासाठी प्रत्येक राष्ट्राने आपल्या व्यापारी धोरणांचा पुनर्विचार करण्याचा सल्लाही संघटनेने दिला आहे. ‘वर्ल्ड ट्रेड आऊटलूक इंडिकेटर’ या निर्देशकाचा विचार करताना, एकूण व्यापार, निर्यातीचे प्रमाण, आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतुकीचा खर्च, बंदरांवरील एकूण कंटेनर्सची मालवाहतूक, ऑटोमोबाईल उत्पादने आणि विक्री, शेतीसाठीचा कच्चा माल अशा एकूण सात निकषांचा विचार केला जातो. यापैकी केवळ एकूण व्यापाराचे प्रमाण (१०१.९) आणि कंटेनर्सची मालवाहतूक (१००.३) हे दोन निर्देशक सकारात्मक वाढ दर्शवित असले तरी, उर्वरित पाच निर्देशकांमध्ये मात्र समाधानकारक वाढ नोंदवण्यात आलेली नाही. जागतिक व्यापार संघटनेच्या मते, व्यापारी धोरणांमधील वाढलेल्या ताणतणावांमुळे ही परिस्थिती उद्भवली असून त्याचा नकारात्मक परिणाम देशांच्या व्यापारवृद्धीच्या वेगावर होऊ शकतो. त्याचबरोबर २०१८ साली ३.९ टक्क्यांवर असलेला व्यापारवृद्धीचा दर घसरून २०१९ साली ३.७ टक्क्यांवर घसरण्याचा अंदाजही संघटनेने व्यक्त केला आहे.

 

अमेरिका आणि चीनमध्ये भडकलेले व्यापारीयुद्ध हे या परिस्थितीला जबाबदार असल्याचेही काही अर्थतज्ज्ञांचे म्हणणे असून आगामी काळात यावर दीर्घकालीन उपाययोजना न राबविल्यास त्याचे भीषण परिणाम या दोन राष्ट्रांसह इतर देशांनाही भोगावे लागू शकतात. जसे की, अमेरिकेच्या आयात शुल्क वाढीमुळे चिनी उत्पादनांची चांगलीच कोंडी झाली. त्यामुळे चीनवर व्यापारासाठी प्रामुख्याने विसंबून असलेल्या द. कोरिया, उ. कोरिया, तैवानसारख्या देशांनाही याचा तडाखा बसला. अमेरिकेचीही तीच गत. अमेरिकेने इराणवर निर्बंध लादले खरे, पण त्याचा परिणाम संपूर्ण जागतिक तेलबाजारावर आज पाहायला मिळतो. इतर देशांना इराणकडून होणार्‍या तेल निर्यातीवरही त्यामुळे साहजिकच बंधने आली आणि मागणी-पुरवठ्याचे गणित विस्कटले. त्याचबरोबर पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानचा ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा काढून घेतलेला दर्जा आणि २०० टक्क्यांनी वाढवलेले आयात शुल्क यांचाही आगामी काळात दोन्ही देशांच्या व्यापारावर, खासकरून आधीच आर्थिक कंबरडे मोडलेल्या पाकिस्तानवर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा, इतर राष्ट्रांबरोबरचे व्यापारी संबंध सुधारण्याबरोबरच प्रत्येक देशातील राजकीय स्थैर्यही जागतिक व्यापारी परिघाला प्रभावित करत असते. त्यातच अमेरिकेसारख्या महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धोरणे, हटवादीपणा याचे परिणाम अमेरिकेसह इतर देशांनाही आज भोगावे लागत आहेत. त्यामुळे जागतिकीकरणाच्या या युगात आपण खरंच एका ग्लोबल खेड्यात वास्तव्यास आहोत, याची प्रचिती वेळोवेळी येते. तेव्हा, एकूणच जागतिक व्यापारी संघटनेने दिलेला हा धोक्याचा सूचक इशारा समजून आज प्रत्येक देशाने स्वराष्ट्रहित साधण्याबरोबरच व्यापक जागतिक हितासाठीही प्रयत्नशील राहणे अत्यावश्यक म्हणावे लागेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat