गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्या

    दिनांक  02-Feb-2019

 

 
 
 
 
गडचिरोली : पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी दोघांची हत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी ही घटना घडली असून गेल्या पंधरा दिवसांमध्ये नक्षलवाद्यांनी जवळपास ७ जणांची हत्या केली आहे. २८ जानेवारी रोजी नक्षलवाद्यांनी तालगुडा गावातील एका व्यक्तीची हत्या केली होती. ही व्यक्ती पोलिसांची खबरी असल्याचा संशय नक्षलवाद्यांना होता. या संशयावरून नक्षलवाद्यांनी त्याची हत्या केली. 
 
दुसऱ्या दिवशी या व्यक्तीचा मृतदेह सापडला. या मृतदेहाजवळ नक्षलवाद्यांनी एक बॅनर ठेवला होता. पोलिसांचा खबरी असल्याने शिक्षा दिल्याचे नक्षलवाद्यांनी त्या बॅनरवर लिहिले होते. २३ जानेवारी रोजी भामरागडमध्ये नक्षलवाद्यांनी तीन जणांना गोळ्या घातल्या. त्यांच्या मृतदेहाजवळही नक्षलवाद्यांनी बॅनर ठेवला होता. ‘पोलिसांचे खबरी व्हाल तर अशीच अवस्था होईल’, असे त्या बॅनरवर नक्षलवाद्यांनी लिहिले होते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पोलिसांनी कसनुर-तुमिरगुंडामध्ये नक्षलवाद्यांवर कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी ४० नक्षलवाद्यांना ठार केले होते. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा बदला घेतला असल्याचा उल्लेख नक्षलवाद्यांनी या बॅनरवर केला होता.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/