सत्यसन्मान

    दिनांक  02-Feb-2019   


 


यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रथेनुरूपपद्म पुरस्कारां’ची घोषणा करण्यात आली. ‘पद्मभूषण’च्या १४ सन्माननीय भारतीयांच्या यादीत एक नाव प्रकर्षाने लक्षवेधक ठरले ते नांबी नारायण यांचे. ‘इस्रो’मध्ये एकेकाळी कार्यरत या देशप्रेमी शास्त्रज्ञाला देशद्रोहाच्या खोट्या आरोपाखाली प्रचंड नरकयातना भोगाव्या लागल्या. ‘Ready to fire - How India & I survived the ISRO spy case' या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाची पाने उलगडताना नांबींचा जीवनपट एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे उलगडत जातो.


“हेरगिरीच्या आरोपामुळे माझे नाव प्रसिद्धीस आले. पण, आज मला आनंद आहे की, माझ्या योगदानाचीउचित दखल सरकारने घेतली.” हे शब्द आहेत आज वय वर्षे ७७ असलेल्या नांबी नारायण यांचे. ‘इस्रो’मध्ये क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या, फ्रेंचांच्या मदतीने विकास इंजिन विकसित करणाऱ्या आणि इस्रोच्या पीएसएलव्ही प्रकल्पांचे संचालक असलेल्या या बुद्धिवान शास्त्रज्ञाला साधारणदोन दशकांपूर्वी केरळ पोलिसांनी हेरगिरीच्या खोट्या आरोपांखाली अटक करून एकच खळबळ उडवून दिली. या प्रकरणाचा केरळ पोलिसांनी भरपूर बागुलबुवा उभा केला. नांबींच्या देशप्रेमावर, चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले. पितपत्रकारितेला कुरवाळणाऱ्या माध्यमांना तर ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावाखाली आयते कुरणच मिळाले. एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत एका प्रामाणिक शास्त्रज्ञाला त्या काळात अगदी पदोपदी अपमानाचे विष पचवावे लागले. पण, नांबींनी काही हार मानली नाही. अखेरच्या क्षणापर्यंत ते लढत राहिले आणि ‘सत्यमेव जयते’ या वचनानुसार त्यांची हेरगिरीच्या आरोपातून निर्दोषमुक्तताही करण्यात आली. गेल्याच वर्षी या खटल्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने नांबींना ५० लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही केरळ सरकारला दिले. साहजिकच, चारित्र्य मूल्याचे असे चलनरुपी मूल्यात मोजमाप शक्य नसले तरी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्हच म्हणावा लागेल. नांबींसाठी वयाच्या या टप्प्यात कदाचित या आर्थिक भरपाईचे मोल नसेलही, पण म्हणतात ना व्यक्तीची प्रतिमा मृत्युपश्चातही त्याचा पिच्छा काही सोडत नाही. म्हणूनच, नांबींनी हार न मानता न्यायासाठी अन्यायाविरोधात निकराचा लढा दिला. त्यांना या भीषण आरोपाखाली अडकवणाऱ्या केरळ सरकारच्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठीही नांबींनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. विविध संघटनांचे सहकार्यही याकामी नांबींना लाभले. त्यांचा हा मान-अपमान, आरोप-सन्मानाच्या बऱ्या-वाईट प्रसंगांवर बेतलेला ‘रॉकेटरी-दी नांबी इफेक्ट’ हा आत्मचरित्रपर चित्रपटही याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून नांबींनी सहन केलेला अन्याय-अत्याचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, यात शंका नाहीच. पण, ‘रेडी टू फायर’ या पुस्तकातील नांबींनी मांडलेले एकूणच अनुभव सामान्य वाचकांच्या मनातअरे बापरे, हे असेही आपल्या देशात घडू शकते,’ या विचारानेच मन व्यथित करणारे आहेत. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक वाचकाला नांबींच्या आयुष्यात दोन कोनांतून डोकावण्याची संधी देतं. त्यातील एक कथानक हे नांबींच्या ‘इस्रो’मधील कारकिर्दीचे चित्र वाचकांसमोर उभं करतं, तर दुसरे कथानक हे सर्वस्वी या खटल्याच्या आसपास लेखकाने गुंफले आहे. त्यामुळे नांबींचा वर्तमान वाचताना त्यांच्या भूतकाळाचे प्रसंग, अनुभवही पुस्तक संपेपर्यंत तितकेच ताजे वाटत राहतात. म्हणूनच, वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या या पुस्तकाच्या वैशिष्ट्यपूर्ण मांडणीची सर्वप्रथम दाद दिली पाहिजे.

 

नांबींच्या अटकेपासून ते त्यांच्या सुटकेपर्यंतच्या या प्रवासात या प्रकरणाचे विविध धागेदोरे उलगडत जातात. म्हणजे केरळच्या काँग्रेस अंतर्गत दोन मोठ्या नेत्यांमधील धुसफुशीपासून ते अमेरिका-रशिया या महासत्तांच्या जागतिक सत्तास्पर्धेपर्यंतचा संबंध या एकूणच प्रकरणाशी कसा जोडलेला आहे, त्याची प्रचिती येते. या पुस्तकात नांबींनी केवळ त्यांच्यावरील खटल्याचा तपशीलच सादर केलेला नाही, तर ‘इस्रो’ची एकूणच प्रगती, जीएसएलव्ही ते पीएसएलव्ही तंत्रज्ञान, क्रायोजेनिक इंजिन, त्याची उपयुक्तता यावर शास्त्रशुद्ध आणि सोप्या शब्दांत भाष्य केले आहे. विक्रम साराभाई, डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम या ‘इस्रो’मधील महान शास्त्रज्ञांबरोबर काम करण्याची संधीही नांबी यांना मिळाली. त्या अनुभवांचे पुस्तकातील चित्रणही तितकेच रोचक आणि ज्ञानात भर घालणारे आहे. ‘इस्रो’च्या माध्यमातून होणारी भारतीय अंतराळ क्षेत्रातील गगनभरारी रोखण्यासाठी कुठल्या थराला जाऊन हे कटकारस्थान रचले गेले असेल, याची पुसटशी कल्पना पुस्तकाचा शेवट जवळ येता अधिक गडद होत जाते. नांबी यांना नोव्हेंबर १९९४ मध्ये केरळ पोलिसांकडून झालेली अटक आणि चौकशीच्या नावाखाली त्यांच्यावर केलेले अनन्वित अत्याचार याची वर्णने वाचल्यावर अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. आपण न केलेला गुन्हाही पोलिसांच्या दबावापोटी, आमिषापोटी बरेचदा लोक कबूल करतात. पोलिसांच्या दहशतीला ते बळी पडतात आणि एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं. नांबींच्या बाबतीतही असाच काहीसा डाव रचला गेला. केरळ पोलीस आणि नंतर इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तोंडून हे अख्खे खोटे षड्यंत्र सत्यात परिवर्तित करण्याचा जुगारहीखेळून बघितला. कधी गोडीगुलाबीने बोलून, तर कधी दिवसभर बसू न देता नांबींची उभ्यानेच चौकशी करून... अशाप्रकारे शारीरिक आणि मानसिक छळवणुकीला त्यांना सामोरे जावे लागले. इतकेच नाही, तर लोकांनीही माध्यमांमधील अतिरंजित बातम्यांवर विश्वास ठेवून नांबींना देशद्रोही म्हणून हिणवले. या सगळ्या मनाला हादरवून सोडणाऱ्या आठवणी नांबींनी या पुस्तकात मांडल्या आहेत. १९९६ साली त्यांची सीबीआयने देशद्रोहाच्या खोट्या आरोपातून मुक्तताही केली. न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले व हे संपूर्ण प्रकरण एक कुभांड असल्याचेच अधोरेखित केले. पण, सुटकेनंतरही नांबी यांचा या असत्याने बरबटलेल्या, भ्रष्ट व्यवस्था आणि अधिकाऱ्यांविरोधातील लढा मात्र पुढेही असाच सुरुच राहिला, ज्यात नांबी यशस्वीही झाले. अरुण राम या ज्येष्ठ पत्रकारासह नांबींनी या पुस्तकाच्या सहलेखनाचा घेतलेला निर्णय चांगलाच जमून आला आहे. कारण, राम यांचाही या खटल्याचा विशेष अभ्यास असून ‘इस्रो’विषयक ते एक जाणकार पत्रकार म्हणून गणले जातात. त्यामुळे नांबींचे प्रत्यक्ष अनुभव आणि अरुण राम यांचा अभ्यास याचा उत्तम मेळ या पुस्तकात साधलेला दिसतो. त्यामुळे एकूणच या प्रकरणात रस असलेल्यांनी केवळ महाजालावर उपलब्ध असलेली वरवरची माहिती न वाचता, थेट हे पुस्तकच हातात घेणे अधिक रंजक ठरेल. आज ‘पद्मभूषण’ पुरस्काराने नांबी यांना सन्मानित करून त्यांच्या या प्रदीर्घ लढ्यालाही केंद्र सरकारने गौरवान्वित केले आहे. त्यामुळे देश, देशाची प्रगती आणि देशप्रेम सर्वोच्च मानणाऱ्या या शास्त्रज्ञानाला सलाम!

 

पुस्तकाचे नाव : Ready to fire - How India & I survived the ISRO spy case

लेखक : नांबी नारायण, अरुण राम

प्रकाशन : ब्लूम्सबरी पब्लिशिंग इंडिया प्रा. लि. मूल्य : ५९९ रुपये

पृष्ठसंख्या : ३३९

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/