...आणि आम्ही सन्मानित झालो!

    दिनांक  02-Feb-2019   काकांना फोन करणारा किंवा काकांना भेटायला गेलेला मग, ती स्त्री असेल की पुरुष असेल, कोणीही औपचारिकता म्हणून गेलेले नव्हते. 'पद्म' पुरस्कार मिळालेला आहे, आपण गेलो नाही तर बरे दिसणार नाही, काकांना ते आवडणार नाही, माझी इच्छा नसली तरी जायला पाहिजे, असा हा जुलुमाच्या राम-रामचा विषय नव्हता. जे आले, ते काकांवरील निरपेक्ष प्रेमामुळे आले. काकांना पुरस्कार मिळाला, म्हणजे तो मलाच मिळाला, काकाच काय तर मीदेखील सन्मानित झालो, अशी प्रत्येकाची भावना होती.

 


अशोकराव कुकडे यांना 'पद्मभूषण पुरस्कार' मिळाल्याची बातमी किरण शेलार यांनी मला दिली. डॉ. अशोकरावांना आम्ही सर्वजण 'काका' म्हणतो. ते काकांना फोन करत होते. परंतु, फोन काही लागत नव्हता. ते स्वाभाविकच होते. कारण, काकांना पुरस्कार मिळाल्यानंतर लातूरमध्ये काय झाले असेल, हे मी मुलुंडला बसून पाहू शकत होतो. अभिनंदनाच्या फोनची मालिकाच लागली असणार आणि भेटायला येणार्‍यांची रीघ लागलेली असेल. मी माझ्या डोळ्यासमोर हेदेखील पाहू शकत होतो की, पुष्पगुच्छांनी सगळा दिवाणखाना भरून गेला असेल. हा कल्पनाविलास नव्हता. कालच मी काकांना फोन केला आणि विचारले, “आता मोकळे झालात का?” ते हसून म्हणाले, “थोडा थोडा झालो आहे. सर्व खोली पुष्पगुच्छांनी भरून गेली आहे.” मी हेदेखील अनुभवू शकत होतो की, काकांना फोन करणारा किंवा काकांना भेटायला गेलेला मग, ती स्त्री असेल की पुरुष असेल, कोणीही औपचारिकता म्हणून गेलेले नव्हते. 'पद्म' पुरस्कार मिळालेला आहे, आपण गेलो नाही तर बरे दिसणार नाही, काकांना ते आवडणार नाही, माझी इच्छा नसली तरी जायला पाहिजे, असा हा जुलुमाच्या राम-रामचा विषय नव्हता. जे आले, ते काकांवरील निरपेक्ष प्रेमामुळे आले. काकांना पुरस्कार मिळाला, म्हणजे तो मलाच मिळाला, काकाच काय तर मीदेखील सन्मानित झालो, अशी प्रत्येकाची भावना होती. हे सर्वच अद्भुत आणि अनोखे आहे. समाजाचे असे निरपेक्ष प्रेम फारच थोड्या लोकांच्या वाट्याला येते. हा लेख मी ३० जानेवारी रोजी लिहीत आहे. आज महात्मा गांधीजींची पुण्यतिथी आहे. महात्मा गांधीजींवर असेच निरपेक्ष प्रेम जनतेने केले. आपल्याकडे कर्मसिद्धांत सांगितला जातो. एका वाक्यात त्याचा अर्थ- 'जे पेराल तेच उगवेल.' तुम्ही जसा व्यवहार कराल, तसा प्रतिसाद तुम्हाला समाजाकडून मिळेल. एखाद्याला शिवी दिली, तर त्याचे उत्तर शिवीतूनच मिळेल किंवा एखाद्या बुक्क्यातून मिळेल. जर तुम्ही नमस्कार म्हटला, तर समोरचाही नमस्काराने उत्तर देईल. गेली ५०हून अधिक वर्षे काकांनी लातूरकरांची कर्मसेवा केली. ही सेवा निरपेक्ष भावनेने केली. सर्वांवर हृदयापासून प्रेम करून केली. 'येथ जातीवर्ण, सर्वचि गा अप्रमाण' असे माऊलींने म्हटले. सेवा करीत असताना हा कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या प्रांताचा, गरीब की श्रीमंत असला कोणताही विचार डॉक्टरांच्या मनाला कधीही स्पर्श झाला नाही.

 

कसा स्पर्श होणार? काका संघ जगणारे स्वयंसेवक आहेत. संघाची शिकवणूकच समाजावर निरपेक्ष भावनेने प्रेम करण्याची आहे. जो शिव्या देतो तोही आपलाच आणि जो हार घालतो तोही आपलाच! त्यात डावे-उजवे करण्याचे कारण नाही. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार असेच जगले आणि श्रीगुरुजीदेखील असेच जगले. या दोन महापुरुषांनी आपल्या जीवनातून स्वयंसेवकांना आणि समाजाला एकच संदेश दिला की, संघ आपल्याला जगायचा आहे. संघ आपल्याला व्यवहारात आणायचा आहे आणि हे काम प्रत्येक स्वयंसेवकाने करायचे आहे. काकांनी आपले सगळे जीवन संघ जगण्यात घालविले. पुण्याला त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यात सुवर्णपदक मिळविले. कुकडे परिवार पुण्यात प्रतिष्ठित परिवार होता. पुण्यातच त्यांना वैद्यकीय व्यवसाय सहजपणे सुरू करता येण्यासारखा होता. त्यांनी लातूरसारख्या त्यावेळी महाराष्ट्राच्या नकाशावर, नगण्य असलेल्या, छोट्या शहरात जाण्याचा निर्णय केला. लातूरला जायला रस्ते चांगले नव्हते. लातूर-बार्शी रेल्वेवर तर अनेक मजेशीर विनोद आहेत. कुर्डुवाडीवरून सुटल्यावर ही गाडी लातूरला कधी पोहोचेल, कोणी सांगू शकत नसे. रेल्वेमार्गावर गायी-म्हशी येऊन बसत आणि त्या उठल्याशिवाय गाडी सुरू होत नसे आणि त्या केव्हा उठतील हे कोणी सांगू शकत नसे. एकूणच मराठवाडा म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष, अशा अडचणीच्या गावी जाऊन वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी डॉक्टरांना जाण्याचे तसे काही कारण नव्हते. कारण नव्हते म्हणजे आर्थिक कारण नव्हते. प्रचंड पैसा मिळवावा, नावलौकिक मिळवावा, वैद्यकीय क्षेत्रात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करावा, जमल्यास काही राजकीय फायदे पदरात पाडून घ्यावेत, ही कोणतीही प्रेरणा डॉक्टरांची नव्हती. प्रेरणा एकच, 'इथल्या माझ्या समाजाला वैद्यकीय सेवेची गरज आहे. माझ्याकडे वैद्यकीय ज्ञान आहे आणि ही सेवा मी देऊ शकतो,' या भावनेने डॉक्टर लातूरला आले. त्यांच्यासारखाच, मळलेली वाट सोडण्याचा विचार करणारे आठ-दहाजण होते. त्या सर्वांनी लातूरला वैद्यकीय सेवेचा उपक्रम सुरू केला.

 

पुण्यातील काही डॉक्टर इथे आलेले आहेत आणि त्यांनी दवाखाना सुरू केला आहे, त्यांच्या मनात सेवाभाव आहे, म्हणून सर्व लातूरकरांनी तेव्हा या डॉक्टर मंडळींचे स्वागत केले किंवा हारतुरे घातले किंवा सर्व प्रकारची मदत देऊ केली, असे काही झाले नाही. अपवाद फक्त करवाजी यांचा. ते काकांशी सुरुवातीपासून जोडले गेले आणि हे जोडणे इतके घट्ट झाले की, करवा आणि कुकडे परिवार यांचे अद्वैत झाले. पण, हा झाला पुढचा भाग. विवेकानंद रुग्णालयाचे कामकाज म्हणजे अडथळ्यांची शर्यत. त्याची माहिती आपल्याला 'कथा एका ध्येयसाधनेची' (लेखक - अशोकराव कुकडे) या आत्मकथनात वाचायला मिळेल. सर्व अडथळे दूर होत गेले. कारण, 'क्रिया सिद्धी सत्त्वे भवति, महतां नोपकरणे।' कार्याची सिद्धी त्याच्या सत्त्व गुणामुळे होते. इतर साधनांचा फारसा उपयोग नसतो, असे सुभाषितकाराला सांगायचे आहे. काका आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सुभाषितकाराचे हे बोल शब्दश: खरे करून दाखविले. लातूरवासियांनी काकांवर मनापासून प्रेम केलेले आहे. त्यात समाजातील सर्व स्तरातील माणसे आहेत, सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत, सर्व शैक्षणिक संस्थांची मंडळी आहेत, कोण नाही हे शोधूनसुद्धा सापडणार नाही. म्हटले तर काकांचा राजकारणाशी काही संबंध नाही, ते दीर्घकाळ क्षेत्र संघचालक होते. क्षेत्र संघचालकांना संघ म्हणून राजकीय क्षेत्राशी संबंध ठेवावा लागतो. तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात युतीचे शासन येऊन गेले होते. विचारधारेचे काम भांड्याला भांड लागून फारसा आवाज होणार नाही, याप्रकारे झाले पाहिजे आणि ते पाहण्याचे काम क्षेत्र संघचालकांचे. काकांनी हे काम न्यायबुद्धीने केले.कोणाची नको ती प्रशंसा नाही, कोणावर नको तितके रागावणे नाही, पण जेथे पाठीवर हात टाकणे आवश्यक आहे, तिथे त्यांनी जरूर टाकलेला आहे आणि जेथे चार कटू शब्द सुनावले पाहिजेत, तिथे त्यांनी अत्यंत तटस्थपणे केलेले आहे. यामुळेच राजकीय क्षेत्रातील पहिल्या श्रेणीची नेतेमंडळी काकांना भेटायला जातात. कोणाला आपल्या मनातील दु:ख सांगायचे असते, कोणाला सल्ला विचारायचा असतो, तर कोणाला पक्षात माझी कशी कोंडी करतात हे सांगायचे असते. प्रत्येकजण मोकळेपणाने काकांशी बोलतो आणि जाताना समाधान घेऊन जातो. काकांना 'पद्मभूषण' मिळाले, म्हणजे काय झाले? तर काकांच्या या सर्वसमावेशक अंत:करणाला राज्यव्यवस्थेने दाद दिलेली आहे. राज्यव्यवस्था संवेदनहीन समजली जाते. पण, कधी कधी राज्यव्यवस्थेलादेखील जनतेच्या स्पंदनांची कदर करावी लागते. त्या कदर करण्याचा परिणाम म्हणून अनपेक्षितपणे असा पुरस्कार प्राप्त होतो.

 

लातूरकरांना एवढेच काय, पण संघातील सर्व स्वयंसेवकांना काकांची एक ओळख पक्की आहे. ती ओळख आहे त्यांच्या आत्यंतिक साधेपणाची. वेष साधा असणे यात तसे काही विशेष नसते. परंतु, साधेपणा ही वृत्ती असावी लागते, तशी मनोवृत्ती असावी लागते. ही मनोवृत्ती देहाचा सहजस्वभाव व्हावी लागते. ओढून ताणून साधेपण आणून चालत नाही. ते सहजपणे यावे लागते. पहिल्यांदाच मी जेव्हा लातूरला गेलो, तेव्हा रेल्वे स्थानकावर सकाळी ६ वाजता मला घेण्यासाठी काका गाडी घेऊन आले होते. तेव्हा ते क्षेत्र संघचालक होते. मला घेण्यासाठी काकांनी येण्याची काही गरज नव्हती. संघव्यवस्थेतील अन्य कोणालाही ते हे काम सांगू शकत होते. परंतु, ते त्यांनी केले नाही. मी 'नको नको' म्हणत असतानादेखील माझ्या हातातील बॅग त्यांनी हिसकावून घेतली, गाडीत ठेवली. संघाचा ज्येष्ठ कार्यकर्ता काही न बोलता आपल्या वागणुकीने संपर्कातील स्वयंसेवकांवर संस्कार करीत असतो. डॉक्टरांचा हा साधेपणाचा संस्कार मी जन्मात विसरणे शक्य नाही. डॉक्टरांची जवळीक करावी, काही नाजूक विषयांवर बोलावे, एवढी काही माझी पात्रता नाही. पण, काकांनी तसे कधी मानले नाही. दामुअण्णा दाते आमच्या दोघांचे श्रद्धास्थान. दामुअण्णांना जाऊनही आता १८-१९ वर्षे झाली. एकदा बोलत असताना मी काकांना म्हणालो,“दामुअण्णांची आठवण येत नाही असा दिवस जात नाही.” काका भावूक झाले आणि म्हणाले,“माझीही तीच अवस्था आहे.” अनेकवेळा काही नाजूक विषयांवर स्पष्ट आणि परखड लिहावे लागते. गुळमुळीत भाषेत लिहून चालत नाही. असेही असेल तसेही असेल, हेही चांगले तेही चांगले, असली भाषा उपयोगाची नसते. माझे असे अनेक लेख मी प्रसिद्धीपूर्व काकांना ई-मेल करीत असे. त्यावर काकांचा अभिप्राय येई, काही मौलिक सूचना येत, लक्षात न आलेला एखादा मुद्दा येई. परंतु, काकांनी चुकूनही कधी असे म्हटले नाही की, हा लेख आता छापू नको. याबाबतीत दामुअण्णांचे प्रतिबिंब त्यांच्यात मी पाहत असे.

 

डिसेंबर २००६ला फोर्टिज रुग्णालयामध्ये काकांचे बायपास सर्जरीचे ऑपरेशन होते. काका, पत्नी डॉ. ज्योत्स्ना कुकडे आणि मुलगी अनघा असे तिघेही जण आदल्या रात्री माझ्या घरीच मुक्कामाला आले. मुंबईतील आमची घरे तशी लहान असतात. त्यामुळे एक रात्रीपुरती का होईल ना, या तिघांची व्यवस्था कशी होईल, याची धाकधूक माझ्या मनात होती. परंतु, काका, काकू ज्योत्स्नाताई आणि मुलगी अनघा हे साधेपणात एकमेकांचे प्रतिस्पर्धक होते. कोणाच्याही वागण्यात कसलाही डामडौल नाही, भोजनाचा स्वाद अगदी मनापासून त्यांनी घेतला आणि आमच्यावर कोणतेही दडपण येणार नाही याची काळजी घेतली. ठरल्याप्रमाणे काकांवर शस्त्रक्रिया झाली, यशस्वी झाली आणि काका नंतर पुण्याला आणि पुढे लातूरला गेले. डॉक्टरांच्या प्रकृतीला आराम पडावा आणि त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी म्हणून लातूरमधील आणि लातूरबाहेरील किती लोकांनी देवापुढे प्रार्थना, पूजा, किंवा नवस केले असतील हे सांगता येणार नाही. शेवटी मनुष्यजीवनाचे सार्थक काय असते, मनुष्यजीवनाचे सार्थक 'धर्म' जोडण्याचे असते, बाकी सर्व इथेच राहते, फक्त धर्म आपल्याबरोबर येतो. काकांनी हा 'धर्म' जोडून अंगीकृत करण्याचे कार्य आयुष्यभर केलेले आहे. म्हणून त्यांना मिळालेला 'पद्मभूषण' पुरस्कार माझ्याप्रमाणे लाखोंना 'आनंदाचे डोही आनंद तरंग'चा अनुभव देणारा ठरलेला आहे.

 

...तरी काका जिंकलेलेच आहेत!

 

“डॉ. हेडगेवार रुग्णालयात येण्यापूर्वी तुला लातूरला काका कुकडेंना भेटून यावे लागेल,” हा माझ्या आयुष्यातील पहिला प्रसंग ज्यामध्ये काकांचे नाव निघाले. आमची स्वारी लातूरला दाखल झाली. बांधकाम चालू असलेल्या वरच्या मजल्यावर काकांचे र्एींशपळपस थरश्रज्ञ व माझ्याशी संवाद दोन्ही चालू! त्या दिवसापासून आजपर्यंत मी त्यांच्या पावलांशी, चालीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आज ही माझी घाई होते आहे. सुरुवातीला डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या प्रत्येक बैठकीला काका आर्वजून उपस्थित असायचे. शेवटी काका काय म्हणतात याकडे आमच्या सर्वांचे लक्ष असायचे व मग निर्णय होत असे, प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका येतात व त्या-त्या भूमिकेत जाऊन कर्तव्य पार पाडणे ही कला ज्याला जमते तो जिंकला! 'पद्मभूषण' मिळाले नसते तरी, काका जिंकलेलेच आहेत! त्याकाळी आम्ही जेव्हा खूपच तरुण होतो, तेव्हा कसा विचार करावा, कशाचे भान बाळगावे, हे काकांनीच आम्हाला शिकवले. आपण जेव्हा आपले मत, विचार व्यक्त करतो तेव्हा त्यामध्ये आलेले अनुभव, इतरांचे विचार याचे भरपूर योगदान असते. डॉ. काका कुकडे यांच्या प्रत्येक सहवासात ते कधी कधी हे जाणवून द्यायचे की, हा विचार, ही कल्पना कोणाकडून तरी मिळाली आहे. मात्र, त्या विचारांचे पृथ्थकरण, काकांच्या संतुलित, संयमित विचार प्रणालीत झालेले असते व त्याचा ठसा मनाला भिडणारा, खोलवर रुजणारा असतो. काकांची ही क्षमता त्यांनी प्रयत्नपूर्वक आत्मसात केली आहे, जाणीवपूर्वक स्वत:ला घडवले आहे. त्यांच्या खात्यात एखादा विषय गेला की, काकांच्या पृथ्थकरणाच्या भट्टीतून योग्य, संयुक्तिक सल्लाच बाहेर पडतो, योग्य तेच मार्गदर्शन आपल्याला प्राप्त होते. ही तपश्चर्या आहे. मागील ५० वर्षांच्या लातूरमधील कष्टातून हे प्राप्त झाले आहे. कर्तव्यकठोर शल्यविशारद, संवेदनशील माणूस व सृजनशील स्वयंसेवक तिन्हींचा उत्तम संयोग मा. काका कुकडे होत. या प्रत्येक भूमिकेला आवश्यक गुणांची जोपासना अत्यंत तरुण वयात सुरू करणाऱ्या काकांना खरं तर 'पद्म' पुरस्काराची गरज नव्हतीच! काकांनी स्वतः या भूमिकांमध्ये शिरताना त्याकरिता लागणारे कष्टही केले आहेत व भानही बाळगले आहे. त्यामुळेच मार्गदर्शकांच्या किंवा क्षेत्र संघचालकाची भूमिका करित असतानाच काकांमधील डॉ. कुकडे सुप्त असला तरी, निद्रिस्त नसतोस्वयंसेवक तर सतत जागाच असतो. 'निरक्षर विवेक' हा गुण आहे की दैवी देणगी असा संभ्रम पडावा इतके मूर्तिमंत व्यक्तिमत्त्व म्हणजे काका कुकडे! पद्मभूषण काका कुकडेंना पदस्पर्श!

 

डॉ. अनंत पंढरे, कार्यवाह,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित,

डॉ. हेडगेवार रुग्णालय, औरंगाबाद

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/