पोपदरबारी न्याय पुकारी...

    दिनांक  19-Feb-2019   


एरवी पोप यांचे समस्त ख्रिस्ती बांधवांना संबोधन-संदेशासाठी प्रसिद्ध असलेले व्हॅटिकन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. ‘ईसीए’ अर्थात ‘एन्डिंग क्लेरिकल अब्यूस’ नावाच्या संस्थेंतर्गत चर्चमधील फादर, बिशप यांच्या लैंगिक अत्याचारांना बळी पडलेले जगभरातील नागरिक व्हॅटिकनमध्ये एकत्र दाखल होणार आहेत, ते बाललैंगिक अत्याचारविरोधाच्या एका जागतिक परिषदेसाठी.

 
 

व्हॅटिकन... जगभरातील तब्बल १.२ अब्ज ख्रिस्तीधर्मीयांचे सर्वोच्च श्रद्धास्थान. या छोट्याशा स्वतंत्र देशातूनच पोप जगभरातील ख्रिश्चन धर्माची धुरा सांभाळतात. एकूण जागतिक लोकसंख्येच्या जवळपास एक तृतीयांश असलेल्या ख्रिश्चन बांधवांसाठी व्हॅटिकनचे महत्त्व तसे अनन्यसाधारण. मात्र, एरवी पोप यांचे समस्त ख्रिस्ती बांधवांना संबोधन-संदेशासाठी प्रसिद्ध असलेले व्हॅटिकन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. ‘ईसीए’ अर्थात ‘एन्डिंग क्लेरिकल अब्यूस’ नावाच्या संस्थेंतर्गत चर्चमधील फादर, बिशप यांच्या लैंगिक अत्याचारांना बळी पडलेले जगभरातील नागरिक व्हॅटिकनमध्ये एकत्र दाखल होणार आहेत, ते बाललैंगिक अत्याचारविरोधाच्या एका जागतिक परिषदेसाठी. या सगळ्यांची मागणी एकच की, अशाप्रकारे लैंगिक अत्याचार आणि बालकांचे शोषण करणार्‍या बिशप आणि फादरवर चर्चने कडक कारवाई करावी. खरं तर या संस्थेची स्थापना गेल्या वर्षी अशाच एका चर्चपीडित महिलेच्या पुढाकाराने करण्यात आली. आज वय वर्षे ५७ असलेल्या या महिलेवर तिच्या वयाच्या १७व्या वर्षापासून एका ख्रिश्चन धर्मोपदेशकाने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. तिचा दोनदा गर्भपातही घडवून आणला. पण, भीतीपोटी, बदनामी नको म्हणून ती गप्पच राहिली. पण, आज चर्चमधील अशा लैंगिक अत्याचारांविरोधी आवाज उठवणार्‍या, इतके वर्षं याची जाहीर वाच्यताही न करणारे शेकडो पीडित व्हॅटिकनमध्ये अशा दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे, या मागणीसाठी जगभरातून दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. आपल्यावर जी भीषण परिस्थिती गुदरली, ती इतर ख्रिस्ती बंधुभगिनींनीवर ओढवू नये म्हणून अशा शिक्षांसाठीचे चर्चचे कायदे अधिकाधिक कडक करावेत, बाललैंगिक अत्याचाराची स्पष्ट व्याख्या करावी, तसेच अशा प्रकारचे अत्याचार करणार्‍यांची जागतिक पातळीवर नोंद घेतली जावी, धर्माच्या पडद्याआड असे अपराध करणार्‍यांना कायमस्वरुपी चर्चच्या व्यवस्थेतून मुक्त करावे, अशा अनेक आग्रही मागण्या या परिषदेत मांडल्या जातील. एकप्रकारे पोप फ्रान्सिस आणि संपूर्ण चर्चच्या व्यवस्थेवरच लैंगिक शोषणासारख्या गुन्ह्यांवर कडक शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असेल. त्यामुळे आगामी काळात यासंदर्भात पोप फ्रान्सिस कडक भूमिका घेतात की पोपदरबारी न्यायाच्या आशेने दाखल झालेल्यांना फक्त ‘ब्लेसिंग्स’ घेऊन परतावे लागते, ते बघावे लागेल.

 

आक्रोश त्या पीडितांचा...

 

केरळमधील बिशप फ्रॅन्को मुलक्क्लच्या प्रकरणातही चर्च प्रशासनाने वेळोवेळी बोटचेपी भूमिका घेतली. नन्सवर अविश्वास व्यक्त करत उलट त्यांच्यावरच हे प्रकरण मिटविण्यासाठी दबाव टाकण्यात आला. इतकेच नाही, तर चर्च प्रशासनाच्या आदेशाला न जुमानणार्‍या नन्सना ‘काँग्रिगेशन’ अर्थात धार्मिक सभांपासून हटविण्यासंबंधीची धमकीवजा पत्रेच पाठविण्यात आली. म्हणजे, एकीकडे पोप फ्रान्सिस यांनी जगभरातील चर्चच्या अशा वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारींची दखल घेऊन याकडे गांभीर्याने पाहण्याची किमान वाच्यता करायची, तर दुसरीकडे जगभरातील प्रत्यक्ष परिस्थिती, घटना पाहिल्या असता या गुन्ह्यांना चर्च प्रशासनाकडून फारसे गांभीर्याने घेतलेच जात नाही, असे दिसते. खरं तर, भारतापेक्षा पाश्चिमात्त्य देशांत या प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. अमेरिकेतही मोठ्या प्रमाणात चर्च आणि धर्मोपदेशकांकडून होणार्‍या लैंगिक अत्याचारांविरोधी माध्यमांमध्ये आवाज उठविला गेला. युरोपीय देशांमध्येही कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती असली तरी, आजही असे लाखो अपराध समोर येत नाहीत आणि आलेच तरी दोषींवर कारवाईचीही शाश्वती नाहीच. आज पाश्चितमात्त्य देशांमध्ये तसेच जागतिक पातळीवर चर्चच्या या कुकृत्यांचा पदार्फाश करणार्‍या अनेक संस्था कार्यरत आहेत. या संस्थांचे बहुतांशी संस्थापक हे वैयक्तिकरित्या अशा अत्याचारांना बळी पडलेले... जे त्यांच्यासोबत झाले, ते इतरांबरोबर होऊ नये, एवढीच त्यांची माफक अपेक्षा आणि म्हणूनच यांसारख्या विविध संस्थांच्या माध्यमांतून व्हॅटिकनवर दबाव आणण्यासाठी ही जागतिक परिषद संपन्न होणार आहे. अगदी ११ वर्षांच्या मुलापासून ते मध्यमवयीन नन्सवरील धर्मोपदेशकांच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांवर नजर टाकली की, यातील भीषणता मन विषण्ण करून जाते. तेव्हा, पीडितांच्या या शारीरिक, भावनिक वेदनांची झळ व्हॅटिकनपर्यंत पोहोचावी म्हणून बाललैंगिक अत्याचारविरोधी ही परिषद मैलाचा दगड ठरू शकते. पण, खेदाची बाब म्हणजे पाश्चिमात्त्य माध्यमांमध्ये या प्रकरणांविरोधात ज्या तीव्रतेने आवाज उठविला जातो, तितकी तळमळ भारतीय माध्यमांमध्ये अपवादानेच दिसून येते. म्हणजे ढोंगी बाबा-बुवांची प्रकरणे चवीने चघळणार्‍या काही माध्यमांना पांढर्‍या झग्याआडचे हे कृष्णकृत्य करणारे ‘फादर’ दिसत नाहीत की, मुद्दाम डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना एकप्रकारे संरक्षणच दिले जाते, हा प्रश्न निर्माण होतो. असो. या जागतिक परिषदेतून या विषयावर चर्चा होईल, मंथन घडून येईल, हेही नसे थोडके...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat