लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदार नोंदणी करा

    19-Feb-2019
Total Views |



मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांचे आवाहन

 

मुंबई : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व पात्र व्यक्तिंनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी केले आहे. संकेतस्थळ, टोल फ्री हेल्पलाईन, एसएमएस सुविधा तसेच प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन मतदार यादीची पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ३१ जानेवारी २०१९ राज्यातील मतदारांची अंतिम यादी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये एकूण ८ कोटी ७३ लाख ३० हजार ४८४ इतके मतदार असल्याचेही ते म्हणाले.

 

आयोगाच्या सूचनेनुसार वोटर व्हेरिफिकेशन ॲण्ड इन्फॉर्मेशन प्रोग्राम (व्हीव्हीआयपी) कार्यक्रमांतर्गत सध्या मतदार असलेल्या आणि मतदार नसलेल्या परंतु, मतदार नोंदणीस पात्र असलेल्या व्यक्तींसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, "मतदार यादीची पडताळणी करण्यासाठी '१९५०ही टोल फ्री हेल्प लाईन, www.nvsp.in आणि https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तसेच प्रत्यक्षरित्या मतदार सुविधा केंद्राला भेट देऊन खात्री करता येऊ शकते. जर आपले नाव मतदार यादीत नसेल तर मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat