जपान फिरविणारा अवलिया...

    दिनांक  19-Feb-2019


एका प्रवासात जड झालेल्या बॅगेव्यतिरिक्त स्वतः शिकून दुसर्‍यालाही शिकवू शकेल, इतकेच ज्ञान सोबत आणता येईल, अशी जपानची सफर राजेश वैद्य घडवत आहेत.

 

मुंबईतील दादरमध्ये संपूर्ण बालपण गेलेला माणूस एक दिवस लोकांना वेगळ्या दृष्टिकोनातून जपान फिरवेल, असे कधी कोणाला वाटलेही नसेल. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून इंजिनिअरिंग करताना कॅम्पस इंटरव्ह्यूमधून एका बड्या कंपनीत ‘कस्टमर इंजिनिअर’ म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी राजेश वैद्य यांना लाभली. त्यानंतर एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत नऊ वर्षे काम केल्यानंतर ‘आयबीएम जपान’सारख्या मोठ्या कंपनीमध्ये सन सोलारीस मशीन्सची सुरक्षा पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यानंतर जर्मनीमधील तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या ‘ड्रेझनर बँके’चे कामही त्यांनी पाहिले. आपण फक्त पुस्तकात वाचलेल्या जपान, इंग्लंड, सिंगापूर, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मॉरेशियस, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड यांसारखे बरेचसे देश त्यांनी कामानिमित्त पालथे घातले. यानंतर टोकियोमधल्या ‘जे. पी. मोर्गन चेस’ या अमेरिकन बँकमध्ये कामाचा अनुभव घेतला आणि १९९७ मध्ये सुरू केलेल्या या प्रवासाला स्वल्पविराम देत बरेचसे अनुभव गाठीशी घेऊन मग २०१४ मध्ये ते भारतात परतले. भारतात आल्यावर साधारण दोन वर्षे त्यांचे इंजिनिअरिंग ट्रेडिंगचे काम सुरू होते. मात्र, अनेक देश फिरल्यानंतर मनात साठलेली जपानची ओढ त्यांना काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हती. दरम्यान, एकदा नुकतीच युरोपची सहल करून आलेल्या त्यांच्या मामांशी बोलताना त्यांच्या लक्षात आले की, त्यांना युरोप प्रवासाविषयी काहीच माहिती नव्हती. फक्त ते फिरून आले आणि त्यांनी फोटो काढले इतकेच! तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, बर्‍याच कंपन्यांच्या टूर्स खर्चिक असतात. पण त्यातून लोकांना, जगण्यासाठी, शिकण्यासाठी नेहमीपेक्षा आश्वासक असे फारसे काहीच मिळत नाही. म्हणून मग त्यांनी निवृत्ती घेण्याच्या वयात एक नवा ध्यास घेतला. तो ध्यास होता, आपल्या मनात भरलेला जपान एका नव्या दृष्टीने भारतीयांना दाखवण्याचा. ‘देशीविदेशी टूर्स पुष्कळ करता येतात, पण समाधान मिळवायला खरी धडपड करावी लागते,’ ही गोष्ट त्यांनी नेमकी हेरली. प्रत्येक भारतीय प्रवाशाला आपण हे समाधान देण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा हा पणच त्यांनी केला.

 

आयुष्यातली तब्बल १५ वर्षे राजेश यांनी जपानमध्ये घालवली. जपानला त्सुनामी आल्यानंतर ते आपतग्रस्त भागात स्वयंसेवक म्हणून राबले. अक्षरश: हजारो तास त्यांनी जपानी लोकांबरोबर घालवले आहेत. बर्‍याच गोष्टी नीट समजून-उमजून आपली ही मिळकत प्रत्येक भारतीयाला तिथे नेऊन देऊ या धारणेने ’हिकारी’ या केवळ जपानलाच नेणार्‍या एकमेव टूर कंपनीची त्यांनी स्थापना केली. ”ही कंपनी सुरू करण्यामागे एकच विचार होता तो म्हणजे, उत्सुकता म्हणून लोकं प्रवासाला जातात. मात्र, तिथून परतताना फक्त वस्तूंनी जड झालेल्या बॅगेशिवाय दुसरं काहीही आणत नाहीत. म्हणूनच माझ्यासोबत येणारी प्रत्येक व्यक्ती भारतात परताना या बॅगेव्यतिरिक्त स्वत: शिकून दुसर्‍यालाही शिकवू शकेल, इतकं ज्ञान सोबत घेऊन येईल. ही खात्री मला प्रत्येकाला द्यायची होती,”असं राजेश अभिमानाने सांगतात.

 

जपानमध्ये साहजिकच रेल्वे स्थानकांची नावे ही जपानी भाषेत असतात. रेल्वेसाठी दोनच ट्रॅक. या अप आणि डाऊन मार्गावरच मग स्लो, सेमी फास्ट, फास्ट, सुपर फास्ट अशा विविध मार्गांवरच्या रेल्वेगाड्यांची उद्घोषणा करण्यात येते. परंतु, राजेश जेव्हा रेल्वेने प्रवास करायचे, तेव्हा त्यांना हेच माहिती नसायचे की, ही गाडी त्यांना इच्छितस्थळी सोडेल की नाही. जी गाडी आली त्या गाडीत ते बसायचे आणि जर ती रेल्वे कधी पुढे गेली, तर परत यायला दुसरी रेल्वे पकडावी लागे आणि मग पुन्हा ती रेल्वेही इच्छितस्थळी थांबेल अथवा नाही, हा प्रश्न होताच. राजेश यांना जपानी भाषा अवगत नव्हती. पण, जपानी भाषेत ‘हाय हाय’ म्हणजे ‘ये’ हा अर्थ त्यांना माहीत होता. टॅक्सीमध्ये बसून त्यांनी प्रवास केला असता एकदा प्रवासाचे २२०० येन झाले. परंतु, राजेश यांनी त्याला ३००० येन दिले. त्यानंतर तो चालक त्यांना जपानी भाषेत काहीतरी म्हणाला. परंतु, त्यांना ते कळलेच नाही. ते ‘हाय हाय’ करत गेले, तेव्हा त्या चालकाला गहिवरून आले. तो त्यांना ‘थॅक्यू’ म्हणायला लागला. त्यानंतर त्यांना कळले की, तो ८०० येन परत देणार होता. पण, त्याने अशा प्रकारे आभार व्यक्त केल्यानंतर ८०० येन परत कसे मागायचे, म्हणून त्यांनी ते पैसे त्या टॅक्सीचालकाला दिल्याची आठवण सांगितली.

 

राजेश जेव्हा स्वत: प्रवासी म्हणून जपानमध्ये फिरले, तेव्हा टूरसोबत आलेल्या भारतीय प्रवाशांना फक्त भारतीय अन्नपदार्थ देण्याचा प्रकार त्यांना आढळला. म्हणूनच तर प्रवाशांना खवय्येगिरीचा यथेच्छ आस्वाद घेता यावा, या हेतूने आपण फक्त तिथे अफलातून असणार्‍या खाऊगल्ल्यांमध्ये पर्यटकांना फिरवायचे आणि त्यांना जपानी खाद्यपदार्थांचा, तिथल्या संस्कृतीचा मनमुराद आनंद लुटायला द्यायचा, या एकमेवं गोष्टीवरच त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. फक्त नव्या जागा पर्यटकांना दाखवून उपयोग होणार नाही, तर आपल्या भारतीयांना तिथल्या लोकांसोबत मिसळवायला हवं. जर का आपली लोकं जपानी लोकांसारखंं जगू शकले, तरच ते बर्‍याच गोष्टी आत्मसात करू शकतील, हा विचार त्यांच्या मनात डोकावला आणि त्यांनी आपल्या टूरमध्ये काही बदल करत तो प्रत्यक्षात आणला. जर जपानमध्ये फिरायला जायचे असेल, तर त्यांची संस्कृती जाणून घ्यायला हवी. व्यवसायाचा विचार न करता मनापासून ते काम केले, तर नक्की यश मिळते, असे ते सांगतात. अगदी एकही कर्मचारी न ठेवता एकट्याने सर्व भारतीयांना जपान दाखवणार्‍या या अवलियाचा प्रवास आजही असाच अविरत सुरू आहे.

 
- नितीन जगताप  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat