संरक्षणदलासाठी नाशिक ठरत आहे केंद्र

    दिनांक  19-Feb-2019   

 

 
 
 
 
आध्यात्मिक नगरी, द्राक्ष पंढरी, कुंभ नगरी अशा कितीतरी विशेषणांनी नाशिकची ओळख आजवर भारतासह जगातील इतर देशांना झाली आहे. अपवादाने कोणी तरी येथील एचएएल, करन्सी नोट प्रेस, तोफखाना केंद्र अशा आस्थापनांचा परिचय करून देत हेही नाशिकच आहे, असे सांगताना दिसते. मात्र, नोव्हेंबर महिन्यापासून नाशिक भारतीय संरक्षणदलासाठी केंद्र ठरत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
 

हिमालयाच्या संरक्षणाला सह्याद्रीची साथ असते, अशी विचारधारा आपण पाहत असतो. मात्र, भारतातील सर्व प्रांतांत गोदा काठ आता संरक्षण सिद्धता पुरवण्यासाठी विस्तारत आहे, अशी विचारधारा उदयास येत आहे आणि ही नाशिककर नागरिकांसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. तेलगी घोटाळा, वैभव कट्यारे अपहरण व हत्या, दुचाकी जळीत प्रकरणे, मालेगावची २००० सालची दंगल, बॉम्बस्फोट अशा गुन्हेगारी कृत्यांमुळे नाशिक नगरी आध्यात्मिकतेतील शांतीचा त्याग करून अशांततेकडे वाटचाल करत असल्याची टीका विविध घटनांच्या वेळी प्रसारमाध्यमांमार्फत तसेच समाजमाध्यमांमार्फत होताना दिसत होती.

 

मात्र, आता थेट शत्रूच्या हृदयात धडकी भरविणारे शस्त्रसज्जतेचे केंद्र म्हणून नाशिक उदयास येत आहे आणि याची नोंद घेणे हे अत्यावश्यक वाटते. बोफोर्स तोफांच्या खरेदी नंतर भारतीय सैन्यदलाने कोणतीही तोफ खरेदी केली नव्हती. याला सुमारे ३२ वर्षांचा कालखंड लोटला. मात्र, ३२ वर्षांनंतर तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात भारतीय सैन्यदलाच्या ताफ्यात ‘होवीत्झर- एम७७७’ व ‘के-९ बज्’ या आधुनिक तोफा या नाशिक येथील देवळाली कॅम्प येथील तोफखाना केंद्रात दाखल झाल्या. यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचे सहलष्कर प्रमुख बिपीन रावत व लष्करातील अनेक अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले होते. नाशिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या या तोफांमुळे भारतीय तोफखान्यातील ताकद नक्कीच वाढली आहे. याचा परिचय याच तोफांनी येथे पार पडलेल्या ‘तोफची’ या कार्यक्रमाद्वारे करून दिला. नोव्हेंबर महिन्याच्याअंती नाशिकमध्ये केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांनी व ‘निमा’सारख्या उद्योजकांच्या संघटनेच्या पुढाकारामुळे नाशिकमध्ये ‘डिफेन्स इनोव्हेशन हब’ साकारण्यात आले. संरक्षण सिद्धतेत भरारी घेऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी हे हब वरदान ठरणार आहे हे निश्चित. तसेच यातून रोजगारदेखील निर्माण होणार आहेत.

 

आता या महिन्याच्या उत्तरार्धात बोफोर्सपेक्षा जास्त अंतरापर्यंत मारक क्षमता असलेली स्वदेशी ‘धनुष-१५५ एमएम’ तोफ व ‘सारंग एम -४६’ तोफ यांच्या भारतीय सैन्यदलातील समावेशाची साक्षीदारदेखील नाशिक नगरी ठरणार असल्याचे देवळाली लष्करी छावणीच्यावतीने सांगण्यात आले आहे. संपूर्ण स्वदेशी बनावटीची असणारी ही तोफ गोदेच्या काठी सामील होऊन रावी, बियास, झेलम अशा उत्तरेतील नद्यांच्या साक्षीने राष्ट्राच्या संरक्षणात आपली महत्त्वाची भूमिका येत्या काळात बजाविणार आहे. या तोफांची वैशिष्ट्ये म्हणजे, या डोंगराळ भागात मारा करण्यास अतिशय उपयुक्त आहेत. या तोफा सैन्यदलात सामील करण्याच्या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी शक्यतादेखील वर्तविली जात आहे.

 

मागील काही वर्षांपासूनस्वदेशी बोफोर्स’ म्हणून परिचित असलेल्या ‘धनुष’च्या चाचण्या या भारतातील विविध डोंगराळ भागात घेण्यात आल्या होत्या. यासाठी बर्फाच्छादीत प्रदेश व वाळवंट असे विविध भौगोलिक स्थिती असलेले प्रदेश समाविष्ट करण्यात आले. तसेच, पोखरण येथेही ‘धनुष’ची चाचणी घेण्यात आली असून, ती यशस्वी झाल्याने ही तोफ आता नाशिक येथे राष्ट्रास अर्पण करण्यात येणार आहे. ‘धनुष’चे वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्णत : स्वदेशी बनावटीची तोफ आहे. हिची निर्मिती जबलपूर येथील कारखान्यात करण्यात आली आहे. ‘धनुष’च्या माध्यमातून दोन फैरी सलग दोन तास, तर तीन फैरी सलग दीड तासापर्यंत डागता येऊ शकतात. तसेच, या तोफेच्या माध्यमातून ४६ किमीपर्यंतच्या अंतरावर बॉम्बहल्ला करता येऊ शकतो. ही तोफ पूर्णपणे आधुनिक व स्वयंचलित आहे. बोफोर्सपेक्षा १८ किमी अधिकपर्यंत या तोफेच्या माध्यमातून मारा करता येऊ शकतो. अशी माहिती देवळाली येथे देण्यात आली. भारतीय सैन्यामार्फत सुमारे २०० ‘धनुष’ तोफांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात ११४ ‘धनुष’ तोफा भारतीय सैन्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

राष्ट्र संरक्षण’ आणि ‘संरक्षण सामुग्री’ हा विषय नाशिकपुरता मर्यादित नसला तरी, तीन ते चार महिन्यांत नाशिक हे अत्याधुनिक शस्त्रसामग्री प्रदान करण्यासाठी महत्त्वाचे केंद्र ठरत आहे, हे नाकारता येणार नाही. देशातील दुसरे आणि राज्यातील पहिले ‘हब’सारखे दालन हे नाशिकला साकारले गेले असल्याने व त्यात टेस्टिंग करण्यास आवश्यक असणारी सर्व साधनांची उपलब्धता नाशिकमध्येच असल्याने येणाऱ्या काळात देशाच्या संरक्षण क्षेत्रात नाशिक महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यास वाव मिळत आहे.

 

सारंग तोफ

 

‘सारंग’ ही स्वदेशी तोफ असून, ‘साल्टम’ला हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ‘साल्टम’ सध्या तोफखान्याच्या ताफ्यात आहे. मात्र, या तोफा विदेशी बनावटीच्या आहे. या तोफेला उत्तम पर्याय ठरू पाहणारी ‘सारंग एम ४६’ ही १५५ एमएमची असून, तीदेखील भारतीय सैन्यदलात आगमनासाठी सज्ज झाली आहे. डोंगराळ भागात तळ ठोकून बसलेल्या शत्रूंची ठिकाणे उद्ध्वस्त करण्याची क्षमता ‘सारंग’मध्ये आहे. २०२२ पर्यंत सुमारे ३०० तोफांची निर्मिती होऊ शकते. भारतीय तोफखाना दिवसेंदिवस अधिक बळकट व आधुनिक होत आहे, यात शंका नाही. ताफ्यात नवनवीन अत्याधुनिक आयुधे दाखल होत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat