कुलभूषण जाधव प्रकरणी आजपासून सुनावणी

18 Feb 2019 12:14:47


 


आंतरराष्ट्रीय न्यायालयात पुढील चार दिवस चालणार सुनावणी

 

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणावर आजपासून आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे. कथित हेरगिरीच्या प्रकरणात २०१७ साली पाकिस्तानने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणी भारताने आंतराष्ट्रीय न्यायालयात धाव घेत जाधव यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. सोमवारपासून सुरु होणारी ही सुनावणी पुढील चार दिवस चालू राहणार आहे.

 

भारताने ८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाधव प्रकरणी दाद मागितली होती. यावर आंतरराष्ट्रीय न्यायालायने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली होती. दोन्ही पक्षांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने १८ फेब्रुवारीला सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आजपासून १८ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान सुनावणी होणार आहे. या सुनावणीची सुरुवात भारताकडून होणार असून पाकिस्तान १९ तारखेला आपली बाजू मांडेल. यानंतर २० तारखेला पाकिस्तानच्या आरोपाला भारत उत्तर देईल तर पुन्हा २१ ला पाकिस्तान आपली भूमिका मांडेल. दरम्यान, भारताकडून हरीश साळवे जाधव यांची बाजू मांडणार आहेत.

 

काय आहे प्रकरण?

 

कथित हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालायने जाधव यांना एप्रिल २०१७ साली फाशीची शिक्षा सुनावली होती. जाधव हे निवृत्त नौदलाचे अधिकारी असून पाकिस्तानच्या गुप्तचार विभाग आयएसआयने त्यांचे इराणमधून अपहरण केले होते.

 

दरम्यान, पुलवामा येथील घटनेनंतर जाधव प्रकरणावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले असून संपूर्ण देश जाधव यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0