देवळाली स्टेशनमध्ये बॉम्ब ? नाशिकमध्ये खळबळ

    दिनांक  18-Feb-2019

 

 
 
 
 
नाशिक : देवळाली रेल्वे स्थानकात एक बेवारस बॅग सापडली असून बॉम्ब शोधक नाशक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रविवारी १७ फेब्रुवारी रोजी पोलीस आयुक्तालयाला देवळाली रेल्वेस्थानक बॉम्बस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. एका निनावी पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली. दरम्यान, देवळाली या रेल्वे स्थानकात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली होती. बॉंम्ब शोधक नाशक पथकाद्वारे या बेवारस बॅगेचे स्कॅनिंग करण्यात आले. बॅगेत कपडे आणि खाण्याचे सामान आढळले असून या बेवारस बॅगेमध्ये बॉम्ब नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
 

या घटनेमुळे देवळाली परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस यंत्रणा आणि रेल्वे सुरक्षा पोलीस प्रशासन याबाबत सतर्क आहेत. ते निनावी पत्र मिळताच पोलीस आयुक्तालयाने खबरदारी घेत देवळाली रेल्वे स्थानकात बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून तातडीने तपास केला. या रेल्वे स्थानकात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नसल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नयेत. अफवा पसरवू नयेत. असे आवाहन नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी नागरिकांना केले आहे.

 

पोलीस आयुक्तालयाला आलेल्या निनावी पत्रात दोन दिवसामध्ये देवळाली रेल्वे स्थानक बॉम्बस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. पोलीस आयुक्तलयाने बॉम्ब शोधक नाशक पथकाला तातडीने याबाबतीत आदेश दिले. बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून श्वानांच्या सहाय्याने देवळाली रेल्वे स्थानकात आणि स्थानकाच्या परिसरात तपास करण्यात आला. रविवारीच बॉम्ब शोधक नाशक पथक देवळाली रेल्वे स्थानकामध्ये दाखल झाले.

 

देवळाली रेल्वे स्थानकात आणि स्थानक परिसरातील कचराकुंड्या अडगळीच्या जागा धातूशोधक यंत्राद्वारे तपासण्यात आल्या. सुमारे तासभरापेक्षाही अधिक वेळ हा तपास सुरु होता. परंतु रेल्वे स्थानकात तसेच स्थानक परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. देवळाली हा लष्करी छावणीचा परिसर आहे. देवळाली परिसरात असलेले आर्टीलरी स्कूल हे भारतीय सैन्याचे अतिमहत्त्वाचे केंद्र आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat