...तर ‘क्लीन अप मार्शल’च भरतील दंड

    दिनांक  18-Feb-2019   


 


मुंबईत अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांना शिस्त लागावी, तसेच ‘सुंदर मुंबई, स्वच्छ मुंबई’चे स्वप्न साकार व्हावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईसाठी ‘क्लीन अप मार्शल’ नेमले आहेत. परंतु, हे ‘क्लीन अप मार्शल’ विनाकारण नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे वेळोवेळी आल्या. एवढेच नव्हे, तर ‘क्लीन अप मार्शल’ने जाहिरातीचे फलक घेऊन जाणारा टेम्पो भांडुप-कांजुर मार्गदरम्यान अडवून चालकाला एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. ‘क्लीन अप मार्शल’कडून अधिकारांचा गैरवापर होत असल्याच्या भरपूर तक्रारीही आल्या. खुद्द साहाय्यक आयुक्तांनीही तक्रार केल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, दंडापोटी वसूल केलेली रक्कम परत करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली होती. या तक्रारींची दखल घेत पालिकेने ‘क्लीन अप मार्शल’ विषयीच्या नियमावलीमध्ये दुरुस्ती केली आहे. त्यामुळे अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याच्या नावाखाली मुंबईकरांना लुबाडणाऱ्या ‘क्लीन अप मार्शल’ विरोधात पालिका प्रशासनाने कारवाई करणार आहे. मुंबई महापालिकेने ‘क्लीन अप मार्शल’ संदर्भातील नियमावलीत सुधारणा केली आहे. मुंबईकरांना विनाकारण त्रास देणाऱ्या ‘क्लीन अप मार्शल’वर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे, तर चौथा गुन्हा करणाऱ्या ‘क्लीन अप मार्शल’ची नियुक्ती करणाऱ्या संस्थेचे नाव काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. नागरिकांनी ‘क्लीन अप मार्शल’ची तक्रार केल्यानंतर प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन शहानिशा करण्यात येईल. ‘क्लीन अप मार्शल’विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीतील आरोप सिद्ध झाल्यास त्याला दंड आकारला जाणार आहे. दोषी ‘क्लीन अप मार्शल’वर पहिल्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी २० हजार रुपये, तिसऱ्या गुन्ह्यासाठी ३० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे, तर चौथा गुन्हा घडल्यास त्याची नियुक्ती करणाऱ्या संस्थेचे नाव काळ्या यादीत टाकण्यात येणार असून ‘क्लीन अप मार्शल’च्या नियुक्तीसाठी भरण्यात आलेली पाच लाख रुपयांची अनामत रक्कम जप्त करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘क्लीन अप मार्शल’कडून होणाऱ्या मुंबईकरांची लूट रोखली जाईल, अशी अपेक्षा आता करायला हरकत नाही.

 

-सिगारेटचा चटका...

 

देशात एकीकडे व्यसनमुक्तीसाठी विविध पातळ्यांवर व्यापक काम सुरू आहे. त्याचे फलित प्रौढ लोकसंख्येमधील तंबाखू सेवनाचे प्रमाण सहा टक्क्यांनी खाली आल्याचे ‘ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्व्हे’च्या पहिल्या व दुसऱ्या आवृत्तीतील तुलनात्मक अभ्यासातून समोर आले आहे. दुसरीकडे मात्र मुंबई शहर-उपनगरात असणाऱ्या महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना ई-सिगारेटचे व्यसन लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शालेय वयात मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. विद्यार्थ्यांना घरातून पॉकेटमनीसाठी पैसे मिळतात. या पैशातून ५०० रुपयांत कुठल्यातरी जवळच्या दुकानातून ही ई-सिगारेट्स विकत घेतली जातात. ई-सिगारेट्सचा धूर होत नाही़ ही इलेक्ट्रॉनिक सिगारेट असते. यात निकोटिन हे तंबाखूत असलेले द्रव्य समाविष्ट असते. या सिगारेट बॅटरीवर सुरू होतात. सिगारेट ओढताना त्यातील द्रवरुपी निकोटिनची वाफ तयार होऊन ती ओढली जाते. या वाफेला प्रत्यक्ष धूम्रपान केल्यासारखा वास नसतो. सिगारेट प्रत्यक्ष पेटवली जात नसल्यामुळे त्यापासून राखही तयार होत नाही. विशेष म्हणजे, धूम्रपानाचा आधुनिक प्रकार असलेल्या या ई-सिगारेट्स ऑनलाईन पद्धतीने सहजरित्या उपलब्ध होत आहेत. शाळकरी मुले व्यसन म्हणून नव्हे, तर ‘फॅशन’ म्हणून या ई-सिगारेटचे झुरके घेताना दिसतात. शहर-उपनगरांतील ४० पालिका शाळांमधील हा अहवाल समोर आला आहे. या शाळांमधील सातवी, आठवी व नववीच्या सुमारे ४ हजार, ३०२ विद्यार्थ्यांशी ‘सलाम बॉम्बे’ संस्थेच्या चमूने संवाद साधला. यावेळी, विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यातून हे धक्कादायक वास्तव उघडकीस आले. एकूण विद्यार्थ्यांपैकी ३४ टक्के विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची तयारी दर्शविली. या ३४ टक्क्यांमध्ये १४ टक्के विद्यार्थिनींचा, तर २० टक्के विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ई-सिगारेट ओढण्याचे कारण या विद्यार्थ्यांना विचारले असता, सामाजिक स्तरावर ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून हे व्यसन करत असल्याचे ४३.७ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. या व्यसनातून २८.८ टक्के विद्यार्थ्यांना आनंद मिळतो. अहवालात ९.३ टक्के विद्यार्थी कुतूहलापोटी, तर सात टक्के विद्यार्थी ताण दूर करण्यासाठी आणि सहा टक्के विद्यार्थी कंटाळा येतो म्हणून या व्यसनाच्या अधीन झाल्याचे चिंताजनक वास्तव उघडकीस आले आहे. त्यामुळे या धोक्यापासून विद्यार्थ्यांना वाचविणे आवश्यक आहे.

- नितीन जगताप

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat