पत्रकारिता, कोकण आणि भालचंद्र दिवाडकर...

    दिनांक  17-Feb-2019   

 


 
 
 
मोठ्या दैनिकांनी गेल्या काही वर्षांत रत्नागिरी, रायगड-सिंधुदुर्गात आपल्या आवृत्त्या सुरू केल्यानंतर आणि वेब-इलेक्ट्रॉनिक माध्यमं गावागावांत पोहोचल्यानंतरही जिल्हास्तरावरील दैनिक चालवणं हे महाकठीण काम. आर्थिक प्रश्न तर असतातच; शिवाय चांगला मजकूर आणि त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करणं हे मोठं आव्हान असतं. अशा परिस्थितीत दिवाडकर एकखांबी तंबू बनून दै. ‘सागर’ चालवत होते.
 

दै. ‘सागर’चे कार्यकारी संपादक भालचंद्र दिवाडकर यांचं काल वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झालं. अफाट वाचन आणि अभ्यास असलेलं दिवाडकरांसारखं व्यक्तिमत्त्व अचानकपणे जाणं धक्कादायक आहे. ‘सागर’चे संपादक नाना जोशी आणि कार्यकारी संपादक भालचंद्र दिवाडकर अशी दोन माणसं अगदी थोड्या अंतराने गेली. त्यांच्या जाण्यामुळे केवळ ‘सागर’चंच नाही तर चिपळूण आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं आहे.

 

मोठ्या दैनिकांनी गेल्या काही वर्षांत रत्नागिरी, रायगड-सिंधुदुर्गात आपल्या आवृत्त्या सुरू केल्यानंतर आणि वेब-इलेक्ट्रॉनिक माध्यमं गावागावांत पोहोचल्यानंतरही जिल्हास्तरावरील दैनिक चालवणं हे महाकठीण काम. आर्थिक प्रश्न तर असतातच; शिवाय चांगला मजकूर आणि त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करणं हे मोठं आव्हान असतं. अशा परिस्थितीत दिवाडकर एकखांबी तंबू बनून दै. ‘सागर’ चालवत होते. प्रादेशिक, पक्षीय राजकारणापासून ते तत्त्वज्ञान आणि मराठी, हिंदी, इंग्रजी साहित्यापासून ते माहिती-तंत्रज्ञानापर्यंत अनेक विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. माझा दिवाडकरांशी परिचय झाला तेव्हा मी अकरावीत होतो. त्यावेळी थोडंफार लिहायला सुरुवात केली होती. ते ‘सागर’मध्ये नेऊन द्यायचो. त्यातलं काही छापलं जायचं. त्यानंतर काही दिवसांनी ‘सागर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखाचा प्रतिवाद म्हणून एक लेख मी दिवाडकरांना नेऊन दिला. आज तो लेख चुकून पाहिलाच, तर अगदीच बाळबोध वाटतो. तो तसाच होतादेखील. त्यात पुन्हा मी संध्याकाळी ७-८ च्या वेळेत तो घेऊन गेलेलो. ते सगळं त्यांनी वाचलं आणि त्यातला एकेक मुद्दा घेऊन मला समजावण्याचा प्रयत्न केला. मी काही ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हतो. तरी तासभर ते मला समजावत राहिले की, ‘बघ, हे असं आहे, हे त्याचे पुरावे आहेत. अमके ग्रंथ वाच, तमके लेख वाच, तिथे संदर्भ मिळतील, तू जे वाचून आलायस त्यात अमुक चुका आहेत वगैरे...’ माझा तो प्रतिवाद छापून आला नाही, हे सांगायला नकोच.

 

संध्याकाळी ७-८ ची वेळ म्हणजे दैनिकाची रणभूमी असते, हे तेव्हा कळत नव्हतं. अशात मी तिथे गेलो असता ’काय साली कटकट आहे’ असं म्हणून त्यांनी मला कटवून लावलं असतं तरी, त्यात काही विशेष नव्हतं. कार्यकारी संपादकासाठी तर नाहीच नाही. परंतु, त्यांनी तसं केलं नाही. पुढे मी पुण्यात गेलो, एस. पी-रानडेमध्ये शिक्षण झाल्यावर, दोन-तीन ठिकाणी थोडंफार काम केल्यानंतर मुंबईत येऊन दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये रुजू झालो. त्यानंतर असाच एकदा ‘सागर’च्या कार्यालयात दिवाडकरांना भेटायला गेलो. आपल्या चिपळूणातला कोणी विद्यार्थी मुंबईत जाऊन तिथल्या दैनिकात रूजू होऊन मंत्रालय बीटवर रिपोर्टिंग करतोय, याचा त्यांना झालेला आनंद जाणवत होता. पुढे गेल्या दोन-तीन वर्षांत अनेकदा त्यांच्याशी भेट झाली, दोन-दोन तास गप्पा झाल्या. विश्व संवाद केंद्राचा पुरस्कार त्यांना मिळाला, त्या कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते. आयएमसी, चर्चगेटला झालेला तो कार्यक्रम कव्हर करायला मीच गेलो होतो. तेव्हा दिवाडकरांना भेटून त्यांचं अभिनंदन केलं. तेव्हा तिथे त्यांना जे भेटले त्या सर्वांशी त्यांनी माझीही ओळख करून दिली आणियाने सगळ्यात आधी आमच्या ‘सागर’मध्ये लिहायला सुरुवात केली,” हेही आवर्जून सांगितलं.

 

दै. ‘सागर’चा वेब माध्यमात तितका जम बसला नाही, याची खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवायची. कोकणातून, त्यातही मग रत्नागिरी जिल्ह्यातून कोणत्या देशांत किती लोक स्थायिक झालेत, त्यांना आपल्या जिल्ह्यातल्या बातम्या हव्या असतात, त्यांचे मला फोन येत राहतात, मग मी वेबसाईटसाठी कसे आणि कोणते प्रयत्न चालवले आहेत, याबाबत ते दर भेटीत बोलत. तुमचं ‘महाएमटीबी’चं छान चाललंय, मी नियमितपणे वाचतो, हेही ते सांगत. माझ्या त्रिपुरा निवडणुकीवरच्या लेखासह आणखी काही लेख त्यांनी ‘सागर’मध्ये छापलेही होते. मागे एकदा अशाच गप्पांमध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणात ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना किती पैसे मिळत आहेत, त्यातून त्या त्या गावांत कसा पैसा खेळू लागला आहे, त्यातून गावांच्या अर्थव्यवस्थांवर कसा परिणाम होतो आहे, हे त्यांनी मला अगदी पोलादपूर-खेडपासून ते कणकवली-कुडाळपर्यंत गावांची उदाहरणं देऊन सांगितलं होतं. ही व्यक्ती किती वेगवेगळ्या स्तरांवर आणि आयामांवर विचार करत होती, याचा अंदाज यातून येतो. मी दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक झाल्यापासून अनेकदा नवी भरती करायची असली की उमेदवारांच्या मुलाखती वगैरे घ्याव्या लागतात. जागोजागी उघडलेल्या बीएमएम महाविद्यालयांमधून उत्तीर्ण होऊन लोक मुलाखतीसाठी येतात. परंतु, अनेकांना राज्यसभा-लोकसभा, विधानसभा-विधानपरिषद यातले फरक कळत नाहीत, बातमी कळत नाही, लीड नीट लिहिता येत नाही, हे वास्तव आहे. झटपट काहीतरी उचला आणि वेबवर चढवा, मग ते व्हायरल करा. त्या पॅकेजच्या आतमध्ये काय आहे, हे मात्र बघायचं नाही. अर्थात, आम्ही काही फार थोर महापुरुष नव्हेत पण, योग्यवेळी योग्य मार्गदर्शक लाभले त्यामुळे इतकीही वाईट वेळ आमच्यावर आली नाही इतकंच. म्हणण्याचा मुद्दा हा की, जिथे मुंबईत ही अवस्था तर चिपळूण-रत्नागिरीसारख्या ग्रामीण भागात काय स्थिती असेल, याचा विचार न केलेला बरा. अशा सगळ्या परिस्थितीत नाना जोशी, दिवाडकरांनी ‘सागर’सारखं दैनिक यशस्वीपणे चालवून दाखवलं.

 

गेल्या महिन्यात लोकसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चिपळूणात आमच्या डी. बी. जे. महाविद्यालयात कार्यक्रम झाला होता. त्याच्या बातमीसंदर्भात दिवाडकर सरांना फोन केला तर तो त्यांनी न उचलता त्यांच्या नातेवाईकांनी उचलला. सर आजारी असून कोकिलाबेन रूग्णालयात उपचार घेत असल्याचं समजलं. त्यानंतर थेट त्यांच्या निधनाचीच बातमी समजली. आता ‘सागर’च्या कार्यालयात पुस्तकांच्या ढिगासमोर, असंख्य कात्रणं, जुने अंक वगैरे समोर घेऊन, तो दोरीचा चष्मा लावून गंभीर चेहऱ्याने काहीतरी लिहित बसलेले दिवाडकर पुन्हा दिसणार नाहीत. खरोखरच, चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्याचं फार मोठं नुकसान झालं. भावपूर्ण श्रद्धांजली...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat