फिर भी दिल है हिंदुस्थानी

    दिनांक  17-Feb-2019   

 


 
 
 
पुलवामा दहशतवादी हल्ल्याविरोधात जगभरातून संताप व्यक्त केला जात असताना रविवारी पाक प्रसारमाध्यमांनी आपला एककल्लीपणा दाखवून दिला आहे. पाकिस्तानातील कराचीमध्ये ‘मामा बेबी केअर’ या शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’ या गाण्यावर नृत्य सादर केल्याचा व्हिडिओ प्रसिद्धीमाध्यमांवर दाखवण्यात आला. अपेक्षेप्रमाणे त्याविरोधात पाकिस्तानात पडसाद उमटू लागले. प्रकरण तापल्यावर या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली.
 

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ बऱ्याचजणांनी शेअर केला. रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी नृत्य करत असलेल्या मंचामागील एलईडी स्क्रीनवर तिरंगा फडकता दिसतो. या प्रकारानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी जाहीर वक्तव्यात म्हटले की, ‘पाकिस्तानातील शैक्षणिक संस्थांतील भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करणारी घटना ही पाकिस्तानचा अपमान मानली जाते. तिथल्या प्रतिष्ठेविरुद्ध मानली जाते. त्यामुळे याची शिक्षा म्हणून संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे.’ पाकिस्तानच्या या कारवाईचा भारतीयांनी मात्र निषेध केला आहेआपल्याकडे पाकिस्तानचा पुळका येणारी नवज्योतसिंग सिद्धूसारखी मनोवृत्ती असलेली जमात अशा गोष्टींवरही पाकिस्तान्यांचीच बाजू स्वीकारेल यात शंका नाही. मात्र, भारतीय संस्कृतीविषयी कुठलाही कार्यक्रम सादर करणे हे पाकिस्तानमध्ये देशविरोधी मानले जाते. याउलट भारतात दहशतवादी हल्ले झाल्यावर पाकिस्तान कशाप्रकारे यातून नामनिराळा आहे, तिथली जनता अजूनही कशी गरीब आहे, सेक्युलर विचार कसे उदात्त आहेत, हे सांगण्यात धन्यता मानतात. भारतात असा कोणताही नियम वा कायदा नाही. त्यामुळेच तोंडाला येईल ते बरळण्याची हिंमत नापाकांना भावंडे मानणाऱ्यांची होते.

 
 

मामा बेबी केअरया शाळेतील शिक्षक आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यासारखी गोष्ट म्हणजे लहानपणापासून मुलांमध्ये कट्टरतावाद्यांसारखे विचारांचे बीज रोवण्यापेक्षा त्यांनी जगभरातील इतर देशांची संस्कृती मुलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे केला होता. मात्र, मुळातच पाकिस्तान्यांची हिंदुस्थान संस्कृतीविरोधातील मनोवृत्ती हे मान्य करायला तयारच नाही. पाकिस्तानातील पूर्वग्रहदूषित प्रसिद्धीमाध्यमांच्या नजरेतून ही बातमी सुटणे शक्यच नव्हते. दहशतवादाला खतपाणी घातल्याने जगभरातून टीका होत असताना अशा बातम्या म्हणजे टीआरपीसाठी मिळालेला आयता मुद्दा होता. शाळेतील कोणालाही विश्वासात न घेता केवळ आणि केवळ ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’ या गाण्याचाच व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. विशेष म्हणजे शाळेने विविध गटातील विद्यार्थ्यांनी विविध देशांतील संस्कृतीचा आढावा घेणाऱ्या गाण्यांवर नृत्य करण्यास सांगितले होते. विद्यार्थ्यांनी सौदी अरब, अमेरिका, भारत आणि अर्थातच स्वत:च्या देशातील गाण्यांवरही नृत्य केले होते. स्थानिक प्रसिद्धीमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या शाळेला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले. यासह मान्यता रद्द करण्याची कारवाईही झाली.

 

भारतातही पाकिस्तानचा गोडवा गाणाऱ्यांची कमी नाही. बेळगावमधल्या सौंदत्ती तालुक्यातील शिवापूरमध्ये शिक्षिकेने ’पाकिस्तान जिंदाबाद’ अशी पोस्ट व्हॉट्सअ‍ॅपवर टाकली.’ पोलिसांनी संबंधित शिक्षिकेला अटकही केली. ग्रामस्थांनी आक्रोश करत तिचे घर जाळण्याचाही प्रयत्न केला. पाकधार्जीणी मनोवृत्ती असलेल्यांचाच जास्त धोका देशाला आहे, अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटू लागली आहे. ज्या देशात आपल्या भारताचे नावही घेणे अप्रतिष्ठीत ठरते, त्यांचा पुळका असणाऱ्यांचे भारतातील नागरिकांनी समर्थन करावे हा कुठला मानवतावाद? दहशतवाद्यांना फाशी देताना सर्वोच्च न्यायालयाची दारे रात्री-अपरात्री उघडणाऱ्या मानवतावादी संघटनांनी यावर चकारही काढल्याचे दिसत नाही. भारताच्या सीमेवर प्राणार्पण करणारी माणसे नाहीत का, त्यांच्या घरच्यांनी त्यांना केवळ सीमेवर मरण्यासाठीच पाठवले का, एकही मानवतावादी संघटना दहशतवादाविरोधात प्रखरतेने लढताना किंवा साधी प्रतिक्रिया देताना का दिसत नाही, हा प्रश्न अनुत्तरीतच...