माँ तुझे सलाम !

    दिनांक  17-Feb-2019   

 

 
 
 
अनिकेत पोटेला यंदाचा ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ देण्यात आला. पुरस्कारवर प्रतिक्रिया देताना, “मला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे माझ्या आईने केलेल्या कष्टाचे चीज आहे,” असे अनिकेत म्हणाला.
 
 

‘आई’सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही,

म्हणून ‘श्री’काराच्या नंतर शिकणे-

, आ ई...

तिच वाढवी, ती सांभाळी,

ती करी सेवा तीन त्रिकाळी,

देवानंतर नमवी मस्तक ‘आई’च्या पायी!

 

आई आपल्या मुलांना खऱ्या अर्थाने घडवते, आईने मनात आणले, तर ती आपल्या मुलाला जगज्जेता बनवू शकते. जिजाऊ मातेच्या शिकवणीमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे थोर राजे महाराष्ट्राला लाभले. त्यांच्या कर्तृत्वातून स्वराज्य उभे राहिले. हे सगळे दाखले इथे देण्याचे कारण म्हणजे खो-खोपटू अनिकेत पोटे. यंदाच्या ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारां’ची यादी जाहीर झाली आणि अनिकेतचा आनंद गगनात मावेनासा झाला. अनिकेत पोटेला यंदाचा ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ देण्यात आला. मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील अनिकेत पोटे हा सामान्य मुलगा. २१ वर्षीय अनिकेतचे राहणीमान सामान्य असले तरी, त्याने केलेली कामगिरी असामान्य आहे. अनिकेतने त्याला मिळालेल्या या पुरस्काराचे श्रेय आपल्या आईला दिले. अनिकेतचे वडील बेस्टमध्ये कर्मचारी आहेत. अनिकेतला दोन सख्खे भाऊ आहेत. वडिलांना घरखर्चाला हातभार म्हणून अनिकेतची आई इतर घरांमध्ये घरकाम करते. अपार कष्ट करून तिने अनिकेतला खेळासाठी प्रोत्साहन दिले.

 

मुंबईतील वांद्रे येथील शासकीय वसाहतीत अनिकेतचे कुटुंब राहते. अनिकेत सध्या रिझवी महाविद्यालयात कला शाखेतील पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे. गेल्या १० वर्षांपासून अनिकेत खो-खो खेळत आहे. पाचवीपासून अनिकेतने आपल्या खो-खोच्या प्रशिक्षणाचा प्रवास सुरू केला. सुरुवातीच्या काळात अनिकेतच्या खेळात सातत्य नव्हते. अनिकेत खो-खो खेळण्यास कंटाळा करायचा. प्रशिक्षक त्याला सरावाला नेण्यासाठी घरी यायचे. एके दिवशी प्रशिक्षकांचा असा ओरडा पडला की, अनिकेत खेळाकडे नीट लक्ष देऊ लागला. इयत्ता आठवीमध्ये शिकत असताना अनिकेत पहिल्यांदा राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. पुढे इयत्ता आठवीमध्ये असताना राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठीत्याची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली होती. अनिकेतने खो-खोच्या १८ वर्षांखालील संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच त्याने खो-खोच्या वरिष्ठ संघाचेही नेतृत्व केले आहे. दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत अनिकेत पोटे हा भारतीय संघांचा कर्णधार होता. खो-खोच्या भारतीय संघाच्या इंग्लंड येथे झालेल्या दौऱ्यात त्याचा समावेश होता. रेल्वे संघाचे प्रतिनिधीत्व करण्याचा त्याचा विचार आहे.

 
 

 
 

मला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे माझ्या आईने केलेल्या कष्टाचे चीज आहे,” असे अनिकेत म्हणतो. पुरस्कारात मिळालेली एक लाख रुपयांची रक्कम आईच्या बँक खात्यात जमा करण्याचे अनिकेतने ठरवले आहे. आजवर मिळालेल्या सर्व बक्षिसांची रक्कम अनिकेत आपल्या आईच्या बँक खात्यात जमा करत आला. मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कम ही कितीही का असेना! पण यापुढेही आईच्या बँक खात्यात बक्षिसाचे पैसे जमा करण्याची आपली ही प्रथा अनिकेत कायम ठेवणार आहे. तसेच कुटुंबीयांनी सांगितल्याखेरीज या रकमेतील एकही रुपया आपण काढणार नाही, असा निर्धार त्याने केला आहे. अडीअडचणीच्या वेळी, गरज पडलीच, तर कुटुंबीयांच्या सहमतीने हे पैसे आपण खर्च करणार असल्याचे अनिकेतने ठरवले आहे. यावरून तो आपल्या कुटुंबाचा, आपल्या आर्थिक परिस्थितीचा, आपल्या दोन भावांचा किती विचार करतो, हे प्रकर्षाने दिसून येते. मनात काहीतरी करून दाखविण्याची जिद्द असेल, तर माणूस कठीणातील कठीण परिस्थितीवरही मात करू शकतो,’ हे अनिकेतने सिद्ध केले आहे. पुरस्कारामुळे मिळालेल्या मानसन्माला, प्रसिद्धीला भुलून न जाता, अनिकेत आपल्या कुटुंबाला प्राधान्य देतो. “आपल्या आईचे कष्टकरी हात आपल्या पाठीमागे होते, म्हणूनच आपण आज इथपर्यंत पोहोचू शकलो,” हे सांगायला तो विसरत नाही. निव्वळ स्वत:पुरता स्वार्थी विचार न करता अनिकेत आपल्या दोन भावांचाही विचार करतो. नाहीतर आजकाल भाऊबंदकीचे चित्र आपल्याला सगळीकडे सर्रास पाहायला मिळते.

 

प्रत्येक मुलाच्या मनाच्या सगळ्यात जवळ असते ती म्हणजे त्याची ‘आई.’ ठेच लागली की तोंडून पहिला आवाज ‘आई गंऽऽ’ असाच येतो. वडिलांनाही न जुमाननारी मुले, काही हवे असेल, तर आईभोवतीच घुटमळतात. एरवी कितीही काही झाले तरी, कोणाला एक शब्दही न सांगणारे मुलगे आपल्या आईजवळच मन मोकळे करतात. आईदेखील मुलाचे कुठे बिनसले आहे, त्याच्या वागण्यात झालेला छोटासा बदलही लगेच ओळखते. पण एक आई आपल्या मुलाचे भविष्य उज्ज्वल करू शकते. त्याला योग्य गोष्टींसाठी प्रोत्साहन देऊन त्याचे आयुष्य नावारुपास आणू शकते. एका यशस्वी पुरुषामागे नेहमीच एका स्त्रीचा हात असतो. मग ती स्त्री म्हणजे त्याची पत्नी, बहीण, मैत्रीणही असू शकते हे मान्य आहे. पण सर्वात आधी त्याच्या शरीरालाच नव्हे, तर त्याच्या मनालादेखील योग्य आकार देण्याचे काम करते ती म्हणजे त्याची आई. हे विसरता कामा नये. क्रीडा क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवणाऱ्या अनिकेत पोटेला आणि त्याला घडविणाऱ्या त्याच्या आईला ‘दै. मुंबई तरुण भारत’चा सलाम!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat