थिएटरमध्ये पुन्हा दुमदुमला 'हाऊझ दि जोश'चा नारा

16 Feb 2019 17:13:39



मुंबई : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्याचा निषेध शनिवारी देशभरासह पूर्ण मुंबईत पाहायला मिळाला. यामध्ये काही ठिकाणी रेलरोको करून तीव्र निषेध दर्शवला, तर काही ठिकाणी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी संप पुकारून निषेध नोंदवला. या हल्ल्याचा विरोध म्हणून देशभरातून पुन्हा एकदा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईकची मागणी होत आहे.

 

शनिवारी सकाळपासून वडाळा, कांदिवली परिसरात हल्याचा निषेध म्हणून रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी संप पुकारला आहे. तसेच, नालासोपारा भागातील नागरिकांनी बंद पाळून व रेलरोको करून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. शनिवारी ११ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या 'उरी-सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटासाठी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. मुंबईतील उपनगरांमध्ये तसेच ठाणे, कल्याण यासारख्या ठिकाणी थिएटर्स बाहेर हाऊसफूल्लचा बोर्ड लावण्यात आला. थिएटर मालकांशी बोलणे केले असता, 'शनिवार, रविवार असल्यामुळे हे दोन दिवस चितपटांना गर्दी पाहायला मिळत आहे. त्यातही इतर चित्रपटांपेक्षा प्रेक्षक उरी सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाला जास्त पसंती देत आहेत.

 

दरम्यान, 'उरी-सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट उरीमधील झालेला हल्ला आणि त्यानंतर भारतने पाकिस्तानमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित आहे. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटींचा आकडा पार केला आहे. अशामध्ये पुलवामा येथे झालेला हल्ला आणि त्याबद्दल लोकांच्या मनात असलेल्या विरोधाची आणि सुडाची तीव्र भावना यामुळे लोकांनी या चित्रपटाला गर्दी केली असल्याचे दिसून येत आहे. या सर्व गोष्टींचा आढावा 'मुंबई तरुण भारत'च्या प्रतिनिधीशी संवाद साधताना प्रेक्षकांनी भावना व्यक्त केल्या.

  

"गुरुवारी पुलवामा येथे हल्ल्या झाल्याचे ऐकून खूप दुःख झाले. गेले २ दिवस भारतामध्ये निषेधाचे वातावरण आहे. आज कांदिवली परिसरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा संप आहे. तरीही, आम्ही उरी सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट पाहण्यासाठी आलो आहोत. पण चित्रपटाचा शो हाऊसफुल्ल असल्यामुळे आम्हाला तिकीट मिळणे मुश्किल होते."

- ललित अरमरकर, प्रेक्षक

 

"लवकर येऊनसुद्धा आम्हाला खालच्या रांगेतील तिकीट घेऊन चित्रपट पाहायला मिळाला. हल्ल्याच्या संतापाचे सावट आम्हाला थिएटरमध्येही पाहायला मिळाले. वेळोवेळी 'हिंदुस्थान झिंदाबाद', 'पाकिस्तान मुर्दाबाद' 'पुन्हा एकदा सर्जिकल झालाच पाहिजे' आणि 'हाऊझ दि जोश हाय सर' अश्या नाऱ्यांनी पूर्ण थिएटर दुमदुमला होता."

- वैभव परब, प्रेक्षक

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0