मुलायमसिंग यांनी मारलेली पाचर...

    दिनांक  15-Feb-2019   मुलायमसिंग यांचे वक्तव्य म्हणजे भाजपला समर्थन, म्हणजे समाजवादी पक्षाचे समर्थन, असा या वक्तव्याचा अर्थ करता येत नाही. उत्तर प्रदेशातील भाजपने तसा केल्यास, त्यांची फसगत होईल आणि ते तोंडघशी पडतील. उत्तर प्रदेशात निवडणूक मैदानात भाजपला समाजवादी पक्षाशीच सामना करावा लागेल. राजकीय डावपेचात या वक्तव्याचा उपयोग समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात दुही कशी निर्माण करता येईल, यासाठी केला पाहिजे.


लोकसभेच्या अखेरच्या दिवशी समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंग यादव यांचे भाषण झाले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, “मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी काम केलेले आहे. मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे गेलो, तेव्हा त्यांनी तात्काळ काम करण्याच्या सूचना दिल्या.” राजकीय परिभाषेत सांगायचे, तर मुलायमसिंग यांनी टाकलेला हा बॉम्बगोळा आहे. संसदीय पद्धतीच्या राजकारणात विरोधी बाकावर बसलेल्याने कधीही सत्ताधारी पक्षाची आणि त्यांच्या नेत्यांची स्तुती करायची नसते. सतत विरोधच करायचा असतो. अटल बिहारी वाजपेयी एकदा म्हणून गेले की, “इंदिरा गांधी दुर्गेचे रूप आहेत.” ही स्तुती अटलजींना फार महागात पडली. नंतर ते सहयोगी पक्षांचे आणि काँग्रेसचेदेखील चांगल्या-वाईट टीकेचे धनी झाले. सतत विरोध करीत राहिल्याने, संसदीय पद्धत म्हणजे सतत भांडणाची पद्धत, असा समज सामान्य जनतेचा झालेला असतो. कोणालाच काही चांगले दिसत नाही. सगळेच राजकीय पक्ष एकसारखे असतात. आलटून पालटून एकच भूमिका सगळे पक्ष वठवित राहतात, असा समज सामान्य लोकांचा झालेला आहे. मुलायमसिंग यादव यांनी राजकीय धोका पत्करून मोदी यांची स्तुती केली, याबद्दल त्यांचे अभिनंदन! स्तुती केल्यामुळे जसे अभिनंदन करावे लागते, तसेच विरोधी बाकावर बसल्यामुळे नेहमी वाकडं तोंडच केले पाहिजे, ही प्रथा त्यांनी मोडली. आशा करुया की, त्यांच्यापासून एक चांगला पायंडा संसदीय राजकारणात पडेल.

 

मुलायमसिंग यांचे विधान लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना झालेले आहे. या विधानाला खूप राजकीय अर्थदेखील आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची युती झाली आहे. लोकसभेच्या जागा त्यांनी आपापसात वाटून घेतल्या आहेत. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकमेकांच्या कट्टर शत्रू आहेत. त्या दोघांत विचारांची समानता नाही, कार्यक्रमांची समानता नाही. समानता फक्त भाजपला रोखण्याची आहे. आपण दोघं एकत्र आलो, तर मतांची विभागणी होणार नाही आणि निवडून येण्याची शक्यता वाढेल, हे त्यांचे निवडणुकांचे गणित आहे. बहुजन समाजवादी पक्षाने मुलायमसिंग यादव यांचा विश्वासघात केला, त्यांचे शासन पाडले. हा इतिहास मुलायमसिंग विसरू शकत नाहीत. मायावती कशा वागतील, हे त्यांनी यापूर्वी कसे वागायचे असते, हे दाखवून दिलेले आहे. भाजपचासुद्धा विश्वासघात करण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. कदाचित मुलायमसिंग यांना वाटत असावे की, आपल्या अनुयायांनी मायावतींच्या मागे जाऊ नये. तसा संदेश देण्यासाठी त्यांनी नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत, असे लोकसभेत म्हटले असावे. याच मुलायमसिंग यादव यांनी २००४ साली सोनिया गांधी जेव्हा पंतप्रधानपदासाठी २७२ खासदारांचा पाठिंबा आहे, असे पत्र घेऊन राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भेटायला गेल्या होत्या, तेव्हा मुलायमसिंग यादव यांनी ‘आमचा सोनिया गांधी यांना पाठिंबा नाही’ असे जाहीर केले. त्यामुळे सोनिया गांधींचे स्वप्न भंगले. लोकसभेत ‘मोदीच पंतप्रधान व्हावेत’ असे जेव्हा मुलायमसिंग म्हणाले, तेव्हा सोनिया गांधीच त्यांच्या बाजूला बसलेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघण्यासारखे आहेत. युट्यूबवर आपण ते बघू शकतो. कुशल राजकारणी तो असतो, जो बोलतो एक, त्याचे अर्थ वेगवेगळे, ज्याला उद्देशून तो बोलतो त्यासाठी ते कधी असतेही, तर कधी नसतेही. त्याला न बोलता, कोणाचे नाव न घेता, एक संदेश द्यायचा असतो. मुलायमसिंग यादव यांना शेजारी बसलेल्या सोनिया गांधींना संदेश द्यायचा आहे की, आम्हाला गांधी घराण्याचे राज्य आता नको. त्यापेक्षा मोदी चालतील. रिमोट कंट्रोलने चालणारी तुमची सत्ता आता नको. कळसूत्री पंतप्रधान तर नकोच, पण ज्याला सत्तेचा काही अनुभव नाही, अशा तुमच्या पुत्राची सत्तादेखील नको. न बोलता मुलायमसिंग यादव एवढे बोलून गेलेले आहेत. ते उत्तर प्रदेशच्या राजकारणातील वयोवृद्ध आणि अनुभवी राजकारणी आहेत. राजकारणी माणसाला एक ज्ञान जरुर असते, ते म्हणजे कुठे, केव्हा आणि काय बोलावे, हे त्यांना उत्तम समजते. मुलायमसिंग यादव यांच्या वक्तव्याने ममतांच्या मोटेमध्ये मोठी पाचर मारली आहे. म्हणून ममतादीदी खवळल्या. त्या म्हणाल्या, “इस मामले को छोडिए, मुलायम सिंह बूढे हो गए हैं और मैं उनकी उम्र की इज्जत करती हूँ, उन्हे छोड दीजिए।” मुलायमसिंग यादव यांना ‘बूढे’ म्हणणारी ममता ६४ वर्षांची ‘तरुण’ आहे. म्हणून त्यांचे राजकारण ‘म्हातारचळ’ लागल्याचे राजकारण असते, असेच वक्तव्य राबडी देवी यांनी केले आहे. त्या म्हणतात, “मुलायम की उम्र हो गई, उन्हें याद नहीं रहता क्या बोल रहे हैं।” त्या मानाने राबडी देवी ममतांपेक्षा तरुण आहेत. कारण, त्यांचे वय फक्त ६० आहे.

 

मुलायमसिंग यादव यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे मत आले नसते, तर आश्चर्य वाटायला पाहिजे होते. प्रमोद तिवारी म्हणतात, “मुलायमसिंग यादव यांच्या वक्तव्याचा फायदा भाजपला होणार नसून तो काँग्रेसलाच होईल. मुलायम यांच्या सांगण्यावरून भाजपला कोणी मते देणार नाहीत, उलट समाजवादी पक्षाची जी मते असतील, त्यात मानसिक गोंधळ होईल. ते विचार करतील की पक्षाचा संस्थापक मोदींची स्तुती करतो आहे, म्हणून मते काँग्रेसला दिली पाहिजेत.” राजकारणी माणूस कसा तर्क लावतो, याचे हे एक चांगले उदाहरण आहे. ते वक्तव्य वाचल्यानंतर मला पंचतंत्रातील एक गोष्ट आठवली. एक कोल्हा एका बैलाच्या मागे सतत फिरत होता. बैलाच्या मानेखाली बाशिंड असते, ते आज ना उद्या पडेल आणि माझे पोट भरेल असे कोल्ह्याला वाटते. त्याला वाटल्यामुळे बैलाच्या मानेखालचे मांस कधी पडत नाही. आणि कोल्ह्यावर उपाशी राहण्याची पाळी येते. प्रमोद तिवारी यांनी कोल्ह्याची भूमिका घेतलेली आहे. अपेक्षेप्रमाणे भाजपने मुलायमसिंग यादव यांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे. लखनऊमध्ये तसे पोस्टर्स लागले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “मुलायम सिंह के मुँह से सच सामने आ गया।” मुलायमसिंग यांचे वक्तव्य म्हणजे भाजपला समर्थन, म्हणजे समाजवादी पक्षाचे समर्थन, असा या वक्तव्याचा अर्थ करता येत नाही. उत्तर प्रदेशातील भाजपने तसा केल्यास, त्यांची फसगत होईल आणि ते तोंडघशी पडतील. उत्तर प्रदेशात निवडणूक मैदानात भाजपला समाजवादी पक्षाशीच सामना करावा लागेल. राजकीय डावपेचात या वक्तव्याचा उपयोग समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात दुही कशी निर्माण करता येईल, यासाठी केला पाहिजे. त्याला राजकीय कौशल्य लागते. उत्तर प्रदेशातील राजकीय नेते ते कौशल्य दाखवतील असे आपण मानूया.

 

मोदी यांच्या विरोधात वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळे पक्ष एकत्र येण्याची रणनीती आखत आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकांच्या मतांची टक्केवारी लक्षात घेतली, तर केंद्रात सत्तेवर असलेला भाजप ४० टक्क्यांहून अधिक मते मिळवून आलेला आहे. ६०-६५ टक्के मते ही वेगवेगळ्या पक्षांत विभागली जातात. या वेगवेगळ्या पक्षांचे कडबोळे भाजपला हरवू शकेल का? याचे निर्णायक उत्तर आता देता येणार नाही. त्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. समजा, भाजपविरोधी पक्षांना भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर पहिला प्रश्न निर्माण होईल की पंतप्रधान कोण होणार? ममता, मायावती, चंद्राबाबू, की शरद पवार? मुलायमसिंग यांनी त्याचे उत्तर देऊन टाकलेले आहे की, असले कडबोळे सरकार नको. बहुमताने एक पक्ष यावा आणि मोदी देशाचे पंतप्रधान असावेत. कडबोळे सरकार काही कामाचे नसते. ते विकास करू शकत नाही आणि देशाचे संरक्षणदेखील करू शकत नाही. या गोष्टी न बोलता मुलायमसिंग सांगून गेलेले आहेत. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ केवळ उत्तर प्रदेशपुरता मर्यादित करून चालणार नाही. त्यांनी एका अर्थाने ममता बॅनर्जी यांच्या महागठबंधनाला दिलेला हा संदेश आहे. त्या महागठबंधनाला मारलेली ही मोठी पाचर आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/