मी ख्रिश्चन-हिंदू!

    दिनांक  15-Feb-2019   एक भारतीय आहे. त्यामुळे हो, मी एक ख्रिश्चन-हिंदू आहे.’ असं बेधडकपणे सांगणाऱ्या फ्रान्सिस डिसुझा यांचं गुरूवारी निधन झालं. नगरसेवक ते गोव्याचे उपमुख्यमंत्री अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असलेले फ्रान्सिस डिसुझा हे भाजपचे गोव्यातील पहिले अल्पसंख्याक आमदार होत. म्हापशासारख्या हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्मीयांची जवळपास समसमान लोकसंख्या असलेल्या भागातून डिसुझा सातत्याने निवडून आले आणि तेही भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाकडून! गोवा भाजपचा चेहरा अर्थात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं मूळ गाव ज्या बार्देश तालुक्यात, त्या बार्देशमधील म्हापशासारख्या गोव्यातील महत्वाच्या शहरातून निवडून येणारे डिसुझा यांच्या निधनामुळे गोवा भाजपमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असं निश्चितच म्हणता येईल. नगरसेवक, नगराध्यक्ष ते आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री अशी साधारण चाळीसेक वर्षांची कारकीर्द फ्रान्सिस डिसुझा यांनी घडवली. गोव्याच्या राजकारणात एक सर्वसमावेशक आणि खऱ्या अर्थाने ‘सेक्युलर’ चेहरा म्हणून डिसुझा यांची ओळख होती. गोवा पीपल्स काँग्रेस पार्टीसारख्या अगदीच छोट्या प्रादेशिक पक्षातून कारकिर्दीची सुरूवात करणारे डिसुझा साधारण वीसेक वर्षांपूर्वी भाजपमध्ये आले आणि त्यानंतर पक्षाशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले. डिसुझा हे पेशाने वकील. ते भाजपमध्ये आले तेव्हा मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, राजेंद्र आर्लेकर अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली गोवा भाजप नुकताच कुठे पाळेमुळे घट्ट करू लागला होता. ख्रिश्चन मतदारांमध्ये भाजपचा तसा काहीच प्रभाव नव्हता. अशावेळी डिसुझा यांनी भाजपमध्ये आपली वाटचाल सुरू केली. त्यानंतर सलग चारवेळा ते म्हापशातून भाजपचे आमदार झाले. स्थानिक कार्यकर्ते त्यांना ‘बाबुश’ म्हणत. सन २००० नंतर गोव्यातील राजकीय पटलावर मनोहर पर्रीकर यांच्यारूपाने एक दमदार, आश्वासक चेहरा उभा राहिला. विकासाभिमुख राजकारणावर भर देत पर्रीकरांनी गोव्यातील युवक-युवतींच्या मनात स्थान मिळवलं आणि २०१२ च्या निवडणुकीत हिंदू मतदारांसह ख्रिश्चन मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने व्यापक अभियान राबवलं. पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आणि प्रथमच मोठ्या संख्येने गोव्यात भाजपचे ख्रिश्चन आमदार निवडून आले. या सर्व प्रवासात पर्रीकर यांना ज्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची मोलाची साथ लाभली, त्यात डिसुझा यांचा समावेश अग्रक्रमाने होतो.

 

आमचो बाबुश...

 

गोव्यासारख्या अत्यंत छोट्या राज्याचे राजकारण हे कायमच अस्थिर राहिलं आहे. गोव्यात आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुका आणि शपथ घेतलेल्या मुख्यमंत्र्यांची यादी काढली तर हे सहज लक्षात येतं. सलग पाच वर्षं मुख्यमंत्रीपद फारच अभावाने कुणाला मिळालं असेल. अशात मनोहर पर्रीकर यांच्यासारख्या राष्ट्रीय स्तरावर ‘फॅन क्लब’ नेत्याला गोव्यातही अफाट लोकप्रियता लाभली. विशेषतः गोव्यातील युवक-युवती आणि महिला यांच्यात पर्रीकरांची क्रेझ गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून आहे जी आज त्यांच्या आजारपणातही कमी झालेली नाही. पर्रीकरांची ही लोकप्रियता गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या लोकप्रियतेशी तुलना होऊ शकेल, एवढी असल्याचं मत गोव्यातील राजकीय अभ्यासक व्यक्त करतात. या जोरावर पर्रीकरांनी भाजपला आणि गोव्यालाही एक स्थिर नेतृत्व दिलं. हे काही एका रात्रीत झालं नाही, त्यामागे पर्रीकरांसह डिसुझा यांच्यासारख्या असंख्य नेते-कार्यकर्त्यांनी वीसेक वर्षं उपसलेले कष्ट होते. गोव्याची बाहेर असलेली प्रतिमा आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यामध्ये मोठं अंतर आहे. गोव्यात २७-२८ टक्के असलेला ख्रिश्चन समाज हा बहुतेककरून धार्मिक पगड्याखाली, चर्चच्या प्रभावाखाली आहे. इतका की अनेकदा मतदानावेळी मतदान कुणाला करायचं, याचे ‘आदेश’ही चर्चमधून निघतात. अशा कॅथलिक समाजातून असूनही सर्वधर्मसमावेशक आणि राष्ट्रवादी भूमिका घेणारे फ्रान्सिस डिसुझा निर्माण झाले. भारत हे हिंदुराष्ट्र आहे आणि त्यामुळे मी एक ख्रिश्चन हिंदू आहे, हे त्यांनी निर्धास्तपणे सांगितलं. गोव्यात त्याचे तितके पडसाद उमटले नाहीत तितके गोव्याबाहेर उमटले. डीसुझांनी त्याची कधी पर्वा केली नाही. त्यामुळे हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही समाजांतून त्यांना ‘आमचो बाबुश’ म्हणून प्रेम मिळालं. अखेरच्या काळात त्यांचे पक्षाशी काही मतभेद झाले खरे परंतु म्हणून मी काही पक्ष सोडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. गोव्यासारख्या आयाराम-गयारामांचा मोठा इतिहास असलेल्या राज्यात असं उदाहरण अभावानेच सापडेल. गोव्यासारख्या अस्थिर राज्यात भाजपच्या या दोन-तीन नेत्यांमुळे राजकीय स्थिरता मिळू शकली. पर्रीकर केंद्रात गेले आणि त्यानंतर अलीकडे आजारी पडले तेव्हा या अस्थिरतेचे ढग गोव्याने पुन्हा एकदा अनुभवले. आज पर्रीकर आजारी असले तरी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आधारावर आजही झुंज देत आहेत. अशात जर डिसुझा यांच्यासारख्या जुन्या साथीदाराची साथ त्यांना लाभली असती, तर परिस्थिती सुधारण्यास कदाचित आणखी मदत होऊ शकली असती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/