भुकेल्या जीवांची अन्नदाता

    दिनांक  14-Feb-2019   

 

 
 
 
 
हॉटेल्समध्ये शिल्लक राहिलेल्या अन्नातून दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असणाऱ्यांसाठी काम करणाऱ्या आरुशी बत्रा यांची ही गोष्ट...
 

यंदाचा व्हॅलेंटाईनही अगदी रोजच्यासारखाच गुलाबी साजरा झाला असेल, अनेक प्रेमीयुगुलांनी आपापल्या परीने ठरवून प्रेमाची कबुलीही दिली असेल. महागड्या हॉटेल्समध्ये जाऊन जेवण आणि पार्टी झाल्यानंतर अनेकजण पुढल्या दिवसासाठी कामाला लागले असतील. मात्र, दुसरीकडे त्याच हॉटेल्समध्ये शिल्लक राहिलेल्या अन्नातून दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असणाऱ्यांसाठी काम करणाऱ्या आरुशी बत्रा आज हजारो, लाखो मुलांना तृप्त करून अन्नदात्या बनल्या आहेत.

 

एका डॉक्टराच्या डोळ्यातही अश्रू आले, ज्यावेळी एका भुकेलेल्या चिमुकल्याने त्यांना विचारले, “डॉक्टर, अशी कोणती गोळी आहे का, जी खाल्ल्यावर मला भूकच लागणार नाही...” मन हेलावून टाकणारी ही पोस्ट सोशल मीडियावर बऱ्याचदा शेअर झाली. आपणही लाईक किंवा फारतर शेअर करून मोकळे होतो. मात्र, त्याचवेळी हॉटेल्समधल्या पार्टीत बऱ्याचदा जास्त झालेलं अन्न वाया घालवणाऱ्या व्यक्तीही आपण पाहिल्याच असतील. जेवणाचे पैसे भरले की आपण वाया घालवलं तरीही काही फरक पडत नाही, अशा मानसिकतेतल्या लोकांच्या डोळ्यात आपल्या कार्याद्वारे अंजन घालणारी महिला म्हणजे आरुशी बत्रा. भारतासारख्या देशात आजही दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्यांचे आणि भूकबळींचे प्रमाण जास्त आहे, अशा भुकेलेल्या जीवांच्या पोटात दोन घास जावेत यासाठी काम करणाऱ्या ‘रॉबीनहूड आर्मी’ या संस्थेच्या सहसंस्थापक असलेल्या आरुशी बत्रा यांचा सामाजिक कार्यातील हातभार प्रेरणादायी आहे. भारतीय औद्योगिक संस्था ‘ठाणे मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’चे अध्यक्ष भालचंद्रसिंह रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्यारावराणा केशवराव सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यातील कार्यक्रमात आरूशी बत्रा यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

 

हॉटेल्समध्ये होणारे लग्नसोहळे, पार्ट्या, स्नेहमिलनाचे कार्यक्रम आदींमध्ये शिल्लक राहणारे अन्न भुकलेल्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही संस्था करते. ‘रॉबीनहूड आर्मी’ ही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर सुरू असलेली ना नफा तत्त्वावरील एक सामाजिक संस्था आहे. ऑगस्ट २०१४ मध्ये आरुशी बत्रा आणि सहकाऱ्यांच्या मदतीने सुरू झालेल्या संस्थेच्या रोपाचा आज वटवृक्ष जगभरातील भुकेलेल्यांना सावली देण्याचे काम करत आहे.

 

कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात महत्त्वाची असते मग, त्याला हातभार लावणारे हजारो हात आपोआप पुढे येत असतात. रॉबीनहूड आर्मीची सुरुवात करताना आरुशी यांनी केवळ सात जणांना सोबत घेऊन हे काम सुरू केले होते. एका कार्यालयातील पार्टीनंतर उरलेल्या अन्नाची मदत घेत त्यांनी १५० जणांची भूक भागवली होती. त्यानंतर सुरू झालेल्या या मिशनला जगभरातून पाठिंबा मिळू लागला. आज जगभरातील ६० देशांमध्ये रॉबीनहूड आर्मी काम करते. श्रीलंका, पाकिस्तान, फिलिपिन्स, कॅनडा, युगांडा, केनिया आदी देशात या संस्थेचा विस्तार करण्यात रॉबीनहूड आर्मीला यश मिळाले आहे. जगभरातून ४० हजार स्वयंसेवक (रॉबीन्स) त्यांच्या या कार्यात सहभागी झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी लोकसहभाग करून घेण्यामागचे रहस्यही तितकेच प्रेरणादायी आहे. आम्हाला पैशांच्या रुपातली मदत नको, आम्हाला केवळ तुमचा वेळ द्या. आमच्या कार्याला हातभार लावण्यासाठी मदत करा, अशी भूमिका बत्रा आणि त्यांच्या टीमने घेतली आणि आत्तापर्यंत या कार्याद्वारे जगभरात ५० लाखांहून अधिक भुकेलेल्यांना तृप्त करण्यात यशस्वी झाल्या आहेत. रॉबीनहूड आर्मी ही शून्य देणगी स्वरूपात चालते. मदत करण्यासाठी तुम्हाला स्वत:ला त्यात सहभागी व्हावे लागते. याच तत्त्वावर सुरू असलेल्या समाजकार्याचा प्रचार आरुशी करतात.

 

गोव्याला एका रेस्टॉरंटमध्ये जेवत असताना आरुशी यांना त्यांच्या मित्राचा फोन आला होता. परदेशात सुरू असलेली ही संकल्पना आपण भारतात राबवू शकलो,तर नक्कीच याचा फायदा इथल्या गरजूंना होईल, असे त्याने सांगितले. भूकबळी, कुपोषण आदी समस्या असणाऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. त्या क्षणाला त्यांनी हातातला घास खाली ठेवत होकार दर्शवला. अर्थशास्त्रातून पदवीधारक असलेल्या आरुशी यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून राज्यशास्त्र आणि सिंगापूर येथून इंटरनॅशनल मॅनेजमेंट एनयुएस बिझनेस स्कूलमधून वयाच्या २३ व्या वर्षी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. जिथे पुरुष प्रधान संस्कृती आजही मानली जाते, अशा वडिलोपार्जित व्यवसायाला यशस्वीरित्या सांभाळण्याचे काम आरुशी यांनी केले आहे.

 

भारतात आणि भारताबाहेर फिरण्याची त्यांना असलेली आवड हासुद्धा रॉबीनहूड आर्मीच्या यशस्वी वाटचालीचे गमक आहे. त्यांच्या मते सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम मानतात. मोकळ्या वेळात लिखाण करण्याची आवड त्या जोपासतात. त्यांचा लाईफस्टाईल ब्लॉग प्रसिद्ध आहेत. याशिवाय कादंबऱ्यांचे लिखाणही त्या करतात. व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन करत त्यांनी या कार्याला हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले. रॉबीनहूड आर्मी या जागतिकस्तरावरील स्वयंसेवी संस्थेच्या सोशल मीडिया हाताळण्याचे काम त्या करतात. आपल्या कार्याचा कसलाही गौरव न बाळगता नम्रपणे त्या सांगताना दिसतात. आम्ही फक्त जगातील एक टक्का भुकेलेल्यांपर्यंत पोहोचलो क्रांती घडवण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवीय...