नालासोपाऱ्याच्या समुद्रात डॉल्फिन, बीचवर पर्यटकांची गर्दी

    दिनांक  13-Feb-2019

 

 
 
 
 
नालासोपारा : नालासोपाऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या राजोडीच्या समुद्रात डॉल्फिन दिसल्याचे वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून या समुद्रात नियमितपणे डॉल्फिन दिसत असल्यामुळे राजोडी येथील समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात राजोडी योथील समुद्रात पहिल्यांदा डॉल्फिन दिसले होते.
 

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार राजोडी येथील समुद्रात गेल्या आठवड्यात सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास तीन ते चार डॉल्फिन मासे दिसल्याचे तेथील स्थानिकांना सांगितले. राजोडी किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्सची सुविधा उपलब्ध आहे. ब्लू लाईफ अॅडव्हेंचर्स असे या वॉटर स्पोर्ट्सचे नाव आहे. गेल्या आठवड्यात येथील समुद्रात डॉल्फिन दिसल्यापासून ब्लू लाईफ अॅडव्हेंचर्सने येथे डॉल्फिन राईड सुरु केली आहे. गेल्या संपूर्ण आठवडाभर या समुद्रात डॉल्फिन दिसल्याचे स्थानिकांनी सांगितले. तसेच आम्हाला या समुद्रात खोल गेल्यावर नेहमीच डॉल्फिन मासे दिसतात. परंतु किनाऱ्याजवळ डॉल्फिन मासे आढळणे, ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे.

 

राजोडीच्या समुद्रात डॉल्फिन मासे दिसल्याची बातमी पसरल्याबरोबर हे डॉल्फिन मासे पाहण्यासाठी संपूर्ण वसईतून लोक राजोडी येथील समुद्रकिनाऱ्यावर गर्दी करत आहेत. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास या समुद्रात डॉल्फिन मासे दिसतात. अशी माहिती राजोडी येथील स्थानिकांनी दिली. गेल्या महिन्यात ससून डॉक आणि वांद्रे-वरळी सी-लिंकजवळील समुद्रात हम्पबॅक प्रजातीचे डॉल्फिन मासे दिसले होते.