‘संगमी श्रोतेजन नाहती...’

    दिनांक  12-Feb-2019   


 
 
 
महाराष्ट्राचं सांस्कृतिक पालनपोषण घडवण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या पुलं-गदिमा-बाबुजी या तिघांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर वाईसारख्या गावात होतो, यासाठी ‘त्रिवेणी साहित्य संगमा’चे आयोजक असणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं अभिनंदन करणं गरजेचं ठरतं. परिसंवाद, चर्चासत्रे, साहित्याची अभिवाचनं, काव्यमैफिली, गायनमैफिली, मुलाखती आदींच्या माध्यमातून या त्रयींचं कार्यकर्तृत्व उलगडणारा हा साहित्यसंगम वाईकर रसिकांसाठी एक पर्वणी ठरला नसता तरच नवल.
 

सात स्वरांच्या स्वर्गामधुनी

नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी

यज्ञ-मंडपी आल्या उतरूनी,

संगमी श्रोतेजन नाहती...

 

. दि. माडगुळकरांनी रचलेल्या आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘गीतरामायण’ या अजरामर कलाविष्कारातील ‘स्वयें श्रीराम प्रभु ऐकती’ या गीतातील या ओळी. कुश आणि लव आपल्या पित्याचे चरित्र सांगत आहेत आणि त्यामुळे स्वत: श्रीरामांसह सारा सभामंडप भावूक झाला आहे, हा दृश्यपट गदिमांच्या या ओळींतून साक्षात आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. महाराष्ट्राची तीन लाडकी व्यक्तिमत्त्वं म्हणजे अर्थातच, गदिमा, बाबुजी आणि पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतींना उजाळा देणारा ‘त्रिवेणी साहित्य संगम’ नुकताच कृष्णेकाठी वसलेल्या वाई गावात संपन्न झाला. साहित्य, कला, संगीत, नाटक, चित्रपट अशा सर्वच क्षेत्रात माईलस्टोन मानल्या गेलेल्या या त्रयींच्या ‘प्रतिभेच्या आम्रवना’त वाईकर श्रोतेजन रामाच्या त्या सभामंडपातील उपस्थितांप्रमाणेच नाहून निघाल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं.

 

आठवणी जागवणं, त्या स्मरणरंजनात रमणं आणि त्यांचे उत्सव साजरे करणं एवढ्यापुरता या कार्यक्रमाचा मर्यादित विचार करता येणार नाही. ‘त्रिवेणी साहित्य संगमा’च्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी या कार्यक्रमाच्या समारोप सत्रात जे सांगितलं, ते याकरिता फार महत्त्वाचं आहे. अरुणाताई म्हणतात, “हा कार्यक्रम केवळ आठवणींचा नाही. वर्तमानकाळात आपण काय गमावलं आहे आणि ते गमावलेलं आपल्याला परत कसं आणता येईल, यावर विचारमंथन करण्याचा आहे.” मुंबई-पुणे-नाशिक या त्रिकोणाबाहेर जाऊन गदिमा-बाबुजी-पुलं या त्रिकोणाचा महोत्सव शासनस्तरावरून होणं, हे याचसाठी महत्त्वाचं ठरतं. महाराष्ट्राचा आर्थिक विकास जसा कित्येक वर्षं मुंबई-पुणे-नाशिक पट्ट्यापुरता मर्यादित राहिला, तसाच सांस्कृतिक विकासही राहिला. याचा अर्थ उर्वरित महाराष्ट्रात काहीच घडत नव्हतं किंवा नाही असा मुळीच नाही. उलट कित्येक प्रतिभाशाली, दिग्गज साहित्यिक, गायक, संगीतकार, अभिनेते इ. हे बहुतेक करून मुंबई-पुणे-नाशिक या पट्ट्याच्या पलीकडील उर्वरित महाराष्ट्रात जन्मले आणि घडले आहेत. अलीकडच्या काळात या कलावंतांच्या कलाविष्काराला मिळणाऱ्या व्यासपीठांचं केंद्रीकरण मुंबई-पुण्यात झालं आणि त्यामुळे इथेच काय ते सांस्कृतिक उपक्रम चालतात आणि बाकीकडे कसा अंध:कार आहे, असं चित्र उभं राहिलं. कोल्हापूर, सांगली-मिरज, कराड, औरंगाबाद, पैठण, धुळे, सोलापूर इ. असंख्य छोटी शहरं किंवा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांसारख्या कोकणपट्ट्यात साहित्य-कला क्षेत्रातील रसिकांची संख्या प्रचंड आहे. फक्त ती संख्या विखुरलेली आहे आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी आर्थिक व अन्य बाबी सहजपणे उपलब्ध करून देणारी व्यवस्था तिथे सक्षमपणे उभी राहिलेली नाही. आजही येथे सांस्कृतिक क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या संस्था कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातील वाईचं नाव या यादीत अग्रक्रमाने घेता येईल.

 

समाज आणि व्यक्तीचा विकास हा केवळ त्याच्या आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणामुळे होत नसतो. त्याला सांस्कृतिक पालनपोषणाचीही जोड असावी लागते. त्यासाठी कला आणि त्या कलेचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करणाऱ्या व्यवस्था उभाराव्या लागतात. या व्यवस्था नसल्या किंवा अशक्त असल्या, तर मग छोट्या शहरांत अशी छोटीछोटी ‘पॉकेट्स’ निर्माण होतात आणि तेथील साहित्य-कलाविश्व केवळ ‘हौशी’ म्हणवून घेण्यापुरतं मर्यादित राहतं. महाराष्ट्राचं सांस्कृतिक पालनपोषण घडवण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या पुलं-गदिमा-बाबुजी या तिघांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर वाईसारख्या गावात होतो, यासाठी ‘त्रिवेणी साहित्य संगमाचे आयोजक असणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं अभिनंदन करणं गरजेचं ठरतं. परिसंवाद, चर्चासत्रे, साहित्याची अभिवाचनं, काव्यमैफिली, गायनमैफिली, मुलाखती आदींच्या माध्यमातून या त्रयींचं कार्यकर्तृत्व उलगडणारा हा साहित्यसंगम वाईकर रसिकांसाठी एक पर्वणी ठरला नसता तरच नवल. त्यात पुन्हा राज्य शासनाच्या बॅनरखाली महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडून आयोजित म्हणजे एका अर्थाने शासकीय कार्यक्रम हा इतका कल्पक, देखणा आणि नियोजनबद्ध असू शकतो, याचाही प्रत्यय यानिमित्ताने वाईकरांना आणि कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलावंत-साहित्यिकांनाही आला. त्यात पुन्हा वाईची निवड, हादेखील संपूर्ण दोन दिवसीय कार्यक्रमात चर्चेचा विषय ठरला. ‘संथ वाहते कृष्णामाई’ हे प्रसिद्ध चित्रपटगीत गदिमांनी लिहिलं आणि बाबुजींनी गायलं. या कृष्णामाईच्या तीरावर वसलेलं ऐतिहासिक शहर वाई. ‘दक्षिण काशी’ अशीही ओळख असलेले वाई ऐतिहासिक आणि धार्मिक क्षेत्र तर आहेच, शिवाय मराठी विश्वकोश मंडळाचे कार्यालय, प्राज्ञपाठशाळा आदींसह येथील अनेक संस्था आणि व्यक्तींनी सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचं वास्तव्य लाभलेली ही भूमी आहे. इथे चांगली गाणी ऐकणारा, पुस्तकं वाचणारा आणि वक्त्यांना दाद देणारा रसिकवर्ग आहे. त्यामुळे ‘त्रिवेणी साहित्य संगमा’साठी वाईची निवड ही सर्वार्थाने योग्य ठरली.

 

अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणं, हे काही विश्वकोश निर्मिती मंडळाचं काम नाही. त्यामुळे मंडळाला व तेथील कार्यकर्त्यांना याची सवयही नाही. त्यात वाईसारख्या ठिकाणी सभामंडप, प्रकाश-ध्वनी, निवास-भोजन, प्रवास, येणाऱ्या मान्यवर पाहुण्यांशी समन्वय-संपर्क, वेळेचं नियोजन या आणि अशा असंख्य गोष्टी सलग दोन दिवस करणं म्हणजे शिवधनुष्यच. गेले दोन महिने विश्वकोश मंडळाची सारी टीम यासाठी मेहनत घेत होती, याचा उल्लेख मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी कार्यक्रमात केला होता. कार्यक्रम ज्याप्रकारे पार पडला, ते पाहता या टीमने हे शिवधनुष्य पेललं, असं निश्चितच म्हणता येईल. ९२ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, साहित्यिक विनया बापट, मंगला गोडबोले, दिनकर गांगल, अभिनेते राहुल सोलापूरकर, गिरीश ओक, योगेश सोमण, निवेदक सुधीर गाडगीळ, चित्रपट समीक्षक गणेश मतकरी, अभिनेत्री फैय्याज शेख, कवी अरुण म्हात्रे, अशोक नायगावकर, माजी सनदी अधिकारी व लेखक अविनाश धर्माधिकारी, गदिमांचे पुत्र आनंद माडगुळकर, कुमार माडगुळकर, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आदी सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी यानिमित्ताने एका व्यासपीठावर आली. या सर्वांनी या त्रिवेणी संगमाच्या विविध सत्रांत आपला सहभाग नोंदवला आणि वाईच्या थंडीतील मुक्कामाचाही आनंद घेतला. वाईकर रसिकांनीही या प्रत्येक सत्राला भरभरून प्रतिसाद दिला. विशेषत: शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती.

 

अशा सांस्कृतिक कार्यक्रमांतून साध्य काय होतं, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. सदर लेखात वर उल्लेखलेले परिणाम हे तर तात्कालिक परिणाम आहेत. परंतु, कार्यक्रम सकस, दर्जेदार आणि प्रामाणिक हेतूने केलेला असेल, तर त्याचे दीर्घकालीन परिणामही होत असतात. “नवीन पिढीला गदिमा, पुलं आणि बाबुजी या त्रयींचा वारसा मिळण्याच्या दृष्टीने या संमेलनाची भूमिका महत्त्वाची ठरेल,” असं मत दिलीप करंबेळकर यांनी समारोप सत्रात व्यक्त केलं. चर्चासत्र, परिसंवाद, अभिवाचन वरकरणी कंटाळवाण्या समजल्या जाणाऱ्या कार्यक्रमांतही लक्षणीयरित्या उपस्थित राहिलेला विद्यार्थीवर्ग पाहता हा वारसा पुढे नेता येऊ शकतो, असं निश्चितच म्हणता येईल. साहित्य वाचावंसं वाटणं, नाट्यउतारे वा काव्य ऐकावंसं वाटणं, पुलं वा गदिमा किंवा अन्य कोणाचे ३०-४० वर्षांपूर्वीचे किस्से ऐकताना रमणं हे १५-१६ वर्षांच्या विद्यार्थ्यांकडून होणं तसं दुर्मीळच. वाईत ते होतं आहे, ही बाब सुखावणारी आहे. हे औत्सुक्य, कुतूहल उद्याची प्रतिभा बनावी, यासाठी शासन आणि विश्वकोश मंडळासारख्या संस्थांनी पावलं उचलणं गरजेचं आहे. सुदैवाने गेल्या तीन-चार वर्षांत या क्षेत्रात शासनस्तरावरून होत असलेले उपक्रम हे कल्पक आणि शासकीय कार्यक्रमांच्या ठराविक साच्यापेक्षा वेगळे होताना दिसत आहेत. यात ‘पुस्तकांचं गाव’, ‘वाचक प्रेरणा दिन’ यासारख्या अनेक उपक्रमांचा उल्लेख करता येईल. ‘त्रिवेणी साहित्य संगम’ हे या मालिकेतील आणखी एक पुष्प ठरले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावरच कित्येक मान्यवरांनी ‘शासकीय कार्यक्रम इतका कल्पक असू शकतो, हे आम्ही पहिल्यांदाच पाहतो आहोत’ असं म्हणत कार्यक्रमाला दाद दिली. त्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आणि त्याहीपेक्षा त्या आयोजनामागील हेतू आणि दृष्टीबद्दल विश्वकोश निर्मिती मंडळाची सबंध टीम अभिनंदनास पात्र ठरते. गदिमा, पुलं आणि बाबुजी यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू असताना या अशा उपक्रमांतून रसिकांच्या भावविश्वात या त्रयींच्या स्मृती सदैव जाग्या राहाव्यात आणि त्यातून येणाऱ्या काळातनवप्रतिभेचे आम्रवन’ महाराष्ट्राच्या भूमीवर अवतरावे, हीच शुभेच्छा...!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/