जपान-कॅनडाचे ‘मिथिला’प्रेम

    दिनांक  12-Feb-2019   

 

 
 
 
नाट्य, संगीत, शिल्प, चित्र, काव्य, नृत्य आदी मन प्रफुल्लित करणाऱ्या, उल्हसित करणाऱ्या बहुविध कलांचा उगम भारतातच झाला. भारतीय कलांचे वैशिष्ट्य म्हणजे उपरोल्लेखित प्रत्येकच कलेच्या निरनिराळ्या प्रांतानुसार, समूहानुसार अनेकानेक शैलीदेखील बहरल्या. प्रत्येक शैलीने आपली एक स्वतंत्र ओळख तर जपलीच पण, भारतीय संस्कृतीची एकतानताही आपापल्या आविष्कारातून गुंफली, सादर केली. जगात भारतीयांना मिळालेला असा हा कला आणि संस्कृतीचा वारसा क्वचितच अन्य कोणाला मिळाला असेल. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि जामनगरपासून दिब्रुगडपर्यंत संपूर्ण भारतभ्रमण केले की, ही समृद्धी उघड्या डोळ्यांनी पाहता, अनुभवता येते. जगातल्या जवळपास सर्वच मोठ्या आणि विकसित म्हणवल्या जाणाऱ्या देशांत इथल्या कलेची प्रशंसा, कौतुक नेहमीच केले जाते. पण नुकतीच अशी एक घटना घडली की, कोणाही भारतीयाला अभिमान वाटावा...
 

भारतीय रेल्वेगाड्यांवर अन्य चित्रकारीप्रमाणेच ‘मिथिला’ शैलीतील चित्रेही चितारलेली दिसतात. शिवाय ही चित्रे लोकांनाही मोठ्या प्रमाणावर आवडतात व आकर्षित करतात. संयुक्त राष्ट्रसंघानेदेखील ‘मिथिला’ चित्रशैलीने नटलेल्या भारतीय रेल्वेगाड्यांची प्रशंसा केली होती. ‘मिथिला’ चित्रशैली प्रामुख्याने बिहारमधून सुरू झाली व नंतर सर्वत्रच प्रसिद्धीस पावली. ‘मिथिला’ चित्रशैलीलाच ‘मधुबनी चित्रकारी’ असेही म्हणातात. बिहारच्या याच कलासंस्कृतीचा बोलबाला आता जगभरातही ऐकायला मिळतो. म्हणूनच अनोखी शैली असलेल्या ‘मिथिला’ चित्रकारीचे जपान व कॅनडा या दोन्ही देशांनी कौतुक केले असून, या शैलीतील चित्रांची मागणीही केली आहे. जपानला तर ‘मिथिला ’शैलीतील चित्रे इतकी आवडली की, त्या देशाने ‘मिथिला’ चित्रकारीत पारंगत असलेल्या चित्रकारांची भारताकडे मागणी केली. जपानने यासाठी भारताला एक विनंतीपत्र पाठवले आहे. भारतानेही जपानची ही मागणी मान्य केली आहे. दोन्ही देशांतील सांस्कृतिक देवाणघेवाणीचा हा आधुनिक काळातील दाखलाच म्हटला पाहिजे. अशा परिस्थितीत उद्या आपल्यापैकी कोणी जपानला गेले, तर तिथल्या रेल्वेगाड्यांवर ‘मिथिला’ शैलीतील चित्रे पाहिल्यास नवल वाटायला नको. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन यासंबंधीची माहिती दिली असून, “भारताची वारसा असलेल्या ‘मिथिला’ शैलीतील चित्रे रेल्वेगाड्यांवर चितारली गेली तेव्हा देशांतर्गत प्रवाशांसह परदेशातून आलेले पर्यटकही प्रभावित झाले,” असेही सांगितले. केवळ जपानच नव्हे, तर कॅनडानेदेखील ‘मिथिला’ शैलीत चित्रकारी करणाऱ्या चित्रकारांची भारताकडे मागणी केली आहे, जेणेकरून तिथल्या रेल्वेगाड्यांवरही ‘मिथिला’ शैलीतील चित्रे चितारता येतील. कॅनडाने भारताला पत्र पाठवून आपले म्हणणे मांडले आहे.

 

कॅनडा रेल्वे बोर्डाच्या प्रमुखांनी पत्रात लिहिले की, “‘मिथिला’ शैलीतील चित्रे केवळ पर्यटकांना किंवा सर्वसामान्य प्रवाशांनाच आकर्षित करतात असे नव्हे, तर ही चित्रे पाहिली की, मनात सकारात्मक विचार निर्माण होतात. व्यक्ती जेव्हा केव्हा तणावात असते, तेव्हा सकारात्मक चित्रांच्या सान्निध्यात, वातावरणात राहिल्याने तिचा मानसिक ताण कमी होतो. परिणामी, भारत सरकारने कलाकारांना कॅनडात पाठवले, तर इथल्या प्रमुख रेल्वेगाड्यांच्या डब्यांवर ‘मिथिला’ शैलीतील चित्रे चितारता येतील.” जपान आणि कॅनडाने ही मागणी केल्यानंतर भारतीय रेल्वेने प्रतिक्रिया दिली की, “जपान आणि कॅनडाला पाठवण्यासाठी ‘मिथिला’ शैलीत चित्रकारी करणाऱ्या कलाकारांची निवड करण्यात येत आहे. लवकरच चित्रकारांचा गट संबंधित देशांत पाठवला जाईल.” दरम्यान, भारतापासून हजारो मैल दूर असलेल्या जपानच्या निगाता येथे ‘मिथिला’ शैलीतील चित्रांचे एक संग्रहालयदेखील आहे, ज्यात ‘मिथिला’ चित्रांचे एक निराळेच जग वसते. इथे १५ हजारांपेक्षा अधिक ‘मिथिला’ शैलीतील चित्रे असून, इथे भारतातून या चित्रशैलीत चित्रे साकारणाऱ्या कलाकारांना नियमितरित्या आमंत्रित केले जाते. आता मात्र जपान आणि कॅनडा येथील रेल्वेगाड्यांवरही ‘मिथिला’ शैलीतील चित्रे झळकताना दिसतील व ती कोट्यवधी सर्वसामान्य नागरिकांसह कलाप्रेमी, कलासक्तांनाही आकर्षित करतील, हे निश्चित!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/