नाट्यसंमेलनाची कार्यक्रमपत्रिका जाहीर : अभिराम भडकमकर, वामन केंद्रे यांचा सन्मान

    दिनांक  12-Feb-2019


नागपूर : ९९ व्या नाट्यसंमेलनाच्या तारखांची घोषणा मंगळवारी नागपूर येथे करण्यात आली. अनेक दिग्गज नाट्यकर्मींचा यावेळई विशेष सन्मान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नाट्यकर्मी , दिग्दर्शक आणि नुकताच पद्मश्री हा मानाचा पुरस्कार जाहीर झालेले वामन केंद्रे आणि नुकत्याच संपन्न झालेल्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार सोहळ्यात विशेष पुरस्कार मिळवलेले लेखक अभिराम भडकमकर आणि लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे ह्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

९९ वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यंदा विदर्भात पार पडणारे आहे. २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या नाट्य संमेलनात अनेक उत्तम कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. २२ फेब्रुवारी रोजी संमेलनाचे उदघाटन नाटककार महेश एलकुंचवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. २४ तारखेच्या सायंकाळी होणाऱ्या समारोपाच्या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे उपस्थित राहतील.

नागपूरच्या रेशीमबाग मैदानात पार पडणाऱ्या या संमेलनाला राम गणेश गडकरी नगरी, असे नाव देण्यात येईल तर रंगमचाला पुरूषोत्तम दारव्हेकर यांचे नाव देण्यात येईल. याशिवाय गतवर्षी कायमची एग्झिट घेणाऱ्या कलाकारांची नाव काही प्रमुख दालनाना देण्यात येतील. नागपूरमध्ये रंगणाऱ्या संमेलनात अनेक दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल असेल. २२ तारखेला ९९व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या शुभहस्ते नाटयदिंडी सुरू होईल.

नाट्य दिंडीत मोहरमचा वाघ म्हणजेच मांदल, गोंदियातील आदिवासींचं गोंड नृत्य, बहुरूपी दंडार, अकोला येथील पारंपरिक ढोल भजन, खंजरी भजनचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय बँड पथक, लेझीम पथक, डायका पथक, आणि २० ते २५ सायकल रिक्षाचा समावेश असेल. पहिल्याच दिवशी रात्री 'पुन्हा सही रे सही' नाटकाचा प्रयोग होणार आहे. त्यानंतर विदर्भातील झाडीपट्टी नाट्य पद्धताचे 'आक्रोश- असा नवरा नको ग बाई' हे नाटक सादर होईल. दुसऱ्या दिवशी आनंदवनातील मुले त्यांचा वाद्यवृंद सादर करतील. हरीश शितापे यांनी शेतकऱ्याच्या विधवाचा वेदनांना नाट्य स्वरूपात मांडणार 'तेरव' हे नाटक सादर करतील. याशिवाय रघुवीर खेडकर यांच्या पारंपरिक लोकनाट्याचा खास प्रयोग रंगणार आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/