मुठाई माऊली माझी - भाग २

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2019   
Total Views |

 

 
 
 
मुठा नदीचं मूळ नाव ‘मुठा.’ पण तिला मातेसमान मानून ‘मुठाई’ असं संबोधलं जातं. ‘निसर्गाप्रति कृतज्ञताभाव’ ही आपल्या भारतीय संस्कृतीची थोरवी. प्राचीन भारतीय माणूस नद्यांशी भावनिकदृष्ट्या कसा जोडला गेलेला होता, हे आपण आजच्या लेखात पाहू.
 

छांदोग्यपरिशिष्टात नदीची एक उलटी व्याख्या केलेली आहे. ती अशी :

 

धनुः सहस्राण्यष्टौ च गतिर्यासां न विद्यते ।

न ता नदीशब्दवहा गर्तास्ता: परी कीर्तितः ।

 

अर्थ - आठ हजार धनू (एक धनु म्हणजे चार हात) एवढा ज्यांचा गमनमार्ग नाही, त्यांना नदी शब्द लागू होत नाही. ते गर्त(खळगे) म्हटले गेले आहेत. म्हणजेच आठ हजार धनू = सोळा हजार हात एवढी जिची लांबी आहे, तिलाच ‘नदी’ म्हणावे. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये ज्या निरनिराळ्या निसर्गशक्तींना देव मानलेलं होतं त्यांपैकी एक देवता म्हणजे ‘आपोदेवता’ म्हणजेच ‘जलदेवता’, जिची ऋग्वेदात स्तुती केलेली आहे. ‘आपोदेवतांनी आमचे कल्याण करावे आणि आम्हाला पुनित करावे,’ अशी ऋग्वेदात प्रार्थना आहे. नद्या या पवित्र असून जो त्यांच्या जलात स्नान करील, त्याला पावन करणाऱ्या असतात, ही भावना ऋग्वेदकाळापासून प्रचलित आहे. ऋग्वेदात एक ‘नदी सूक्त’ आहे. त्या सूक्तात गंगा, यमुना, सरस्वती, शुतुद्री, विपाशा, परुष्णी, असिक्नी, मरुद्वृधा, वितस्ता, आर्जीकीया, सुषोमा, त्रिसामा, सिंधू, गोमती अशा भारतातल्या नद्यांची नावे दिली आहेत. ‘सरस्वती’ ही वैदिक काळात आर्यांची आदरणीय नदी होती. त्यांनी तिला ‘अंबितमा’(श्रेष्ठ माता), ‘नदीतमा’(श्रेष्ठ नदी), ‘देवितमा’(श्रेष्ठ देवी), अशा शब्दांनी गौरवले आहे. महर्षी व्यासमुनींनी नद्यांना ‘विश्वस्य मातरः’ म्हणजेच विश्वाची माता असे संबोधून तिचा गौरव केल्याचा उल्लेख आढळतो. बऱ्याच धार्मिक विधींमध्ये ‘कलशपूजन’ हा विधी असतो. सर्व नद्यांचं पाणी कलशात एकत्र व्हावं, अशी प्रार्थना केली जाते. यावेळी म्हणायचा मंत्र असा आहे-

 

गङ्गेच यमुने चैव गोदावरि सरस्वति।

नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन्सन्निधिं कुरु॥

 

अर्थ - हे गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी, तू या कलशजलाचे सान्निध्य कर.

 

भारतीय संस्कृतीत नदीस्नान हे पवित्र मानलं गेल्यामुळे बरेचसे लोक नदीस्नानासाठी म्हणून तीर्थयात्रेला जातात. सोमवती अमावस्या, चंद्र-सूर्यग्रहण, संक्रांती, शिवरात्री, अर्धोदय इ. दिवशी नदीवर जाऊन स्नान करावं, असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे. कार्तिकस्नान, माघस्नान, वैशाखस्नान ही स्नानेही नदीच्या पाण्यातच करावी, असं शास्त्रवचन आहे. जिथे दोन नद्यांचा संगम होतो, त्या जागेला ‘प्रयाग’ म्हणतात. प्रयागात स्नान करणं हे अत्यंत पुण्यप्रद मानलं गेलं आहे. स्नानाआधी नदीची पूजा करणं आणि स्नानानंतर नदीला तिच्याच पाण्याचं अर्घ्य देणं, असा स्नानविधी प्रचलित आहे. सुवासिनींनी नदीची ओटी भरणं आणि तिला सौभाग्यवायन देणं ही प्रथा रामायणकाळापासून प्रचलित आहे. ग्रामीण भागातील काही लोक नदीत नागदेवतांचं वास्तव्य असतं म्हणून वा भूताखेतांमुळे नदीला पूर येतो, या समजुतींनी नदीची पूजा करतात. गंगा नदी ही अत्यंत पवित्र मानलेली असल्यामुळे लोक आपल्या मृत पूर्वजांच्या अस्थि गंगेत नेऊन विसर्जित करतात. गंगा नदीपर्यंत पोहोचणं शक्य नसेल, तर आपल्या जवळची कुठलीही नदी गंगा मानून तिची पूजा करावी, असंही सांगितलं आहे. ऋग्वेदातील सूक्तांपासून स्थानिक भाषेतल्या लोकगीतांपर्यंत सर्वत्र नदीचा महिमा गायलेला आढळतो. नदीच्या पूजेची वेगवेगळी व्रतं सांगितलेली आहेत. आषाढ महिन्यात नदीला पूर येतो तेव्हा ‘नदीत्रिरात्रव्रत’ करतात. तीन दिवस प्रातःकाळी उठून, स्नान करून एका पात्रात नदीचे पाणी घेऊन येणं आणि त्या भांड्याची पूजा करणं, असे विधी त्यात सांगितले आहेत. यावेळी नदीला, वरुणाला आणि विष्णूला अर्घ्य देतात. चैत्र महिन्यातल्या शुद्ध पक्षात ‘नदीव्रत’ सुरू करतात. या व्रतामध्ये प्रत्येक महिन्यात सात दिवस अनुक्रमे नलिनी, पावनी, सीता, इक्षू, सिंधू, भागीरथी व ल्हादिनी या नद्यांची पूजा करण्यास सांगितलं आहे. पूजेनंतर दुधाने भरलेली भांडी नदीला अर्पण करतात.

 

या सगळ्याचं तात्पर्य इतकंच की, प्राचीन काळापासून या ना त्या कारणाने माणूस भावनिकदृष्ट्या नदीशी जोडला गेला होता. ही भावना कृतज्ञतेची होती. भारतीय संस्कृती ही नद्यांच्या किनारीच उदयाला आली आणि बहरली. वैदिक ऋषींची सूक्ते सप्तसिंधूंच्या प्रदेशात निर्माण झाली. गंगा-यमुनेच्या दुआब प्रदेशात यज्ञसंस्कृती विस्तारली आहे. नर्मदा नदी भारताचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग करते. या नदीच्या किनारी अनेक वनवासी संस्कृती वसलेल्या दिसतात. भारतीय वनसंस्कृती नर्मदा नदीच्या किनारी फुलली. महाराष्ट्रात गोदावरीच्या तीरी सातवाहनांचं वैभवशाली साम्राज्य उदयाला आलं. गोदावरीच्याच तीरी महाराष्ट्र संतांच्या भक्तीसाहित्याची गंगा दुथडी भरून वाहिली. कृष्णा नदी ही महाराष्ट्राची आराध्यदेवता. काका कालेलकर सांगतात- श्रीसमर्थ आणि शिवाजीमहाराज, शाहू आणि बाजीराव पेशवे, घोरपडे व पटवर्धन, नाना फडणवीस व रामशास्त्री-थोडक्यात सांगायचे म्हणजे महाराष्ट्राचं साधुत्व आणि वीरत्व, महाराष्ट्राची न्यायनिष्ठा आणि मुत्सद्दीपणा, धर्म व सदाचार, देशसेवा आणि विद्यासेवा, स्वतंत्रता आणि उदारता, सारे काही कृष्णेच्या वत्सल कुटुंबात वाढले आहे. उत्तरेकडे जे महत्त्व गंगेचं, तेच दक्षिणेकडे कावेरीचं. प्राचीन काळी चोळ आणि पल्लवांची राज्यं, तसंच द्रविड संस्कृती कावेरीच्या तीरावर उदयाला आली. तुंगभद्रा नदीच्या काठी वैदिक संस्कृतीचा आत्यंतिक अभिमान बाळगणारं विजयानगराचं साम्राज्य उदयाला आलं. सायणाचार्यांनी याच नदीच्या तीरी बसून वेदांवर भाष्ये लिहिली आणि ती पुढे विश्वविख्यात झाली.

 
अशाप्रकारे एकेक नदी म्हणजे एकेक संस्कृतीचा प्रवाहच आहे! नदीचा अखंड प्रवाहीपणा लक्षात घेऊन कवींनी व तत्त्वचिंतकांनी मानवी जीवनाला नदीची उपमा दिली आहे. जीवनही नदीसारखंच अखंड वाहत असतं. हे सगळं इथे कथन करण्यामागचं कारण इतकंच की, प्राचीन काळापासून या ना त्या कारणाने माणूस भावनिकदृष्ट्या नदीशी जोडला गेलाय. ही भावना कृतज्ञतेची आहे. ही कृतज्ञतेची भावना निर्माण होण्याचं कारण काय? तर हेच की आपलं जीवन नदीवर अवलंबून आहे, याची जाणीव. एक नदी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे तिच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना असंख्य सेवा पुरवत असते. आधुनिक पर्यावरणशास्त्राच्या भाषेत आपण त्यांना Ecological Services म्हणू. त्या त्या नदीची उपयुक्तता लक्षात घेऊन तिच्या किनारी मानवी वस्ती होत गेली तसंच मुळा-मुठेच्या किनारी पुणे शहर वसलं. मागील लेखात वर्णन केलेली मुळा-मुठा नद्यांची दुरवस्था होण्याचं मुख्य कारण म्हणजे इथे राहणारा माणूस भावनिकदृष्ट्या नदीपासून तोडला गेला. प्राचीन काळी स्नानाच्या निमित्ताने वा पाणी आणण्याच्या निमित्ताने माणूस नदीजवळ जायचा. आज शहरांमध्ये घरातच नळाला पाणी येत असल्यामुळे नदीशी थेट संपर्क राहिलेला नाही. मुठा नदीच्या पुलांवर मित्र-मैत्रिणी आणि प्रेमी युगुलं नदीकडे बघत ‘टाईमपास’ करताना दिसतात, पण त्यांचं मन कधीच नदीशी जोडलं गेलेलं नसतं. हे मन जोडण्याचा प्रयत्न सध्या पुण्यात होतोय. त्याबद्द्दल सविस्तर पाहू पुढच्या भागांमध्ये...
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@