क्राईम कंट्री मेक्सिको

    दिनांक  01-Feb-2019   मेक्सिकोमधील हिंसा आणि गुन्हेगारीकरण फक्त ड्रग्जमाफियांपुरतेच मर्यादित नाही, तर राजकीय हिंसाचाराचे प्रमाणही धक्कादायक आहे. २००८ ते २०१२ या पाच वर्षांच्या काळात राजकारण्यांच्या हत्यांचे प्रमाण हे तब्बल २४०० टक्के इतके प्रचंड होते.


राजकीय हिंसा आणि गुन्हेगारीकरण हा खरंतर कोणत्याही देशासाठी अभिशाप ठरावा. कारण, जिथे हिंसाचाराचे भयाण वारे वाहतात, तिथे आपसूकच सकारात्मक विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसते. भारतातही याची वेळोवेळी प्रचिती आली असली तरी सुदैवाने आपला देश हिंसाचार आणि गुन्हेगारीकरणाच्या गर्तेत आकंठ बुडालेला नाही. मजबूत लोकशाही तत्त्वे, सक्षम पोलीस यंत्रणा आणि निर्भिड सैन्यामुळे भारतात ही परिस्थिती कधीही हाताबाहेर गेली नाही. त्याउलट चित्र शेजारी पाकिस्तानातले. फाळणीपासूनच दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या या देशाने भारताविरोधात तर वेळोवेळी युद्ध छेडलेच, पण अंतर्गत सुरक्षा, गुन्हेगारीकरण आणि सैन्याच्या अपरिमित हस्तक्षेपामुळे पाकिस्तानमध्ये आजवर स्थैर्य नांदले नाही. असाच एक गुन्हेगारीकरण, हिंसाचाराच्या बाबतीत अस्थिर राहिलेला देश म्हणजे मेक्सिको. हा तोच मेक्सिको देश ज्याची ३,१४५ किमीची उत्तरी सीमा ही अमेरिकेशी जोडलेली आहे. या सीमेवरूनच होणाऱ्या घुसखोरीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चिंताग्रस्त असून त्यांना या सीमेवरच मोठी भिंत बांधायची आहे. याच मुद्द्यावरून सध्या अमेरिकेत वादंग उठले असून शटडाऊन सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मेक्सिको, मेक्सिकोतील अमेरिकेतील बेकायदा स्थलांतरे आणि एकूणच ढासळत चाललेली सामाजिक-राजकीय स्थिती हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

 

फिलिपिन्सप्रमाणेच मेक्सिकोमध्येही ड्रग्जच्या नशेखोरीची मुळं अगदी खोलवर रुतली आहेत. आज ५० टक्क्यांहून अधिक मेक्सिकन तरुण या व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकले आहेत. अशात मेक्सिकोला खिळखिळी करणारी ड्रग्जची ही साखळी पूर्णपणे उखडून टाकण्यासाठी २००६ पासून मेक्सिकन सरकारने व्यापक पातळीवर प्रयत्न सुरू केले. परिणामी, ड्रग्जच्या धंदेखोरांवर जरब बसविण्यासाठी पोलीस तसेच सैन्यशक्तीचाही पुरेपूर वापर करण्यात आला. परिणामी, २००६ पासून आजतागायत मेक्सिकोमध्ये तब्बल अडीच लाखांहून अधिक जणांच्या हत्या झाल्या आणि ३५ हजार नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. याचे प्रामुख्याने कारण म्हणजे मेक्सिकोचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फेलिप कॅलडेरॉन यांनी ड्रग्जमाफियांच्या नायनाटासाठी केलेला सैन्यशक्तीचा बेछूट वापर. सरकारचा हेतू योग्य असला तरी त्याची अंमलबजावणी करणाऱ्या सैन्याने मात्र निर्दोषांवरही अनन्वित अत्याचार केले. त्यामुळे हा संघर्ष अगदी शिगेला पोहोचला. इतका की, २०१८ हे वर्ष मेक्सिकोच्या इतिहासातील रक्तरंजित वर्ष ठरावे. कारण, या गेल्या एका वर्षात मेक्सिकोमध्ये तब्बल ३४ हजार नागरिकांच्या हत्या करण्यात आल्या. मेक्सिकोमधील या भयाण परिस्थितीमागील दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अपुरा पोलीस फौजफाटा. वाचून धक्का बसेल, पण या देशात अजूनही १ लाख, १६ हजार पोलिसांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे स्थानिक स्तरावर बंदोबस्त करणारे, हिंसात्मक परिस्थितीला लवकरात लवकर नियंत्रणात आणणारी सुरक्षाव्यवस्थाच मेक्सिकोत उपलब्ध नाही. परिणामी, हिंसाचाराचा हा वणवा अधिक जलदगतीने भडकत जातो. पोलिसांच्या या कमतरतेमुळे ड्रग्जमाफियांचेही चांगलेच फावते. मोठमोठ्या झुंडीत न राहता मूळ शहरापासून, लहान गावांमध्ये अजूनही या ड्रग्जमाफियांचा चांगलाच दबदबा आहे. त्यामुळे मुळापासून त्यांचे उच्चाटन करणे अद्याप मेक्सिको सरकारपुढील सर्वात मोठे आव्हान ठरते आहे.

 

मेक्सिकोमधील हिंसा आणि गुन्हेगारीकरण फक्त ड्रग्जमाफियांपुरतेच मर्यादित नाही, तर राजकीय हिंसाचाराचे प्रमाणही धक्कादायक आहे. २००८ ते २०१२ या पाच वर्षांच्या काळात राजकारण्यांच्या हत्यांचे प्रमाण हे तब्बल २४०० टक्के इतके प्रचंड होते. म्हणजे, दर १५ मिनिटाला मेक्सिकोमध्ये एक हत्या होत असल्याचे आकडेवारी सांगते. त्याचबरोबर कमजोर सरकार, कमकुवत नेतृत्व व देशाचा एकूणच ढासळता आर्थिक विकास, वाढती बेरोजगारी अशी मेक्सिकोसमोरील आव्हानेही मोठी आहेत. त्यामुळे आगामी काळात मेक्सिकोमधील परिस्थिती सुधारायची असेल तर पोलीस व्यवस्था सक्षम करण्यापासून ते नागरिकांमध्ये कायद्याप्रती विश्वास निर्माण करावा लागेल. कारण, आज मेक्सिकोमध्ये ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुन्ह्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा ठोठावली जात नाही. ही स्थिती बदलावी लागेल. त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन सहाकार्याने, सौहार्दाची भूमिका घेण्याशिवाय मेक्सिकन सरकारपुढे सध्या तरी कुठलाही ठोस उपाय नाही, असेच दिसते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/