नाते अमुचे त्यांच्याशी... बंध अमुचे त्यांच्याशी...

09 Dec 2019 15:22:04


fdhd_1  H x W:


जी व्यक्ती 'आंबेडकरवादी' आहे, ती व्यक्ती 'मार्क्सवादी' असूच शकत नाही आणि जी व्यक्ती 'मार्क्सवादी' आहे, ती 'आंबेडकरवादी' असूच शकत नाही, असा विश्वास असणारे निलेश मोहिते. शोषित-पीडित जनतेला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी निलेश अग्रेसर आहेत. गावातील 'बौद्धजन पंचायत' आणि 'बौद्ध महासभा' या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांचे एकत्रिकीकरण करून त्यांनी त्यांच्या गावात 'बौद्ध समाज सेवासंघ' संस्था स्थापन केली. हेतू हा की, कार्यकर्त्यांचे विभाजन होऊ नये. पुढे 'दलित युवा पँथर'च्या माध्यमातून त्यांनी संघर्ष आणि समन्वयाच्या माध्यमातून समाजकार्य सुरूच ठेवले आहे. त्यांचे विचार त्यांच्याच शब्दांत...


रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेल्या घोसाळेगडाच्या पायथ्याशी असलेले घोसाळे हे गाव. दि. १३ जून, १९८८ रोजी या गावात हिरू आणि वंदना मोहिते यांच्या पोटी माझा जन्म झाला. या गावात जन्माला येणारा माणूस इतिहास वाचून मोठा होत नसतो, तर तो साक्षात इतिहासच जगत असतो. हाच इतिहास जगत मी मोठा झालो आणि त्याच्या पुढच्या काळात हा इतिहास जोपासला, सांभाळला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर रचनात्मक कार्य करावे, समाजाला खऱ्या अर्थाने प्रगतिपथावर न्यावे, यासाठी कार्य करण्याची जिद्द कदाचित यातूनच आली असावी. मला वाचनाची लहानपणापासूनच लागली होती. तिसरीच्या वर्गात असतानाच मी चौथीचे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे पुस्तक वाचून काढले होते आणि पुढे मिळेल ती पुस्तके वाचत राहिलो. वाचनाचे हे अखंड व्रत कामाचा प्रचंड व्याप वाढला असतानाही मी जपले आहे. तशी मला वक्तृत्वाचीही लहानपणापासून आवड. शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धेत सतत पाच वर्षे माझा प्रथम क्रमांक आला होता. एका वर्षी स्पर्धेचे निकाल जाहीर करताना ठाकूर मॅडम मला म्हणाल्या होत्या, "नेहमीच येतो जसा पावसाळा, तसाच याही वर्षी निलेश मोहिते वक्तृत्व स्पर्धेत पहिला आला आहे." खरेतर शुद्ध भाषेची माझी पार्श्वभूमी नव्हती. पण, वाचनामुळे मला शब्दांच्या नादलयीचे वेड लागले. ते शब्द, त्या शब्दाची लय मी अनुभवत असे. त्यामुळे वक्तृत्व स्पर्धेत भाषण करताना उच्चारलेला प्रत्येक शब्द अर्थासह ध्वनित व्हावा, यावर माझा कटाक्ष असे. माझ्या वक्तृत्वाला सगळ्यात जास्त मिळालेला न्याय म्हणजे 'कोकण एज्युकेशन रायगड जिल्हा वक्तृत्व स्पर्धे'मध्ये ५०० पेक्षा कमी पट असलेल्या शाळेतून जिल्हास्तरावर पारितोषिक मिळविलेली एकमेव शाळा म्हणजे कोकण सोसायटी माध्यमिक विद्यालय, घोसाळे आणि तो एकमेव विद्यार्थी म्हणजे मी, निलेश मोहिते. हे सगळे आठवण्याचा आणि सांगण्याचा खटाटोप यासाठी की, लहानपणीची वक्तृत्वाची आवड आता समाजकार्य करताना मला खूप उपयोगी पडते. लोकांचे हक्क अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचवताना मी स्पष्ट स्वरूपात पोहोचवू शकलो, तसेच जनहक्कासाठी लढताना मी जनतेची बाजूही प्रत्येक वेळी यशस्वीरीत्या मांडू शकलो. डॉ. बाबासाहेबांनी 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा'चा मंत्र दिला. हा मंत्र मी समाजाच्या कामामध्ये केंद्रस्थानी ठेवला आहे. याची बीजे कदाचित त्यांच्याबरोबर शालेय जीवनात घडलेल्या एकाप्रसंगामुळेच रुजली असावी. शाळेतल्या प्रत्येक स्पर्धेत, अभ्यासात ते निर्विवाद आपले वर्चस्व गाजवत होते. इतकेच काय, आपल्या वर्गाचेही बहुतांश वेळेस मॉनिटर असायचे. पण, शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन प्रतिवर्षी होते. स्नेहसंमेलनाच्या वेळी संबंध शाळेतून एक विद्यार्थिनी व एक विद्यार्थी असे निवडणुकीच्या माध्यमातून प्रतिनिधी म्हणून निवडले जात. ही निवडणूक म्हणजे आजच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसारखीच असे आणि ही निवडणूक मी आपल्या मित्राला एक हाती निवडून देत होतो. एकदा मात्र मी निवडणुकीला उभा राहिलो आणि व्हायचे तेच झाले, जे आज सार्वत्रिक निवडणुकांमध्ये होते. दरवर्षी रात्रंदिवस मी मित्राला निवडून आणायचो. त्यामध्ये मी जातपात पाहिलीच नाही. किंबहुना, माझ्या समाजाच्या विद्यार्थ्यांची मते मित्राला पडणारच याची मी काळजी घ्यायचो. त्यासाठी मी काम करायचो. पण, ज्यावेळी मी उभा राहिलो, त्यावेळी मी शाळेची निवडणूक हारलो. कारण, बौद्धवाडीत राहणाऱ्या निलेशला फक्त बौद्धवाडीतल्या मित्रांचीच मतं मिळाली होती. हे असे का व्हावे? इतर समाजातील माझ्या मित्रांना विचारले. पण, त्यांच्याकडेही याचे उत्तर नव्हते. त्यावेळी वाटले की, आपण केवळ बौद्धवाडीमधील आहोत म्हणून आपल्याला नाकारले गेले का? खूप वाईट वाटले...

 

शाळेत एक पद्धत आहे, दहावीला प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव शाळेतील फलकावर कायमच लिहिले जात असे. मी ठरवले की, उद्या जरी आपण शाळेत नसलो तरी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्याच्या फलकावरील यादीत आपले नाव झळकावे. पण, घरची परिस्थिती बेताची होती. पुढील शिक्षण घ्यायचं म्हटलं तर तालुक्याला ये-जा करावी लागणार किंवा मुंबईला जावं लागणार. माझ्या घरी हे शक्यच नव्हतं. त्यामुळे आई-वडिलांना वाटे, 'मुलगा नापास झाला तरी काय? पुढे तर आपण त्याला शिकवणार नाही. पण, जर पास झाला तर त्याला पुढील शिक्षण द्यावेच लागेल. तो खर्च परवडणार नाही. पास होऊन शिकवले नाही, तर समाज नावं ठेवेल. पोरालाही वाईट वाटेल." आई-बाबा वाईट होते असे नाही. उलट त्यांची इच्छा खूप होती की, मी आयुष्यात काहीतरी करावे. पण, गरिबीमुळे माझ्या आईवडिलांना पोटच्या पोराच्या भविष्याचे चित्र रंगवणेही कठीण होत असे. ही आमची कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती. त्या परिस्थितीचे चटके मी अनुभवत होतो. मात्र, त्यावेळी मनात एक जिद्दच निर्माण झाली की, शाळेच्या त्या फलकावर आपले नाव कायमचे कोरुन ठेवायचे. शैक्षणिक साहित्याची वानवा, घरात आणि परिसरामध्ये शिक्षणाच्या नावाने प्रतिकूल परिस्थिती. शिकूच नये असे वातावरण. पण, मी जिद्द कायम ठेवली. मनापासून अभ्यास केला. दहावीचा निकाल लागला तेव्हा घोसाळे माध्यमिक विद्यालयातून मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो. १९८३ पासून २००९ पर्यंत बौद्धवाडीतील कोणताही विद्यार्थी घोसाळे माध्यमिक विद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला नव्हता. तो इतिहास पुसून मी नवी परंपरा चालू केली आणि त्यानंतर पुढच्या तीन वर्षातील दहावीला प्रथम क्रमांकाचे उत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे बौद्ध होते. त्यावेळी शाळेमध्ये 'पहिला' आलो म्हणून मला जो आंनद झाला, त्याहीपेक्षा मला याचा आज जास्त आनंद वाटतो की, आपण बौद्धवाडीत प्रतिकूल वातावरणात राहिलो तरी अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर शाळेत पहिला क्रमांक मिळवू शकलो. हा आशावाद मी माझ्या बौद्धवाडीतल्या मुलांना दिला. हे खूप महत्त्वाचे आहे. पुढे गावातले समाजकारण पाहत मी वाढलो. गावातही बौद्धजन पंचायत आणि बौद्ध महासभा या समाजातील दोन संघटनांचे कार्य जवळून पाहिलेले. पण, इथेही काही लोक या संघटनांच्या उदात्त कार्याला डावलण्याचा प्रयत्न करत होते. वैयक्तिक हेवेदावे काढीत होते. त्यामुळे समाजाच्या प्रगतीला खिळ बसे. त्यामुळे २०१२ साली मी घोसाळे गावातील या दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांचे एकत्रिकीकरण करून 'बौद्ध समाज सेवासंघ' स्थापन केला. हेतू हा की, दोन्ही संघटनांमधील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन समाजासाठी काम करावे. पुढे याच प्रकारे 'बौद्ध युवासंघ रायगड'ही स्थापन केला. ही संघटना संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी काम करते. हे सगळे करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चिंतनही करत असे. त्यावेळी वाटले की, 'आंबेडकरवादी' आहे तो 'मार्क्सवादी' असूच शकत नाही आणि जो 'मार्क्सवादी' आहे तो 'आंबेडकरवादी' असूच शकत नाही. पुढील शिक्षणासाठी मग मुंबईला आलो, पण जर मुंबईला राहायचे आहे तर राहण्यासाठी काम करणे, पैसे मिळविणे क्रमप्राप्त होते. शिक्षण घेताना मी एका खाजगी कंपनीच्या कॅन्टिनमध्येही काम केले. पुढे त्याच कंपनीच्या कार्यालयात कामाला लागलो. कुरिअर सर्व्हिस सेल्समन अशी नोकरी करत असताना मी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात आर्थिक सुबत्ता आली.

 

महाविद्यालयाचे शिक्षण घेताना किंवा नोकरी करताना वाचनव्रत कधीच सोडले नाही. माझे वाचन कालौघात अधिकाधिक व्यापक होत गेले. दलितांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी आक्रमक संघटना म्हणून 'दलित पँथर'ची स्थापना झाली. चळवळीला एका उच्च स्थानावर नेऊन ठेवण्याचे कामही संघटनेने केले. पण, कालांतराने तिची शकले झाली. आज दलितांच्या, शोषित पीडितांच्या नावाने राजकारण करणारे अनेक नेते तयार झाले. पण, समाजाचे प्रश्न सुटले नाहीत. याला कारण काय असावे, तर युवा वर्ग त्यातही शिक्षित युवावर्गाची या चळवळीशी नाळ जुळलेली नव्हती. त्यामुळे 'दलित पँथर'च्या विचारांशी संयुक्तिक मात्र आजच्या वास्तवतेला अनुसरून युवकांचे एकत्रिकरण होणे आवश्यक होते. या अनुषंगाने निर्माण झालेली संघटना आहे, 'दलित युवा पँथर.' या संघटनेच्यावतीने मी सामाजिक चळवळीत सक्रिय झालो. '२०१७ साली मुंबई महानगरपालिकेची भरती झाली होती. १ हजार, ३८८ लोकांनी ही परीक्षा दिली होती. पण, या परीक्षेची प्रश्नपत्रिका अवघड होती आणि इतरही कारणांमुळे या परीक्षेचा निकाल रद्द करावा की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ही भरतीप्रक्रिया सुरू व्हावी म्हणून 'दलित युथ पँथर'ने एक समांतर चळवळ उभी केली. आंदोलन, बैठका, पत्रव्यव्हार याद्वारे दबावतंत्र उभे केले. आज ती भरतीप्रक्रिया पूर्ण झाली आणि १ हजार, ३८८ लोकांचीही त्यात भरती झाली. 'फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'च्या १८४ सुरक्षारक्षकांचा प्रश्न, तसेच पुणे परिवर्तन महामंडळातील १ हजार, ५२२ होमगार्ड्स भरतीचा प्रश्न 'थायसन ग्रुप कंपनी' किंवा 'नवभारत प्रेस'मधील कामगारांचा प्रश्न, या सर्वांमध्ये 'दलित युथ पँथर'ने महत्त्वाची भूमिका निभावली. आता पुढेही बाबासाहेबांच्या विचारांवर काम करायचे आहे. कारण,

 

अन्यायाच्या खोल जखमा,

अत्याचाराचे शोषित जीव

 

दबलेल्या श्वासांच्या अस्पष्ट कहाण्या

 

नाते अमुचे त्यांच्याशी...

बंध अमुचे त्यांच्याशी..

 

fdh_1  H x W: 0 
Powered By Sangraha 9.0