अस्वस्थतता असू द्या, अविचार नको!

    दिनांक  09-Dec-2019 19:36:41   
|
BJP _1  H x W:


अस्वस्थ नेत्यांना एवढेच सांगता येण्यासारखे आहे की, अस्वस्थता असू द्या, तिचे रुपांतर अविचारात करू नका. तुमचे भवितव्य उज्ज्वल आहे. स्वतःची व्यक्तिगत गाऱ्हाणी गात बसण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचे व्यापक विषय हाती घ्या. त्या विषयाशी एकरूप व्हा.


सध्या महाराष्ट्रात पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या बातम्या गाजत आहेत. या दोन्ही नेत्यांविषयी अशा बातम्या पेरल्या जात आहेत की, ते भाजप सोडण्याचा निर्णय करतील. एकनाथराव खडसे यांनी असा आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीला निवडणुकीत पाडण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांनी प्रयत्न केला. तसेच पंकजा मुंडे यांना पराभूत करण्यासाठी काही भाजप नेते कारणीभूत आहेत. हे नेते कोण आहेत, याची माहिती त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना दिली आहे. वर्तमानपत्रात त्यांनी ही बातमी जाहीर केलेली नाही. पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून काही दिवसांपूर्वी भाजपचा लोगो काढून टाकला. त्या ज्या काही म्हणाल्या, ते त्यांच्या शब्दात असे, "मी आपल्याला वेळ देणार आहे... आठ ते दहा दिवसांनंतर. हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वतःशी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे."

 

एकनाथ खडसे यांनी असे वक्तव्य केले आहे की, "मला कोअर कमिटीच्या बैठकीसाठी निमंत्रण नसते. निर्णयप्रक्रियेत माझा सहभाग नसतो आणि जर अशाच प्रकारे अपमानित करणे चालू राहिले तर मला अन्य पर्यायांचा विचार करावा लागेल. मी कुणी देव नाही, माणूसच आहे. मलादेखील भावना आहेत, पक्ष सोडावा अशी माझी इच्छा नाही, चार दशके मी पक्षासाठीच काम केले आहे." पंकजा मुंडे यांच्या ट्विटरचा वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ मीडियाने काढायला सुरुवात केली. १५ ओबीसी आमदारांसहित पक्ष सोडणार का? ब्राह्मण नेतृत्त्वाविरुद्ध ओबीसी नेतृत्त्व बंड करणार का? शिवसेनेत जाणार का? या प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रांच्या स्वभावाप्रमाणे पदरचे अधिक घालून देण्यात आल्या. त्याला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या,"मी भाजपची समर्पित कार्यकर्ती आहे. माझे स्वर्गीय पिता गोपीनाथ मुंडे यांनी भाजपच्या वाढीसाठी अपार कष्ट घेतले. त्यांच्या जयंतीच्या अगोदर दरवर्षी मी असे लिहीत असते. यावेळी त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला."

 

एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचे नेतृत्त्व ओबीसी वर्गातून पुढे आलेले आहे. महाराष्ट्राचे राजकारण दाखवायला पुरोगामी आणि जातीविरहीत राजकारण असल्याचे सांगितले जाते. वास्तवात कोण कुठल्या जातीचा आहे, याचा शोध घेतला जातो आणि त्याच्या नेतृत्त्वाच्या मागे त्याची जात जोडली जाते. भाजपचे नेतेही त्याला अपवाद नाहीत. देवेंद्र फडणवीस म्हणजे ब्राह्मणांचा नेता, विनोद तावडे मराठा समाजाचा नेता, एकनाथ खडसे आणि पंकजाताई ओबीसी वर्गाचे नेते, अशी मांडणी वर्तमानपत्रातील पुरोगामी आणि जातनिर्मूलनवादी जाणूनबुजून करत असतात.

 

एका बाजूला हेच लोक म्हणणार की, भाजप हिंदुत्त्ववादी पक्ष आहे. हिंदूंचे नेतृत्त्व करतो. मुसलमानांना भाजपत स्थान नाही. त्यांच्या मतांची भाजप चिंता करीत नाही. हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न असतो आणि त्याच लेखणीने हे सांगणार की, भाजपचे नेते वेगवेगळ्या जातींचे नेते आहेत. यामध्ये विसंगती आहे, असे जर आपण त्यांना सांगायला गेलो तर पुरोगामी म्हणतील की, सुसंगती हा गाढवाचा गुणधर्म आहे आणि आम्ही गाढवापेक्षाही वरच्या दर्जाचे (गाढव) असल्यामुळे आमच्यात सुसंगती शोधू नये.
 

राजकीय नेत्यांचे अस्वस्थ होणे, रुसणे-फुगणे, अधिक मुखर होऊन आपल्या व्यथा व्यक्त होणे, यात काही गैर आहे असे नाही. राजकारणात जे शांत बसतात, त्यांना कुणी विचारत नाही. जे सदैव या-ना-त्या प्रकारे क्रियाशील असतात. आपले अस्तित्व सतत दाखवित राहतात, तेच पुढे जातात. काहीजण आपल्या मतदारसंघापुरते सीमित राहतात. पण, तिथे त्यांचे अस्तित्व पावलोपावली जाणवत राहते. काहीजण प्रादेशिक राजकारणात क्रियाशील राहण्याचा प्रयत्न करतात.

 

एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या अस्वस्थतेला कारणे आहेत. ती नजरेआड करून चालणार नाहीत. पक्षनेतृत्त्व त्याची योग्य प्रकारे दखल घेईल. ते त्यांचे काम आहे. त्यात त्यांनी जर चूक केली किंवा चालढकल केली तर जे काही परिणाम होतील, त्याची जबाबदारी त्यांच्यावर येईल. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका अवघड असते, परंतु सगळ्यांना बरोबर घेतल्याशिवाय राजकारणात यशस्वी होता येत नाही. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे आज पक्षात आहेत, उद्याची स्थिती काय असेल? हे सांगता येत नाही. पण एक गोष्ट नक्कीच सांगता येते की, भाजप हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. तो जोपर्यंत विचारधारेवर चालणारा पक्ष राहील, तोपर्यंत संघस्वयंसेवक त्याच्यामागे उभे राहतील, ज्याक्षणी विचारधारेशी तडजोड केली जाईल किंवा ती सोडण्याचा प्रयत्न केला जाईल, तेव्हा संघस्वयंसेवक भाजपला सोडचिठ्ठी देतील. भाजपचे यश-अपयश विचारधारेवरच अवलंबून आहे.

 

पक्षाची प्रतिमा पक्षातील नेते निर्माण करीत असतात. गोपीनाथराव मुंडे यांनी १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर महाराष्ट्र विधानसभेत एकाकी झुंज दिली. विचारधारेला ते चिकटून राहिले. 'भाईगँग'ला आव्हान देणे, म्हणजे मृत्यूला आव्हान देण्यासारखे असते, ते त्यांनी केले. त्यामुळे सगळे स्वयंसेवकच नव्हे, तर सगळा देशभक्त समाज गोपीनाथरावांच्या मागे उभा राहिला. ते कोणत्या जातीचे आहेत, याचा पुरोगामी शोध कोणी घेतला नाही. ते 'ओबीसींचे नेते' असेही आम्ही कुणी मांडले नाही. ते 'लोकनेते' आहेत, 'जननेते' आहेत, असेच आम्ही सर्वांनी मानले आणि त्यांच्या पाठीशी सर्व ताकदीनिशी उभे राहिलो.
 

या काळात क्षणिक मोहाला बळी पडून दोन-चारजण भाजप सोडून गेले. मराठवाड्यातील एक कर्तृत्त्ववान मराठा भाजप सोडून गेला. त्यांचे नाव मी लिहीत नाही. आज ते भाजपमध्ये असते तर पहिल्या श्रेणींच्या नेत्यात त्यांची गणना झाली असती. निर्णयप्रक्रियेतील ते एक महत्त्वाचे नेते झाले असते. आपल्या हाताने त्यांनी आपल्या कर्तृत्त्वाचे वाटोळे करुन घेतले. मंत्रिपदाचा क्षणिक मोह, खासदारकीचा क्षणिक मोह, आयुष्याची पुण्याई राखरांगोळी करुन टाकतो. शंकरसिंग वाघेला यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली, आज जनतेने शंकरसिंग वाघेला यांना सोडचिठ्ठी दिली आहे. ते निष्ठेने भाजपमध्ये राहिले असते, तर कुणी सांगावे ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले असते.

 

वैचारिक निष्ठा नेत्याला प्रचंड नैतिक बळ देते. नेतृत्त्व नैतिक बळावरच उभे राहते. जातीच्या कुबड्या त्यासाठी काही उपयोगाच्या नसतात. आजूबाजूला सुमार कर्तृत्त्वाची माणसे आणि स्वार्थाचा सल्ला देणारी माणसे गोळा करता नयेत. मन उद्विग्न झाले की, आपल्याला प्रियकर असणारे सल्ले गोड वाटू लागतात. असले गोड सल्ले दीर्घकालीन विचार केला तर कडू फळ देणारे असतात. पंकजाताईंसंबंधी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने खासगीत उद्गार काढले होते की, 'यह लंबे रेस का घोडा है।' याचा अर्थ दीर्घकालीन विचार करता ज्यांचे राजकराणातील भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे, असा याचा अर्थ होतो. ज्यांना दीर्घकालीन राजकारण करायचे आहे की, त्यांनी दीर्घकालीन योजना करूनच काम करायला पाहिजे. निवडणुकांतील यश-अपयश हे तात्कालिक असते. म्हणून शहाण्या राजकारणाने निवडणुकांमधल्या यशाची हवा डोक्यात शिरू देता नये आणि पराभव झाल्यामुळे हाताश होता नये. जगातील कोणताही महान राजकीय नेता, राजकारणात उतरल्यानंतर पहिल्या दिवसापासून यशस्वी झालेला नसतो.

 

लिंकनचे उदाहरण घेऊया. अध्यक्ष होण्यापूर्वी लिंकन राजकारणातील अयशस्वी माणूस होता. सिनेटची निवडणूकही तो जिंकू शकला नाही. 'काँग्रेस'मध्ये (आपल्या भाषेत लोकसभेत) केवळ तो दोन वर्षे होता, पुन्हा निवडून आला नाही. राज्य चालविण्याचा अनुभव शून्य होता. तो अशा वेळी राष्ट्राध्यक्ष झाला, ज्यावेळी अमेरिकेपुढे जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला. अमेरिकेचे दोन तुकडे झाले. गृहयुद्ध सुरू झाले. युद्धाचा लिंकनला अनुभव शून्य, अर्थव्यवस्थेचा अनुभव शून्य. पण, आज अमेरिकेतील प्रत्येक माणूस म्हणतो की, लिंकन इतका महान राष्ट्राध्यक्ष आणखी दुसरा कुणी नाही. लिंकनकडे एकच गोष्ट होती, ती म्हणजे देश एक ठेवण्याचा पक्का विचार आणि त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी.
 

म्हणून अस्वस्थ नेत्यांना एवढेच सांगता येण्यासारखे आहे की, अस्वस्थता असू द्या, तिचे रुपांतर अविचारात करू नका. तुमचे भवितव्य उज्ज्वल आहे. स्वतःची व्यक्तिगत गार्‍हाणी गात बसण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचे व्यापक विषय हाती घ्या. त्या विषयाशी एकरूप व्हा. स्वतःला समर्पित करा. काही न मागता सर्व गोष्टी तुमच्या दारी आपोआप उभ्या राहतील.