आता येऊरच्या पिल्लाच्या आईचा शोध ; पिल्लाची नॅशनल पार्कमध्ये देखरेख

06 Dec 2019 17:24:51

tiger_1  H x W:


मादी आढळून आल्यानंतरच पिल्लाला सुपूर्द करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणार


मुंबई (अक्षय मांडवकर) - ठाण्यातील येऊर वनपरिक्षेत्रात आढळेल्या बिबट्याच्या पिल्लाच्या आईचा मागमूस लावण्याचा प्रयत्न आता वन विभागाकडून करण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून पिल्लाला ते सापडलेल्याच ठिकाणी ठेवून त्याची आई येण्याची प्रतीक्षा करण्यात आली. मात्र, त्यामध्ये यश मिळाले नाही. दरम्यान पिल्लाची प्रकृती खालवली आहे. त्यामुळे आता या परिसरात एखाद्या मादी बिबट्याचा वावर आढळल्यानंतरच पिल्लाला सुपूर्द करण्याचा निर्णय वनाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

 

tiger_1  H x W: 
 
 

येऊर वनपरिक्षेत्रातील वायू दलाच्या उपकेंद्राजवळ बुधवारी सकाळी बिबट्याचे नवजात पिल्लू आढळून आले होते. वन विभागाने या पिल्लााला ताब्यात घेऊन त्याची रवानगी पुन्हा त्याच्या आईकडे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बुधवारी रात्री पिल्लाला ते सापडलेल्या ठिकाणी ठेवण्यात आले. सभोवती कॅमेरा लावून वनाधिकारी रात्रभर त्यावर नजर ठेवून होते. मात्र, त्या परिसरात दाखल झालेली मादी केवळ पाहणी पिल्लाला न घेताच निघून गेली. दरम्यान आईचे दूध मिळत नसल्याने गुरुवारी पिल्लाची प्रकृती ढासळली. परंतु, आदल्या रात्रीच मादी पाहणी करुन गेल्याने वनाधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री पिल्लाला पुन्हा त्याच ठिकाणी ठेवले. परंतु, पिल्लाजवळ मादी फिरकलीच नाही. त्यामुळे आता मादीचा वावर आढळल्यावरच पिल्लाला तिच्याकडे सुपूर्द करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत.

 
 
 

पिल्लाच्या खालवलेल्या प्रकृतीचा विचार करता आता एखाद्या मादी बिबट्याचा वावर आढळून आल्यानंतरच आम्ही पिल्लाला सुपूर्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शैलेश पेठे यांनी दिली. मादीच्या शोधासाठी संपूर्ण परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात येणार असल्याचे येऊरचे वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले. तोपर्यंत पिल्लाला राष्ट्रीय उद्यानात पुशवैद्यकाच्या देखरेखीअंतर्गत ठेवण्यात येणार आहे. हे पिल्लू नर असून ते साधारण पंधरा दिवसांचे आहे.


Powered By Sangraha 9.0