ती आली, अन् पिल्लाला पाहून निघून गेली !

05 Dec 2019 18:29:07

tiger_1  H x W:


येऊरमध्ये सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला मादीकडे सुपूर्द करण्यासाठी वन विभागाची प्रयत्नांची पराकाष्ठा

 

मुंबई (अक्षय मांडवकर) - ठाण्यातील येऊर वनपरिक्षेत्रात बुधवारी सकाळी आढळलेल्या बिबट्याच्या पिल्लाला वन विभागाने पुन्हा त्याच्या आईच्या कुशीत विसावण्याचा प्रयत्न केला. मात्र, बुधवारी सायंकाळच्या सुमारास पिल्लाजवळ आलेली मादी केवळ परिसराची पाहणी करुन निघून गेली. दरम्यान या नवजात पिल्लाची प्रकृती ढासळत आहे. पुढील दोन-तीन दिवसांमध्ये मादीने त्याला न स्वीकारल्यास त्याची तग धरण्याची शक्यता कमी असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. अशा परिस्थिती मादीने जागेची पाहणी केल्याने अजूनही आशेचे किरण कायम असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

 
 

tiger_1  H x W: 
 
 

बुधवारी पहाटे येऊर वनक्षेत्रात प्रभातफेरीसाठी गेलेल्या लोकांना बिबट्याचे नवजात पिल्लू आढळून आले. त्यांनी त्वरित याची माहिती वन विभागाला दिली. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळावरुन पिल्लाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात' केली. याठिकाणी प्राथमिक आरोग्य तपासणी केल्यावर पिल्लाला पुन्हा आईकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी सायंकाळी राष्ट्रीय उद्यानाचे वनाधिकारी पिल्लासह येऊरमध्ये हजर झाले. यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शैलेश पेठे, उद्यानाचे संचालक अन्वर अहमद आदी अधिकारी होते. त्यांनी पिल्लाला सकाळी सापडलेल्या ठिकाणीच सुरक्षेच्या दृष्टीने प्लास्टिकच्या खोक्यात ठेवले. सभोवती कॅमेरा ट्रॅप आणि थेट प्रक्षेपण करणारे कॅमेरे लावण्यात आले. मात्र, सायकांळी सहा वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी दाखल झालेली मादी परिसराची पाहणी करुन निघून गेल्याची माहिती येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. 

 
 
 

leopard _1  H x 
 

त्यानंतर रात्रभर मादी पुन्हा येण्याची वाट पाहण्यात आली. मात्र, मादी न आल्याने वनाधिकाऱ्यांनी सकाळी पिल्लाला पुन्हा ताब्यात घेतले. गुरुवारी रात्री पुन्हा एकदा पिल्लाला त्याच्या आईकडे सुपुर्द करण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती पुशवैद्यकीय अधिकारी डाॅ. शैलेश पेठे यांनी दिली. हे पिल्लू नर असून ते बारा-पंधरा दिवसांचे आहे. मात्र, त्याची प्रकृती ढासळत असून पुढील एक-दोन दिवसांमध्ये आईने न स्वीकारल्यास त्याची जगण्याची शक्यता कमी असल्याचे, पेठेंनी स्पष्ट केले. गुरुवारी रात्री पिल्लू त्या जागेवर ठेवताना प्लास्टिकच्या खोक्यांएवजी पारदर्शक खोक्यामध्ये ठेवण्यात येणार आहे. जेणकरुन मादीला हे पिल्लू सहजरित्या पाहता येईल.

 

आशेचे किरण कायम

मादी बिबट्याने जागेची पाहणी केल्याने एक-दोन दिवसांमध्ये ती पिल्लाला घेऊन जाण्याची शक्यता दाट असल्याची माहिती या विषयातील तज्ज्ञ डाॅ. अजय देशमुख यांनी दिली. डाॅ. देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली आजवर बेवारस अवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या ७१ पिल्लांना त्यांच्या आईकडे पुन्हा सुपूर्द करण्यात आले आहे. उसाच्या शेतात आढळणाऱ्या पिल्लांबाबत हा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये बराच वेळा पहिल्या दिवशी मादी बिबट्या केवळ जागेची पाहणी करुन गेल्याच्या घटना घडल्याचे देशमुख यांनी सांगितले. मात्र, पुढील एक-दोन दिवसांमध्ये त्या बिबट्यांंना घेऊन गेल्याने येऊरमध्ये आढळलेल्या बिबट्याच्या बाबतीत अजूनही आशेचे किरण कायम असून निराश होण्याचे काही कारण नसल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय आठ दिवसांनंतर मादी बिबट्या पिल्लाला घेऊन गेल्याच्या घटना देशमुख यांनी हाताळलेल्या प्रकरणांमध्ये घडल्या आहेत.

Powered By Sangraha 9.0