हैदराबाद प्रकरणाची युपीत पुनरावृत्ती

05 Dec 2019 15:05:18

case_1  H x W:


उत्तर प्रदेश : हैदराबाद बलात्कार प्रकरणाने देशातील महिला सुरक्षा प्रश्न ऐरणीवर असतानाच गुरुवारी उत्तर प्रदेश मध्ये बलात्कार पिडीतेला पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यादरम्यान पीडित युवती ९०% भाजली असून, तिची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे संपूर्ण उन्नाव हादरले आहे. पोलिसांनी या पीडितेला जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. 

पीडित तरुणीने याच वर्षी मार्च महिन्यात शुभम त्रिवेदी आणि शिवम त्रिवेदी या दोघांविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटकही केली होती. परंतु, हे आरोपी जामिनावर बाहेर होते. गुरुवारी (५ डिसेंबर) पीडिता याच प्रकरणाच्या सुनावणीसाठी रायबरेलीकडे निघाली होती. रायबरेली जाण्यासाठी रेल्वे पकडण्यासाठी निघालेल्या या तरुणीला आरोपींनी गावाबाहेर अडवून तिच्या डोक्यावर काठीचा प्रहार केला आणि गळ्यावर चाकूने वार केला. पीडित तरुणी बेशुद्ध होऊन पडताच नराधमांनी तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत पेटवून दिले. पीडितेला जाळल्यानंतर तिचा आरडाओरड ऐकून लोक धावून येत असल्याचे पाहून आरोपींनी तिथून पलायन केले.

पीडितेच्या तक्रारीनुसार, हे आरोपी तिच्यावर खटला मागे घेण्यासाठी दबाव टाकत होते. परंतु, तिने यासाठी नकार दिल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Powered By Sangraha 9.0