
समाजात शिक्षणाचा प्रसार होऊन त्यांच्यातील अज्ञान नष्ट व्हावे. दलित, वंचित समाजात शिक्षणामुळे आत्माविश्वास निर्माण झाला म्हणजे ते प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकतील, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वाटत असे. उच्च शिक्षणाचा प्रसार झाला तर समाजात प्रगतीला दिशेने वाटचाल करता येईल, या अपेक्षेने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ८ जुलै, १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली.
पीपल्स एज्युकेशन सोसायटी’चा माध्यमातून फक्त शिक्षणाचा प्रसार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना करायचा नव्हता, तर भारतात बौद्धिक, नैतिक आणि सामाजिक लोकशाहीद्वारे विकास होईल, अशी लोकांची मनोवृत्ती घडवण्याचे कार्य करावयाचे होते. ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये नमूद करण्यात आले होते की, माध्यामिक, महाविद्यालयीन तांत्रिक शिक्षण आणि शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून मागासलेल्या जाती-जमातींना सेवासुविधा पुरवून त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करणे. ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ गेली ७४ वर्षे हा शिक्षणविषयक घेतलेला वसा समर्थपणे चालवत आहे. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुंबई, पुणे, महाड, नांदेड, पंढरपूर, औरंगाबाद, वाशी अशा विविध ठिकाणी महाराष्ट्रात शिक्षणाचा विस्तार केला असून महाराष्ट्राबाहेर बंगळुरू, निहार, बुबू्रगया आदी ठिकाणीही शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार केला आहे.
सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना
इ. स. १९४४-४५ मध्ये मुंबई प्रांतात महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या फार वाढली होती. परंतु, जागा मर्यादित असल्यामुळे दलित विद्यार्थ्यांना कोणत्याच महाविद्यालयात प्रवेश मिळत नसे, ही अडचण दूर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९ जून, १९४६ रोजी ‘सिद्धार्थ महाविद्यालया’ची स्थापना केली. या कॉलेजचे पहिले प्राचार्य म्हणून डॉ. ए. बी. गजेंद्रगडकर यांची नियुक्ती करण्यात आली. हे महाविद्यालय फक्त अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी नव्हते. त्यात सर्व जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत होता. या महाविद्यालयात ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर, पारशी, ख्रिश्चन, मुसलमान इत्यादी सर्व जातीतून प्राध्यापक वर्गाची निवड करण्यात आली होती. सिद्धार्थ महाविद्यालयात बी.ए. आणि बी.एस्सीपर्यंतचे सर्व वर्ग एकदम सुरू करण्यात आले होते. कला शाखेचे वर्ग सकाळी भरत असल्यामुळे नोकरी करणार्या अनेक स्त्री-पुरुषांना महाविद्यालयीन शिक्षण घेणे शक्य झाले. विशेषत: मागासवर्गीय आर्थिक स्थितीमुळे महाविद्यालयीन शिक्षणाला मुकलेल्या स्त्री-पुरुषांना सिद्धार्थ महाविद्यालयाने शिक्षणाचे दार उघडले होते. अनेकांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यामुळे नोकरीच्या उच्चपदापर्यंत पोहोचता आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋण दलित, वंचित मागासवर्गीय सर्व समाजातील स्त्री-पुरुष राहत आले आहेत.
मुंबई येथे १९५३ मध्ये कॉमर्स कॉलेज सुरू
मागासवर्गीय समाजाला कॉमर्स शाखेचे ज्ञान घेता यावे, म्हणून ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ महाविद्यालयाला जोडून १९५३ मध्ये कॉमर्स कॉलेज सुरू केले. सायन्स आणि कॉमर्स शाखेत शिकणार्या विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना दरमहा १५ रुपये शिष्यवृती देण्याचे जाहीर करण्यात आले. त्या काळात ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ मागासवर्गीच्या शिक्षणाबाबत दाखवलेली उदारता, तळमळ विद्यार्थ्यांना शिक्षणक्षेत्रात पुढे जाण्यास कारणीभूत ठरली.
१९५६ ला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिस’, १९७२ ला ‘डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ’ वडाळा मुंबई येथे सुरू करण्यात आले. १९७७ ‘सिद्धार्थ कॉलेज ऑफ मासकम्युनिकेशन’ अशी एकूण सहा महाविद्यालये ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये सुरू करण्यात आली. त्याशिवाय रात्रशाळा वसतिगृहे संशोधन संस्था इत्यादींच्या रुपाने मुंबई शहरांमध्ये एक मोठा शैक्षणिक परिसर उभा करण्यात आला.
मिलिंद महाविद्यालयाची स्थापना
इ. स. १९४६ पर्यंत मराठवाडा विभाग, हैद्राबाद संस्थानच्या अविभाज्य भाग होता. तेथील संस्थानने सर्व प्रकारचे शिक्षण आपल्या ताब्यात ठेवले होते. मुसलमान समाजाचा शैक्षणिक विकास हेच त्या संस्थानचे धोरण होते. त्यामुळे त्यावेळेच्या हैद्राबाद राज्यात उच्च शिक्षणाची गरज लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमातून औरंगबाद येथे जून १९५0 मध्ये कला आणि शास्त्र शाखेचे महाविद्यालय सुरू केले. या महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभासाठी १ डिसेंबर, १९५१ रोजी भारताने पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र पसार आले होते. १९५५ मध्ये या महाविद्यालयाचे ‘मिलिंद महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले. ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमातून सुरू केलेल्या महाविद्यालायामुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कर्नाटक आणि मध्यप्रदेशातून दलित विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात येऊ लागले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारची अडचण येऊ नये म्हणून ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ काळजी घेत होती. मागासवर्गीय विद्यार्थ्यांपेक्षा दलित विद्यार्थ्यांचे शिक्षण घेण्याचे प्रमाण दुप्पट होते. यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित विद्यार्थ्यांसाठीच महाविद्यालय सुरू केले नव्हते, तर शैक्षणिकदृष्ट्या सर्व समाजाचा विकास व्हावा, मागासलेल्या भागाचा विकास व्हावा हा त्यांचा संस्था स्थापन करण्यात मागील उद्देश स्पष्ट होता.
औरंगाबाद विभागातील इतर कॉलजची स्थापना
संस्थेमार्फत १९५0 मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना झाल्यानंतर ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ने १९६0 मध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स’ सुरू केले. १९६३ मध्ये ‘मिलिंद कॉलेज ऑफ आर्टस’, १९६८ मध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ’ अशी चार स्वतंत्र्य महाविद्यालये सुरू करण्यात आली. ‘शारीरिक शिक्षण महाविद्यालय’, ‘वर्किंग वुमेन्स हॉस्टेल’, तसेच १९५५ मध्ये इंग्रजी माध्यमाचे मराठवाड्यातील पहिले माध्यमिक विद्यालय सुरू केले. मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल, बुद्धिस्ट सेंटर, प्रत्येक महाविद्यालयाचे स्वतंत्र्य वसतिगृह सुरू केले.
‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमातून औरंगाबाद हे मराठवाडा, विदर्भातील दलित विद्यार्थ्यांसाठी एक मोठे शैक्षणिक केंद्र बनले. एखाद्या विद्यार्थ्याला शासनाकडून मिळणार्या शिष्यवृत्तीस वेळ लागल्यास विद्यार्थ्याचे शिक्षण बंद पडता नये याची काळजी संस्थेकडून घेण्यात येत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळत असे. सोयी-सवलतींमुळेच विद्यार्थ्यांचे नुकसान न होता शिक्षणाचा मार्ग सुरळीत चालू राहत असे. त्यामुळेच आज दलित वर्गाचा शिक्षणमार्ग सुरळीत चालू आहे. ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ने मुंबई आणि औरंगाबाद या प्रमुख विभागांव्यतिरिक्त कोकण प्रांतातील महाड येथे १९६१ मध्ये पहिले कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सुरू केले आणि त्याचवर्षी १९२७ मध्ये सुभेदार सतादकर यांनी वसतिगृहाचे व्यवस्थापन आपल्या ताब्यात घेतले. ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमातून दापोली येथे मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह सुरू करण्यात आले.
पुण्यात येरवडा येथे १९८५ मध्ये कला, वाणिज्य, महाविद्यालय सुरू केले. नांदेड येथे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सुरू केले. पंढरपूर येथे महाविद्यालय आणि वसतिगृह चालविले. महाराष्ट्राबाहेर बंगळुरू येथेही महाविद्यालय आणि धर्माच्या तुलानात्मक अभ्यासासाठी ही बुद्धिस्ट संस्था स्थापन केली. ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमातून विविध शाळा, महाविद्यालयांमधून विविध स्मार्टरुमध्ये सहभाग राहिला आहे. एनएसएस माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण भाग, निम्मशहरी भागातील लोकांमध्ये सहभागी करून घेण्यात येते. इथे सुसज्ज ग्रंथलयही आहे.
‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतरदेखील महाविद्यायल, वसतिगृह, ग्रंथालय चालवले असून आताच्या आवश्यक बदलांनुसार मासकम्युनिकेशन, तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित व प्रशासनविषयक नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स संगणक, विज्ञान, जैवशास्त्र, आयटी क्षेत्राची गरज ओळखून त्यापद्धतीचे शिक्षण देण्याचे काम आपल्या विविध कनिष्ठ महाविद्यालयातून, उच्च महाविद्यालयातून सुरू आहे. ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये दहा मान्यताप्राप्त महाविद्यालये, चार उच्च माध्यामिक शाळा, दोन तंत्रशिक्षण विषय संस्था आणि तीन वसतिगृहे आहेत.
‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमातून चालत आलेले शिक्षणप्रसाराचे काम हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले असून महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ने विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून नावलौकिक संपादन केला आहे. 