आंबेडकरी विचारांचा विजय

05 Dec 2019 15:17:07

PAGE 8 _1  H x



क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र विचारांनी तो प्रेरित झाला. पण, केवळ आत्मउन्नतीचा मार्ग न पत्करता, त्याने समाजोन्नतीची कास धरली. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेणार्‍या विजय कांबळे यांनी ‘भारतीय बौद्धजन विकास समिती’ची मुहूर्तमेढ रोवली. आंबेडकरांच्या विचारमूल्यांचे अधिष्ठान लाभलेल्या या संस्थेच्या माध्यमातून आज अनेक समाजोपयोगी कामांना बळ मिळाले आहे. तेव्हा, आंबेडकरांच्या विचारांना सर्वस्वी मूर्तरूप देऊन कार्यरत विजय कांबळे यांचा जीवनप्रवास आणि समितीच्या समाजकार्याचा घेतलेला हा आढावा...

 

अन्याय-अत्याचाराने खचलेल्या, कुठलाही शैक्षणिक लवलेश नसलेल्या अशा आपल्या अस्पृश्य समाजासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अनेक हालअपेष्टा सहन करून, प्रसंगी अपमान सहन करत अन्यायाविरुद्ध एक सशक्त जनचळवळ उभी केली. एक वैचारिक वारसा पुढच्या पिढ्यांसाठी तयार करून ठेवला. याच वैचारिक वारशातून बाबासाहेबांचे विचार आणि ध्येय पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज समाजात अनेक तरुण समाजाच्या उन्नतीसाठी उभे राहत आहेत, संघटित होत आहेत. अशा अनेक तरुणांना संघटित करून बाबासाहेबांचे सामाजिक आणि शैक्षणिक अभ्युदयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक व्यक्ती अत्यंत गरीब कुटुंबातून पुढे येते. सामाजिक कामात स्वत:ला झोकून देते आणि पाहता पाहता एक चळवळ उभी करते. पण, याचा कुठलाही गर्व त्याच्या चेहर्‍यावर दिसत नाही. बाबासाहेबांचे विचार हाच आपला वारसा समजणार्‍या या व्यक्तीचे नाव आहे, विजय चंद्रकांत कांबळे.
 

कांबळे मूळचे दौंड तालुक्यातील केडगाव येथील रहिवासी. पण, पोटापाण्यासाठी मुंबईत स्थायिक झाले. भायखळ्यातील एका अत्यंत गरीब कुटुंबात ५ सप्टेंबर, १९७४ ला विजयचा जन्म झाला. वडील चंद्रकांत कांबळे टॅक्सीचालक म्हणून काम करायचे. घरात तीन बहिणी आणि विजयसह दोेघे भाऊ असं मोठं कुटुंब. आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक. त्यामुळे भायखळ्यातही विजयला जास्त दिवस राहता आले नाही. मग आधार शोधत पुण्यातल्या पिंपरी येथे आजोळी हे कुटुंब स्थायिक झाले. येथेच महानगरपालिकेच्या शाळेत विजयचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे रोज सकाळी घराघरात दूध टाकत, पिंपरीतच रयत शिक्षण संस्थेच्या नवमहाराष्ट्र विद्यालयात विजयने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

 

लहानपणापासूनच पिंपरीतील काळेवाडी येथील तक्षशिला बुद्धविहारात विजयचे नित्यनियमाने जाणे-येणे असल्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव त्याच्या वागण्या-बोलण्यात आणि विचारांमध्ये तेव्हापासूनच जाणवत होता. बाबासाहेबांचे सामाजिक जीवन, त्यांनी सहन केलेले अन्याय-अत्याचार आणि त्यातून त्यांच्या विचारांमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी निर्माण झालेली जिद्द. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून बाबासाहेबांनी पूर्ण केलेले शिक्षण आणि नंतर वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून समाजासाठी, राष्ट्रासाठी दिलेले योगदान, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनचरित्रच विहारातील उपस्थितीमुळे विजयसमोर उलगडत केले. बाबासाहेबांचे विचार विजयच्या मनावर इतके बिंबले की, त्यानंतर विजयला समाजासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी जागृत झाली नसती तरच नवल! या वैचारिक बैठकीतूनच विजयची जडणघडण होत होती.

 

दहावीनंतर कौटुंबिक गरज म्हणून विजयला नोकरी करणे भाग पडले. परंतु, बाबासाहेबांच्या विचारांचा पगडा आणि शिक्षणाची जिद्द विजयला स्वस्थ बसू देत नव्हती आणि यातूनच विजयने नोकरी करत शिकण्याचा निर्णय घेतला. हा एकप्रकारे बाबासाहेबांच्या शिक्षणविषयक विचारांचाच विजय होता, असे म्हटले पाहिजे. पुढे विजयने अत्यंत हिमतीने अर्धवेळ नोकरी करत इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. त्याचाच परिणाम म्हणून मग पुढे त्याला कनिष्ठ अभियंता म्हणून बढती महानगरपालिकेत मिळाली. पण, इथेही त्या भिमाईचे विचार त्याला शांत बसू देत नव्हते. "चल ऊठ, तुला समाजासाठी काम करायचे आहे. आपल्या समाजाला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे," असे त्याचे मन त्याला निरंतर निक्षून सांगत होते. ते त्याचे मन नव्हतेच, तर तो बाबासाहेबांच्या विचारांचा, संस्कारांचा परिणाम होता आणि हे विजयला सतत जाणवत होते. म्हणून मग विजयने सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घ्यायचे ठरवले.

 

नोकरी सांभाळत मिळेल त्या रूपात विजयने सामाजिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. पिंपरीतच कार्यरत असलेले ‘भिमज्योत तरुण मंडळ’ बाबासाहेबांचा विचार सर्व समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, या उदात्त हेतूने नित्यनियमाने व्याख्यानमाला आयोजित करत. धम्मदीक्षेचे कार्यक्रम घेत असत. त्यांच्या विविध कार्यक्रमांमध्ये विजयने सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. मितभाषी आणि भिमाच्या विचारांशी इमान राखून असल्यामुळे, समविचारांच्या आणि बाबासाहेबांच्या कार्यात योगदान देऊ इच्छिणार्‍या माणसांचा संघ विजयभोवती गोळा व्हायला सुरुवात झाली आणि त्यातूनच साधारण २०१४-१५ मध्ये विजयने सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन ‘आम्ही घडलो की बिघडलो?’ या विषयावर एक निबंध स्पर्धा आयोजित केली.

 

अनेक वैचारिक जाणकारांनी त्यात भाग घेतला. त्यात नोंदवल्या गेलेल्या विचारांच्या गाभ्यातून एक प्रश्न विजयला सतावत होता, तो असा की, बाबासाहेबांनी ज्या हेतूने धर्मपरिवर्तन केले, तो हेतू खर्‍या अर्थाने साध्य झाला आहे का? धर्मपरिवर्तन तर झाले, पण मनपरिवर्तन झाले का? एक अंधश्रद्धा जाऊन तिची जागा दुसर्‍या अंधश्रद्धेने तर घेतली नाही ना? या अस्वस्थतेने विजयच्या आणि त्याच्या सहकार्‍यांच्या मनात घर केले आणि आता आपल्याला समाजासाठी काहीतरी ठोस करण्याची वेळ आली आहे, या विचारामधून, विजयच्या कल्पनेतून आणि समाजोद्धारणेच्या हेतूने संस्थाबांधणीची कल्पना पुढे आली. १४-१५ तरुणांच्या साथीने दि. ४ ऑगस्ट २०१६ रोजी एका अशा संस्थेचा जन्म झाला, जिचे नाव ‘भारतीय बौद्धजन विकास समिती’ असे ठेवण्यात आले. या नावामागचे वैशिष्ट्य असे की, ‘भारतीय बौद्धजन समिती’ हे नाव बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेच्या स्थापनेपूर्वी त्यांच्या संघटनेला दिले होते. त्यात ‘विकास’ हा शब्द घालून ‘भारतीय बौद्धजन विकास समिती’ हे नाव संस्थेला देण्यात आले. त्याचे कारण विजय असे सांगतात की, "हे असे नाव आहे, ज्याला बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा आहे आणि सामाजिक विकासाचे ध्येयदेखील अधोरेखित आहे."

 

या संस्थेचे ब्रीदवाक्य बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा,’ या विचाराला पुढे घेऊन जात असे सांगते की, ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, संस्कारी व्हा.’ यातूनच संस्थेचा उद्देश समाजाला शिक्षण, संघटन आणि संघर्ष यासाठी प्रेरित करण्याबरोबरच, त्यांना संस्कारी होण्यासाठी प्रेरित करणे, हादेखील आहे. "आज ज्या पद्धतीने बाबासाहेबांच्या विचारांची पायमल्ली होऊ पाहत आहे, बाबासाहेबांनी सुरू केलेली आंबेडकरी चळवळ, आज संस्था आणि संघटनांमध्ये अडकू पाहत आहे, ते पाहता समाजमनावर पुन्हा चळवळीचे संस्कार होणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि आमची संस्था अहोरात्र यासाठीच काम करत आहे आणि पुढेही करत राहील," असे विजय अगदी आत्मविश्वासाने सांगतात.

 

या संस्थेचे अनेक समाजाभिमुख उपक्रम याच उद्देशातून सुरू आहेत. ज्यातील काही उपक्रम हे संस्थास्थापनेपूर्वीपासूनच विजय आणि त्यांचे सहकारी राबवित आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, सर्व समाजातील गरीब विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप उपक्रम. या उपक्रमाच्या अनेक आठवणी विजय यांच्या गाठीशी आहेत. हा उपक्रम राबविताना विजय व त्यांच्या सहकार्‍यांना ग्रामीण भागातून फिरण्याचा योग आला. त्यातून त्यांना असे जाणवले की, आजदेखील ग्रामीण भागात अनेक असे विद्यार्थी आहेत, ज्यांना साधे वही-पेन घेणेदेखील शक्य होत नाही.

 

हे पाहिल्यानंतर सर्वांच्याच काळजात चर्रर्रऽ झालं. हा विचार करत असताना दुसरीकडे त्यांना असही जाणवलं की, अनेक सभा-समारंभात आणि धार्मिक कार्यक्रमात हारतुर्‍यांमध्ये लाखो रुपये खर्च होतात, ज्याचा कुणी साधा विचारदेखील करत नाही आणि एकीकडे ग्रामीण भागातील आपल्याला दिसलेले अनेक गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षणातले वास्तव. या सगळ्या परिस्थितीवर विचारमंथन करून ‘भारतीय बौद्धजन विकास समिती’ने एक घोषणा केली की, यापुढे हारतुर्‍यांवर होणारा खर्च टाळून तो पैसा गरीब विद्यार्थ्यांना शैैक्षणिक साहित्य पुरवण्यावर कसा होईल, यासाठी काम करायचे. मग काय, लगेच या विचाराचा प्रचार-प्रसार करण्यास संस्थेने सुरुवात केली. त्याला प्रतिसाद देत अनेक व्यक्ती आणि संस्था ‘भारतीय बौद्धजन विकास समिती’बरोबर जोडल्या गेल्या. आज खूप मोठ्या प्रमाणावर संस्था हा उपक्रम अनेक गावांमधून राबवत आहे.
 

याबरोबरच दरवर्षी १ जानेवारीला कोरेगाव-भीमा येथे अनेक अनुयायी अभिवादनासाठी जमा होतात. साहजिकच, परिसरात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक असा अनेक प्रकारचा कचरा होतो. त्याची साफसफाई करण्याचा उपक्रम ‘भारतीय बौद्धजन विकास समिती’ दरवर्षी २ जानेवारीला राबविते. त्या निमित्ताने समाजामध्ये स्वच्छतेचा संदेशही जातो आणि संस्थेच्या कार्यकर्त्यांचा आत्माभिमान वाढण्यास मदत होते. "कार्यकर्त्यांना कामातूनच कामाची प्रेरणा मिळत असते, याचा दाखला आम्हाला अशा अनेक कार्यक्रमांतून मिळत राहतो," असं निरीक्षण विजय अगदी सहज नोंदवून जातात.

 

"संस्थेच्या माध्यमातून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी रोज एका नवीन कुटुंबाला आमंत्रित केले जाते. या माध्यमातून आत्तापर्यंत दोन हजारांच्या वर कुटुंबे संस्थेशी जोडली गेली आहेत. अशा कुटुंबांच्या स्नेहमिलनाचा उपक्रमदेखील संस्था प्रतिवर्षी करत असते. व्याख्यान, चर्चासत्र, लहान मुलांसाठी लहान मुलांनीच तयार केलेले मनोरंजनाचे कार्यक्रम असे या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचे स्वरूप. बाबासाहेबांच्या विचारांची माणसे बाबासाहेबांच्या विचारांशी जोडून ठेवण्याचे खूप मोठे कार्य या उपक्रमाच्या माध्यमातून होते. अशा अनेक प्रतिक्रिया आम्हाला समाजातून आल्या आहेत आणि येत आहेत," असे विजय सांगतात.

 

धम्म की पाठशाला’ हा एक अभिनव उपक्रम संस्थेने सुरू केला आहे, ज्यामध्ये लहान मुलांना बाबासाहेबांच्या विचारांचे अमृत दिले जाते, त्यांच्यावर अन्याय-अत्याचारांविरुद्ध लढण्याबरोबरच समाजासाठी काम करण्याचे संस्कार बिंबवले जातात. बाबासाहेबांचे शिक्षणविषयक विचार त्यांना शिकवले जातात. आत्माभिमान जागृत करण्याबरोबरच नवनिर्माणासाठीचे मार्गदर्शन त्यांना तज्ज्ञांमार्फत केले जाते. बाबासाहेबांच्या कार्याप्रति उतराई होण्याचा मार्ग या वयातच मुलांना दाखवणे संस्थेला हितकारक वाटते. याबरोबरच महिला सन्मान जागृत करण्यासाठी १४ एप्रिल, २०१९ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२८व्या जयंतीनिमित्त ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन रॅली’ या महिला दुचाकी रॅली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. असंख्य माता-भगिनींनी यात सहभाग नोंदवून बाबासाहेबांना अनोखे अभिवादन केले. संस्थेच्या कार्यावर समाजाच्या असलेल्या विश्वासाचा हा परिणाम आहे.

 

संस्थेच्या आगामी कार्यक्रमात ’धम्मभूमी देहूरोड येथे २५ डिसेंबर, २०१९ रोजी सुमारे एक लाख बौद्ध अनुयायांची सामूहिक महाबुद्धवंदना हा कार्यक्रम आयोजित केला आहे. एक लाखांपेक्षा जास्त बौद्ध अनुयायी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी संस्थेला खात्री आहे. यानिमित्ताने संस्थेच्यावतीने मी, विजय चंद्रकात कांबळे सर्व अनुयायांना आवाहन करू इच्छितो की, "या महाबुद्धवंदना कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहूयात आणि भिमाचे विचारच जगाला तारणार आहेत, याची जाणीव संपूर्ण जगाला करून देऊयात." 


88_1  H x W: 0

 

Powered By Sangraha 9.0