नको जुगार, शेती (कष्ट) करूया...!

    दिनांक  04-Dec-2019 20:41:20
|
sss_1  H x W: 0कृषीव्यवसाय हाच सर्वश्रेष्ठ आहे. साक्षात् भूमातेची सेवा. जो जमीन कसेल व घाम गाळील, त्याला निश्चितच सोने मिळेल. ही धरणीमाता आपल्या पुत्रांना कधीच दु:खी करीत नाही. जो प्रामाणिकपणे दिवसरात्र कष्ट करतो, त्याला त्याच्या परिश्रमाचे सर्वोत्तम फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण, उद्योगी व परिश्रमी लोकांमध्ये लक्ष्मीदेवता कायमस्वरूपी वसते.अक्षैर्मा दीव्य: कृषिमित् कृषस्व

 

वित्ते रमस्व बहु मन्यमान:।

तत्र गाव: कितव: तत्र जाया

तन्मे वि चष्टे सवितायमर्य:॥

(ऋग्वेद-१०.३४.१३)

 

अन्वयार्थ

(हे कितव) अरे जुगार्‍या! (अक्षै:) पाशांशी (मा दीव्य:) खेळू नकोस. (कृषिम् इत्) शेतीच (कृषस्व) कर, नांगर! (बहु मन्यमान:) खूप आदर-मान-सन्मान मिळवत (वित्ते रमस्व) धन-ऐश्वर्यामध्ये रममाण हो! (तत्र) तसे करशील तर तिथे (गाव:) गाई तुझ्याच होतील. (तत्र) त्या परिस्थितीत (जाया) तुझी पत्नीदेखील प्रिय बनून तुला साथ देईल. (अयम् अर्य: सविता) हा सकलनिर्माता प्रेरक ईश्वर (मे) माझ्याकरिता, आपणांसाठी (तत्) त्या सर्व चांगल्या बाबी (तत्त्वे विचष्टे) उत्तम रितीने देत राहील.

 

विवेचन

वेद हे केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक विषयांचा उपदेश करणारे अथवा कर्मकांडाचे प्रतिपादन करणारे धर्मग्रंथ नाहीत, तर सकल मानवजातीच्या व सबंध प्राणिमात्राच्या समग्र कल्याणासाठी चैतन्यदायी प्रेरणा देणारे मौलिक ग्रंथ आहे. याचकरिता 'वेदोऽखिलो धर्ममूलम्।' म्हणजेच वेद हे सर्व धर्म, कर्तव्य व जीवनमूल्यांचे मूलभूत आधार आहेत, असे म्हणतात. ते माणसाने जीवन जगताना कोणत्या दुष्कर्मांचा त्याग करावा आणि कोणती सत्कर्मे करावीत? जेणेकरून त्याला सुखाने जगता येईल, यावर वरील मंत्रात प्रकाश टाकला आहे. थोडक्यात, 'दुरितानि परासुव आणि भद्रम् आसुव।' हा भाव इथे झळकतो.

 

मानव हा बुद्धिमान व मननशील प्राणी! पण, बाह्य विषयांना व इंद्रियांना बळी पडून तो वाईटाकडे कधी वळण घेईल आणि आपल्या जीवनाची राखरांगोळी कधी करून घेईल, याचा नेम नाही. याची चिंता परमेश्वराला व त्यांचे अमृतपुत्र ऋषिवृंदानाच आहे! म्हणूनच वरील मंत्रोपदेशाद्वारे माणसाला जगण्याचा नवा व्यवहार मिळाला आहे. ज्ञान व सद्गुणांमुळे मनुष्य यशोशिखरावर पोहोचतो. तसेच आध्यात्मिक साधनेने मोक्षाची द्वारे उघडतो, पण हाच मानव दुर्गुण व दुर्व्यसनांमुळे रसातळाला जाऊन स्वत:बरोबरच कुटुंब, समाज व परिसराचीही हानी करतो. अशा गोष्टी पूर्वी ही घडल्या व आजही घडत आहेत! याची जाणीव प्राचीन तत्त्वचिंतकांना व ऋषींना होती. म्हणूनच वेदमंत्राद्वारे त्यांनी चौफेर उपदेश केला आहे, जो की सर्वकाळी, सर्वदेशी अत्यंत उपयुक्त ठरतो.

 

शाश्वत सुखप्राप्तीकरिता वरील मंत्र जुगाराचे व्यसन जडलेल्या माणसांना व भविष्यात अशा वाईट व्यसनांच्या आधीन होऊ इच्छिणार्‍या व्यक्तींकरितादेखील अतिशय मौलिक मार्गदर्शक स्वरूपाचा आहे. इथे जुगार हे केवळ प्रातिनिधीक व्यसन आहे. त्यासोबतच यासारख्या इतर व्यसनांपासूनही माणसाने दूर राहावे, कष्ट करावे आणि स्वत:चे जीवन यशस्वी बनवावे, असा भाव समजावा. इथे सर्वच व्यसनांचा निषेध अणि शेतीसारख्या पवित्र व श्रेष्ठ व्यवसायाचा बहुमान व गौरव केला आहे. कृषिकर्माने कोणकोणत्या गोष्टींचा लाभ होऊन व्यक्तीची सर्वत्र प्रतिष्ठा कशी वाढीला लागते, या संदर्भात अतिशय साध्या, सोप्या व समर्पक शब्दांमध्ये मांडणी केली आहे.

 

'दिव्' या धातूपासून 'दीव्य:' हे रूप तयार होते. याचे अनेक अर्थ धातुपाठकोषात आले आहेत. खेळणे, चमकणे, आनंद, गती, व्यवहार, स्तुती असे विविध अर्थ 'दिव्'चे होतात. पैसा, संपत्ती, धन वगैरे चमकणार्‍या बाबी आहेत. हा पैसा घाम न गाळता व कष्ट न करता अगदी सहजपणे खेळता-खेळता कसा मिळविता येईल, याकडे माणसाची दृष्टी असते आणि तसाच त्याचा स्वभाव बनतो. म्हणूनच इथे 'दीव्य:' या धातुरुपाचा अर्थ खेळण्यासंदर्भात आला आहे. 'अक्ष' म्हणजे पाश, जुगार किंवा तत्सम खेळ! यात अडकला की माणूस बुद्धिभ्रष्ट होतो. एक प्रकारची ही नशाच, जिथे की काहीच सूचत नाही. पाहता-पाहता सर्वस्व हरवून बसण्याची वेळ येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे, धर्मराज युधिष्ठिर. धर्माची दहा लक्षणे जीवनात उतरवणारा हा ज्येष्ठ पांडुपुत्र! तो जुगाराच्या इतका अधीन होतो की आपले राज्य, भाऊ आणि महाराणी पत्नीलादेखील पणाला लावतो. महाभारताचा हा सारा कलुषित इतिहास आपण सर्वजण जाणतोच! जर काय युधिष्ठिर अक्षांचे पाश खेळला नसता, तर पाच हजार वर्षांपासूनचे अज्ञान, अविद्या, अंधकाराचे ओझे या पृथ्वीमातेला सहन करण्याची वेळ आलीच नसती.

 

मंत्रातील पुढील मंत्रांश आहे - 'कृषिमित् कृषस्व।' अर्थात, हे मानवा, तू शेतीच कर! कृषीव्यवसाय हाच सर्वश्रेष्ठ आहे. साक्षात् भूमातेची सेवा. जो जमीन कसेल व घाम गाळील, त्याला निश्चितच सोने मिळेल. ही धरणीमाता आपल्या पुत्रांना कधीच दु:खी करीत नाही. जो प्रामाणिकपणे दिवसरात्र कष्ट करतो, त्याला त्याच्या परिश्रमाचे सर्वोत्तम फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण, उद्योगी व परिश्रमी लोकांमध्ये लक्ष्मीदेवता कायमस्वरूपी वसते. 'श्रमे श्री: प्रतिष्ठिता।' खरे तर 'कृष्' या धातूचा अर्थ फारच व्यापक, विस्तृत व उच्चतम आहे. सामान्यपणे 'कृषी' म्हणजे 'शेती' हा संकुचित अर्थ सध्या रूढ झाला आहे. 'कृष्' म्हणजे ओढून किंवा खेचून (बाहेर) आणणे होय. 'कृषस्व' हे आज्ञार्थी रूप आहे. या वाक्याचा व्यापक अर्थ होतो, 'हे मानवा, तू प्रत्येक क्षेत्रातून मग ती शेती, असो वा व्यापार किंवा अन्य कोणताही विभाग. तेथून जीवनशक्ती व सामर्थ्य खेचून, ओढून बाहेर काढ. शेतकरी काय करतो, बी-बियाणे जमिनीत पेरतो व मोठ्या परिश्रमाने त्यांना सुव्यवस्थितपणे बाहेर आणतो. ते बाहेर काढण्याकरिता मग त्याला बुद्धी, शरीरबळ आणि आत्मबळ व संतोषबळ वापरावे लागते. ऊन-पाऊस, थंडी-वारा, निसर्गाची अवकृपा आणि बाजारपेठेतील नफा-तोटा हे सर्वकाही त्याला सहन करावे लागते. म्हणून कृषक जीवन म्हणजे खरोखरच अग्निदिव्यातून जाणे होय. पण, 0या कष्टामुळे जे आनंदाचे जीणे मिळते, ते स्वर्गापरी श्रेष्ठ होय.

 

'कृषी' व 'कृषक' शब्दांचे व्यापक अर्थ घेतले तर केवळ शेती किंवा शेतकरी हाच होत नाही, तर उद्योजक, व्यापारी, नोकरदार, राजा, अधिकारी, शिक्षक असेही होतात. कारण, त्या-त्या क्षेत्रात किंवा विभागात काम करणार्यांनी मोठ्या प्रयत्नांनी आपल्या कार्यशक्तींना मूळ स्वरूपातून बाहेर काढणे होय. शिक्षकाचे उदाहरण घ्या. तो आपल्या विद्यार्थ्यांमध्ये असलेली प्रसुक्त ज्ञानशक्ती बाहेर काढून त्याला महान बनवतो व उच्च स्थानी नेतो. अशी ही व्यापक अर्थाची शेती करणे, हा प्रत्येक मानवाचा परमधर्म होय. यामुळे कितीतरी फायदे आहेत.

 

याउलट जुगार खेळणे म्हणजे 'आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे' होय. कष्ट न करता लोकांना फसवून किंवा भ्रष्ट मार्गाने पैसा मिळविणे म्हणजे अधर्म नव्हे काय? यामुळे जीवन सुखी व समृद्ध होईल? कदापि नव्हे. म्हणून शेतीच करावी. या घामाने जमिनीतून मोती पिकतील. जो मोठ्या कष्टाने शेती करेल, त्याचा मान-सन्मान वाढेल. म्हणूनच म्हटले आहे - 'बहुमन्यमान: वित्ते रमस्व।' समाजात, चारचौघात, गावात मान-प्रतिष्ठा तुला मिळेल व नेहमीच धनवैभवात रमशील! त्यामुळे तुझ्या घरातील गुरे-ढोरे, बैल इत्यादी पशू तुला नेहमीच साथ देतील. अशा चांगल्या दिनमानात तुझी जोडीदारीण 'जाया' म्हणजेच पत्नी तुझ्यावर नेहमीच सुखाचा, प्रेमाचा वर्षा करीत राहील. तुला जन्मभर साथ देत राहील. या सत्कर्मामुळे परमेश्वरदेखील तुझ्यावर कृपादृष्टी ठेवत नेहमीच तुला चांगल्या गोष्टी (बाबी) देत राहील आणि एका संस्कृतीचा उदय होईल.

प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य