अश्वत्थाम्याला दुःख

    दिनांक  04-Dec-2019 20:00:47
|

11 _1  H x W: 0

 


जेव्हा भीमाने गदेच्या प्रहाराने दुर्योधनाच्या दोन्ही मांड्या फोडल्या आणि दुर्योधन असह्य वेदनांनी तळमळत होता, त्यावेळी त्याला भेटण्यासाठी संजय तिथे गेला. आपला इंद्रासारखा राजा या अशा दयनीय अवस्थेत पाहून संजयाचे हृदय पिळवटून निघाले. दुर्योधनाला एकाकी आणि असाहाय्य अवस्थेत पाहून नियती ही किती कठोर व निष्ठूर असते याचा प्रत्ययच आला जणू! शेवटी एक राजा आणि एक सामान्य सैनिक यांचे भवितव्य सारखेच असते!

 

दुर्योधनाने दोन्ही हात जमिनीवर घट्ट टेकले होते आणि तो आपल्या वेदना सहन करण्याचा प्रयत्न जिद्दीने करत होता. पण, त्याची मान थरथरत होती. संजय त्याच्या समीप आला व बाजूला बसला. तो हमसून हमसून रडू लागला. दुर्योधनाने त्याला म्हटले, "तू खूप थोर माणूस आहेस. संजया, माझ्या या अवस्थेत तूच एक मला सोबत करायला आलास. आता मला नरकयातना होत आहेत खर्‍या, पण मी नक्कीच स्वर्गात जाईन. अरे कितीतरी अतिरथी, महारथी, भीष्म, द्रोण, कृपाचार्य, शल्य, कृतवर्मा, राधेय असे महान वीर माझ्या साथीला होते व मी हे युद्ध नक्की जिंकेन, अशी माझी खात्री होती. पण, आता पाहा, मी असा विकलांग होऊन जमिनीवर धुळीत पडलो आहे.

 

त्या भीमाने युद्धाचे नियम भंग करून माझी ही अवस्था केली. मी धड जगूही शकत नाही व मरूही शकत नाही. पण, तू माझ्यासाठी एक गोष्ट कर, माझ्या पाठीमागे जीवंत असलेले कृपाचार्य व कृतवर्मा तसेच अश्वत्थामा यांना शोधून काढ आणि सांग की, युद्धाचे नीतिनियम धुडकावून भीमाने माझा पराजय केला आहे. त्यांना हे पण सांग की, मी अजून जीवंत आहे आणि त्यांना भेटावे, अशी माझी इच्छा आहे. तू माझ्या माता-पित्यांनाही भेटून सांग की, तुमचा पुत्र रणांगणातून पळून गेला नाही. त्याने शूर वीराचे मरण पत्करले. त्यांना सांग की, मला जराही दुःख वा पश्चाताप वाटत नाही. कृतवर्मा, अश्वत्थामा व कृप यांना माझ्याकडे पाठव." इतके बोलल्यामुळे दुर्योधनाला ग्लानी आली. त्याची शुद्ध हरपली.

 

संजयाने निरोप देताक्षणी कृप, अश्वत्थामा आणि कृतवर्मा दुर्योधनाला भेटले. अश्वत्थामासुद्धा बेशुद्ध झाला. काही वेळानंतर त्याने स्वतःला सावरले. तो दुर्योधनाचे हात हाती घेऊन तो म्हणाला, "धर्माचा बुरखा पांघरून पांडवांनी हे सर्वात मोठे पाप केले आहे व सदाचरणाचा भंग केला आहे. आजच मी कृष्णाच्या डोळ्यांसमोर सर्व पांडवांना यमसदनी पाठवतो. आज रात्रीच मी हे करीन. त्यांचा वध केल्याशिवाय मी विश्रांती घेणार नाही. मला परवानगी द्या."

 

दुर्योधन म्हणाला, "कृपाचार्य एका भांड्यातून थोडं पाणी घेऊन या." त्यांनी पाणी देताच दुर्योधनाने ते अश्वत्थामाच्या शिरावरती शिंपडले व म्हणाला, "अश्वत्थामा, मी तुला आपल्या सैन्याचा सेनापती म्हणून नेमतो आहे. हा अभिषेक झाला आहे, असे समज. जा त्या पांडवांचा निःपात कर."

 

ते तिघेही पांडवांच्या शोधात निघाले. परंतु, थकल्यामुळे कृप व कृतवर्मा यांना झोप आली. अश्वत्थामा मात्र जागा होता. आजूबाजूला पाहत असताना त्याला एका झाडावरती कावळ्यांची वस्ती दिसली. रात्रीच्या अंधारात सारे कावळे निजले होते. इतक्यात तिथे एक घुबड आले. त्या घुबडाने एकामागून एक कावळे मारायला सुरुवात केली. पाहता पाहता, त्या झाडावर एकही कावळा शिल्लक राहिला नाही.

हे दृश्य बघून अश्वत्थाम्याच्या मनात कल्पना आली की, जे या घुबडाने केले तसेच आपणही पांडवांच्या शिबिरात रात्रीत प्रवेश करून त्या सर्वांचा निःपात करावा. रात्री ते बेसावध असतील, तेव्हाच त्यांना ठार मारावे. त्याने आपल्या सहकार्‍यांना उठविले व ही कल्पना सांगितली. तो सूडाने पेटलाच होता. परंतु, कृप म्हणाले, "तुझी ही कल्पना अघोरी व अयोग्य आहे.

 

आपला राजा दुर्योधन हा काही चांगला व सदाचरणी नव्हता. अत्यंत दुष्ट होता. त्याने पांडवांवर खूप अन्याय केले म्हणून त्यांनी त्याची ही अवस्था केली. शिवाय भीमाने भर दरबारात त्याच्या मांड्या फोडीन, अशीच प्रतिज्ञा केली होती व ती पुरी केली. तुही तुझ्या वडिलांच्या वधाचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली आहेस. पण, आपण दिवसा समोरासमोर लढून ती पूर्ण करू. तू हे रात्रीचे अघोरी कृत्य करून निंदेचा धनी होशील. तुझी अपकीर्तीच होईल." पण, अश्वत्थामा आपला हट्ट सोडीना. तो म्हणाला, "मला जे करायचे आहे ते मी करीनच. तुम्ही सोबत राहा अथवा राहू नका! मला त्याची पर्वा नाही. मी एकटाच जातो आणि ते करतो."

 

अश्वत्थामा आपल्या रथात बसला. भगवान शंकराने दिलेली तलवार त्याच्याकडे होती. ती तलवार घेऊन तो पांडवांच्या शिबिराकडे निघाला. शेवटी कृप व कृतवर्मा पण नाईलाजाने त्याच्या बरोबर निघाले. स्वामी दुर्योधनाच्या वधाचा सूड त्या तिघांना घ्यायचा होता.

 


(क्रमशः)

- सुरेश कुळकर्णी

[email protected]

- 9821964014