आरे आंदोलकांना धक्का ! अश्विनी भिडेंना पदोन्नती

    दिनांक  31-Dec-2019 15:08:36
|

Ashwini Bhide _1 &nb

 


मुंबई : मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांना पदोन्नती मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या शपथविधी समारंभानंतर लगेचच त्यांना प्रधान सचिवपदावर बढती देण्यात आली आहे.

 

मेट्रो प्रशासनाचा कारभारही भिडे यांच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे आरे कारशेड आंदोलकांना हा मोठा धक्का मानला जात आहे. आरे कारशेड येथील वृक्षतोडीवरून कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी निवडणूकीपूर्वी रान उठवले होते. अश्विनी भिडे यांच्यावरही त्यांनी ट्विटरद्वारे टीका केली होती. मात्र, उद्धव ठाकरे सरकारने त्यांच्याकडील मेट्रो कामाची जबाबदारी कायम ठेवली आहे.
 

अश्विनी भिडे यांच्यावर देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या कायम असणार आहेत. त्यांना मिळालेली जबाबदारी प्रधान सचिव या विभागातील आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूकीपूर्वी कारशेडमधील वृक्षतोडीला विरोध करत आरे जंगल म्हणून घोषित करणार असल्याचे जाहीर केले होते.

 

मात्र, त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर प्रस्तावित मेट्रो कारशेड कामाला स्थगिती दिली व या कामाचा अहवाल मागवला होता. अश्विनी भिडे यांची आता थेट बदली होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, तसे काहीच न झाल्याने हा निर्णय आरे आंदोलकाना मोठा धक्का मानला जात आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB अॅप.