नाराज राऊत शपथविधी सोहळ्याकडे फिरकलेही नाहीत

    दिनांक  30-Dec-2019 16:14:13
Sanjay Raut 1 _1 &nb
 


मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत नाराज असल्याचे चित्र सोमवारी दिसले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या शपथविधी सोहळ्याला संजय राऊत अनुपस्थित राहीले. त्यांचे बंधू सुनील राऊतही मुंबई बाहेर असून ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सोमवारी सकाळपासून रंगली होती. शिवसेनेचा भगवा मंत्रालयात फडकवण्यात संजय राऊत यांचा महत्वाचा सहभाग होता. शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत किमान समान कार्यक्रम ठरवत असताना संजय राऊत यांची भूमीका महत्वाची होती. राऊतांना त्याची भेट म्हणून सुनील राऊतांना एखादं मंत्रीमंडळपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांचा भ्रमनिरास झाल्याने राऊत बंधू सध्या नाराज आहेत.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुहूर्ताचा दिवस ठरला. तीन पक्ष एकत्र येत सरकार स्थापन होत असल्याने नाराजी आणि कुरबूर सर्वच पक्षांमध्ये दिसून येत आहे. मात्र, हा तीन पक्षांचा संसार एका घडीत बसवणारे संजय राऊतच नाराज असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना कोणतेही मंत्रीपद मिळणार नसल्याने ही राऊत नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, "आम्ही मागणारे नाही आहोत, आम्ही देणारे आहोत. आम्ही आमच्या परिवारासाठी काही मागितले नाही.", अशी प्रतिक्रीया सांजय राऊत यांनी दिली आहे. 

 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांची मोट बांधून सरकार स्थापन करण्याची कल्पना प्रामुख्याने मांडली होती. त्यानंतर सातत्याने माध्यमांसमोर शिवसेनेची भूमीका मांडून जे आपण बोललो ते करून दाखवणारच असा ठाम विश्वासही व्यक्त केला होता. त्याचे अपेक्षित फळ म्हणून सुनील राऊत यांना मंत्रीमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळण्याची शक्यता तूर्त दिसत नाही. शिवसेनेला सर्वात १३ मंत्रीपदांचा वाटा सत्तेत देण्यात आला होता. तर राष्ट्रवादीला १३ आणि काँग्रेसला १० मंत्रीपदे मिळाली.